दिलीप झुंजारराव यांना निसर्गसंवर्धनाची आवड लहानपणापासूनच होती. त्यातून वैयक्तित पातळीवर अनेक गडांवर व गडपरिसरात जमेल तसे वृक्षारोपण व बिजारोपण ते करत आहेत. स्वतः घरी कंपोस्ट निर्मितीही गेली अनेक वर्ष करत आहेत. अनेक सुळक्यांवर प्रथम चढाईचा मान त्यांना जातो. २००५ साली गिरीमित्र गिर्यारोहक सन्मान देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. आता ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात ...
शिवइतिहासाची, पर्यावरणाची आणि साहसाची आवड गिर्यारोहणाकडे वळायला मला कारणीभूत ठरली. माझे महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर दुसऱ्याच वर्षी कान्हेरी येथे मी बेसिक रॉक क्लाइंबिंग प्रशिक्षण घेतले. त्यावेळी ज्यांनी मला मार्गदर्शन केले ते आदरणीय शरद ओवळेकर सर व माळी सर हे माझे आदर्श आहेत. ऑगस्ट १९७८ला मी पहिले गिर्यारोहण नाणेघाट येथे केले आणि माझ्या गिर्यारोहणाला सुरूवात झाली.
मे १९७९ साली
कर्नाळ्याचा बुधला मी एका दिवसात सर केला. आणि नोव्हेंबर १९८० साली पदरगडाच्या
कलावंतीणीचा महाल येथे सह्याद्रीतील पहिली प्रस्तरारोहण मोहीम राबवली. या
सह्याद्रीतील प्रस्तरारोहणासाठी ज्यांनी मला मुक्त हस्ताने प्रोत्साहन दिलं ते
हिरा पंडीत मला गुरूस्थानी आहे.
डिसेंबर १९८३ साली माहुली गडाचा, नवरा उर्फ भटोबा हा अजिंक्य सुळका दक्षिण बाजूच्या चढाई मार्गाने सर करण्याची मोहीम ही सर्वात कठिण मोहिम माझ्यासाठी होती.
नाणेघाट - ऑगस्ट १९७८,
बदलापूर नवरा-नवरी - नोव्हेंबर १९७८, माहुली - डिसेंबर १९७८, राजमाची - जानेवारी
१९७९, कर्नाळा - मे १९७९, तावली – जून १९७९, नागफणी - जुलै १९७९, कामणदुर्ग - सप्टेंबर
१९७९, चंदेरी - सप्टेंबर १९७९, लोहगड, विसापूर - नोव्हेंबर १९७९, तांदूळवाडी
किल्ला - डिसेंबर १९७९, इरशाळ, प्रबळगड, माथेरान - जानेवारी १९८०, मुंबई-पुणे
चालणे - मार्च १९८०, अशेरी गड, कोहोज - मार्च १९८०, रायगड – मार्च १९८०, पेब,
माथेरान - जुलै १९८०, नाणेघाट, जीवधन, चावंड, हडसर, लेण्याद्री, शिवनेरी – ऑगस्ट
१९८०, तावली सुळके - ऑक्टोबर १९८०, पदरच्या किल्ल्याचा कलावंणीचा महाल, प्रथमारोहण
– नोव्हेंबर १९८०, महालक्ष्मी सुळका - फेब्रुवारी १९८९, पेठ उर्फ कोथळीगड - जुलै
१९८१, राजगड - ऑगस्ट १९८१, ढाकभैरी – नोव्हेंबर १९८१. नकटा प्रथमारोहण – नोव्हेंबर
१९८१, नागेश्वर, वासोटा, महिपतगड, सुमारगड, रसाळगड – डिसेंबर १९८१, हडबिची शेंडी –
जानेवारी १९८२, लिंगाणा –जानेवारी १९८२, अडसुळे - फेब्रुवारी १९८२, कळकराय सुळका –
मार्च १९८२, माहुली ४५० फूट चिमणी प्रथमारोहण – एप्रिल १९८२, कोकणकडा उजवी माकडनाळ
– मे १९८२, लिंगाणा, भवानीकडा, हिरकणी कडा – नोव्हेंबर १९८२, कवनाई, धासकोन -
डिसेंबर १९८२, भैरवगड, दाऱ्या घाट, जानेवारी १९८३, प्रबळगड – फेब्रुवारी १९८३,
आजोबा – मार्च १९८३, चांदवड, इंद्राई, राजधेर, धोडप – एप्रिल १९८३, हरिश्चंद्र
नळीची वाट - मे १९८३, साल्हेर - ऑगस्ट १९८३, माणिकगड - ऑगस्ट १९८३, कुलंग, मदनगड,
अलंगगड नोव्हेंबर १९८३, नवरा उर्फ भटोबा –
प्रथमारोहण डिसेंबर १९८३, तैलबैला दुसरी भिंत प्रथमारोहण – मार्च १९८४, तुंगी
सुळका प्रथमारोहण – एप्रिल १९८४, गोरखग़ड, मच्छिंद्र - जुलै १९८४, वजीर,
प्रथमारोहण – डिसेंबर १९८४, लूज बोल्डर, प्रथमारोहण - फेब्रुवारी १९८५, राजगड,
तोरणा, लिंगाणा, रायगड सोलो ट्रेक – नोव्हेंबर १९८८, कोकणदिवा सोलो – ऑक्टोबर
२००९, नवऱ्याची करवली - जानेवारी २०११, पावनगड, पन्हाळगड, विशाळगड, पावनखिंड ट्रेक
- सप्टेंबर २०१४, डांग्या सुळका - नोव्हेंबर २०१४, अंजनेरी, नवरा- नवरी, घोडा
सुळके - जानेवारी २०१५, पहिने नवरी-नवरा सुळके – मार्च २०१५, मलंगगड - मार्च २०१६,
वानरलिंगी सुळका - मार्च २०१६, रोहिदास शेंडी सुळका - नोव्हेंबर २०१७, फंट्या
सुळका - एप्रिल २०१८, सांगनोरे सुळका व कोळेवाडींचा बुधला – मे २०१८ असे
गिर्यारोहण आणि प्रथम प्रस्तरारोहण मी खूप केले.
पिडारी ग्लेशियर
ट्रेक जून १९८३, सेंट्रल पिक मोहिम (५८१७ मिटर), अनामिक अजिंक्य शिखर जून १९८३,
रुदुगैरा मोहिम सप्टेंबर १९८३, सैफि मोहिम सप्टेंबर १९८४, माना नॉर्थ फेस मोहिम
ऑगस्ट १९८५ इत्यादी हिमालयातील पदभ्रमण व चढाई मोहिमा देखील केल्या आहेत. पार्ले,
मुंबई येथील ‘हॉलिडे हायकर्स’ व प्रामुख्याने निसर्गरक्षण आणि संवर्धन यात कार्यरत
असलेल्या ‘द नेचर लव्हर्स’, या संस्थाच्या साथीने माझी ही वाटचाल झाली.
मात्र सह्याद्रीतील
बाण सुळका चढायचा राहून गेला. त्यामुळे बाण व हिमालयातील एव्हरेस्ट शिखरावर आरोहण
करण्याची माझी खूप इच्छा आहे.
ही भटकंती करताना
वातावरणातील बदल जाणवू लागले. या जागतिक तपमान वाढीचं मुख्य कारण म्हणजे कार्बन
डाय ऑक्साईड या वायु मध्ये होणारी वाढ. अतिनील किरणे थेट पृथ्वीवर आल्यामुळे तपमान
वाढत आहे. पेट्रोलजन्य खाजगी वाहनांचा गरजेपेक्षा अधिक वापर होत आहे. तो टाळण्यासाठी
मी सार्वजनिक वाहन वापरण्याला प्राधान्य देतो. कार्बन डाय ऑक्साईडचा दुष्परिणाम
कमी करण्याचा वैयक्तित प्रयत्न म्हणून जमेल तितकी झाडं लावण्याचा प्रयत्न करतो व
इतरांनाही त्याचं महत्व पटवून देतो.
गिर्यारोहणातील
व्यावसायिकतेमुळे सहभागी सभासदांमधील भावनिक बंध नाहिसा होऊन, एकमेकांशी जुळवून
घेण्याची वृत्ती, परस्परांना मदत करण्याची वृत्ती नाहिशी झाली आहे, असे मला वाटते.
काही व्यावसायिक आयोजक गिर्यारोहण क्षेत्राकडे पैसा कमावण्याचे क्षेत्र समजून
सहभागी सभासदांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघातही वाढले आहेत.
व्यावसायिकरण विरहित
गिर्यारोहणात सामुहिक नेतृत्व गुणाच्या वाढीचा, पर्यावरण रक्षणाच्या अमाप संधी
आहेत. फक्त त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे.
गिर्यारोहणाने मला
दिलेला मंत्र म्हणजे, हाती घ्याल ते तडीस न्या. गिर्यारोहण करताना तात्रिक कौशल्य,
शारिरीक तंदुरूस्ती सोबतच अनुभवही तितकाच महत्वाचा असतो. म्हणून नविन मोहिमेसाठी
सभासद निवडताना प्रत्येकाची शारिरीक क्षमता जाणून त्याप्रमाणे त्याच्यावर जबाबदारी
सोपवायला हवी. ज्याभागात मोहिम आखली आहे. त्या परिसराची पूर्ण माहिती करून घेणे
महत्वाचे आहे. मोहिमेचा योग्य कालावधी निवडायला हवा. मोहिमेसाठी लागणारा अन्न
पुरवठा योग्यवेळी होण्यासाठी त्याचे तपशिलवार पँकिंग करणे महत्वाचे आहे.
मोहिमेसाठी लागणारे तांत्रिक साहित्य आगाऊ जमा करणे. प्रत्येकाच्या सुरक्षिततेचा
विचार करून त्याची उपाय योजना करणे आवश्यक आहे. मोहिमेत अनपेक्षित उद्भवू शकणाऱ्या
आपत्तीला तोंड देण्यासाठी एक राखीव गट तयार ठेवणे, हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मोहिमेसाढी
लागणारा पैसा, अन्न व औषधे याचं योग्य नियोजन करावे व मगच मोहिमेवर निघावे.
शिखरावर चढाई करताना
विरळ हवामानात श्वासोच्छवास करताना होणारा त्रास ही माझा कमजोरी जरी असली तरी
मजबूत इच्छाशक्तिच्या जोरावर मी मोहिमा पार पाडल्या आहेत..
तसे गिर्यारोहण
करताना पूर्वी झालेल्या चुका पुढल्या वेळी टाळणे व पाहिलेल्या चुका आपण न करणे हा
धडा मी शिकलो. मार्च २०१६ला वानरलिंगी सुळका चढताना अपेक्षे पेक्षा उशीर झाला.
साहजिकच उतरायला उशीर झाल्यामुळे काळोखात उतरताना ऱँपलिंग करण्याचा एक रोप अडकून
राहिला, दुसरा हाताशी असलेला रोप वापरण्यापूर्वी अडकलेल्या रोपवरून दुसऱ्या रोपवर
चेंज ओव्हर करायला गेलो तर सोबत असलेल्या मुलीचे केस त्यात गुंतले गेले. ती अशा
रितीने अडकली की तिने जगण्याची आशाच सोडली. मग उपाय म्हणून वरचा अडकलेला दोर कापून
केसही कापायला लागले. नंतर तिला दुसऱ्या रोपने सुरक्षित रित्या खाली आणण्याचे काम
रात्रीच्या अंधारात करण्याचे अवघड दिव्य पार पाडावे लागले.
मी सायकलिंग पण केले
पण एकदाच, मित्राची गियर नसलेली साधी सायकल घेऊन डिसेंबर १९८३ मध्ये रेवस ते पणजी
असा किनार पट्टीने प्रवास केला आहे.
एडमंड हिलरी हा माझा
आवडता गिर्यारोहक तर रायगड व माहुली हे आवडते गड आहेत. १९८४ साली नवीन नेतृत्वाला
वाव देण्यासाठी आखलेली माहुलीतील सुळके आरोहणाची, ‘आरोहणाचा अश्वमेघ’ ही आवडलेली मोहिम होय.
गिर्यारोहण क्षेत्राच्या
सुदृढ वाढीसाठी या क्षेत्रात आलेली बाजारू वृत्ती दूर करण्याची पहिली गरज आहे.
संस्थात्मक गिर्यारोहणाला पुन्हा चालना देण्याचीही गरज आहे, असे मला वाटते.