Sunday, October 17, 2021

आनंद पाळंदे

सत्तर वर्षीय श्री. आनंद पाळंदे यांनी गेली ५० वर्षे गिरिभ्रमणाचा आनंद लुटला आहे. महाराष्ट्रातील सह्य पर्वतामधील एकही डोंगरदरी, एकही दुर्गकपार किंवा एकही पठारप्रदेश नसेल जेथे पाळंदे यांनी भ्रमण केलेले नाही.

१९६४ मध्ये साहित्यिक गो नी दाण्डेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढलेल्या दहा दिवस दहा दुर्गया यात्रेच्या पुण्यातील कार्यक्रमातून व शाखेच्या किल्ल्यांच्या सहलीतून त्यांना गडदुर्गांची ओळख झाली. व पुढे त्यांचे बंधू इतिहासाचे अभ्यासक श्री. रमाकांत पाळंदे यांच्यामुळे वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी दुर्ग पर्यटनाला आणि गिरिभ्रमणाला सुरुवात केली. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सानिध्यामुळे पाळंदे यांचे सह्याद्री गिरिभ्रमण हे अधिकाधिक डोळस होत गेले. श्री. चंद्रकांत वाकणकरमुळे, मुंबईतील गिरिविहार संस्थेचे ते सभासद झाले. त्यांच्या हाईकमधून डोंगरातील आनंद अधिक समजून घेता आला. बैंक आफ बरोडातील नोकरीत आर्थिक स्थैर्य लाभल्यामुळे आवड जोपासत अभ्यास करणे सुलभ झाले. पुढे त्यांनी भारत आऊटवर्ड बाउंड पायोनियर्स या संस्थेचा रॉक क्लाइंबिंगचा कोर्सही केला.

गुरूवर्य डॉ.बापूकाका पटवर्धन, श्रीमती उषःप्रभा पागे, प्रा. सीताराम रायकर, श्री. दिलीप निंबाळकर इत्यादी सुहृदांच्या, जवळकीच्या मार्गदर्शनामुळे पाळंदेंच्या गिरिभ्रमणाला, डोंगरयात्रेला एक क्रीडा म्हणून परिमाण लाभले. आणि माऊंटेनियरिंग खेळाकडे ते ओढले गेले.

इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि  गिरिभ्रमणातील आनंद हे दुर्गांकडे आकर्षित होण्याचे प्रमुख कारण आहे, तर भव्यता, साहस व माऊंटेनियरिंग खेळाची खुमखुमी हे हिमालयाकडे आकर्षित होण्याचे कारण आहे, असे ते म्हणतात.

त्यांनी बेसिक माऊंटेनियरिंग कोर्स, नेहरू पर्वतारोहण संस्था, उत्तर काशी येथे १९७५ मध्ये पूर्ण केला. व नंतर गिरिभ्रमण संस्थेच्या १९७७ मधील श्रीकैलास मोहिमेत भाग घेतला. १९७८ मध्ये शितीधर शिखर सर केले. पुढे गंगोत्री हिमालयातील रुदुगैरा व थेलू या मोहिमांत नेतृत्व केले.

तर १९८६ मध्ये देवबन, ही गिर्यारोहण कारकीर्दीतील सर्वात कठीण मोहीम त्यांनी पार पाडली. या मोहिमेत बेस कॅम्पवरूनच परतावे लागले. प्रतिकूल हवामान आणि हिम वर्षावाला त्यांना तोंड द्यावे लागले. एकूण सात माऊंटेनियरिंग मोहिमा केल्या. काही मोहीमांचे नेतृत्वही केले. एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे ते बेस कॅम्पवरून शिखर पूर्व तळावर पोहोचले होते. त्यावेळी हवा प्रतिकूल असल्याने त्यांना बेस कॅम्प गाठावा लागला. पण, पुन्हा नव्याने चढाईची मानसिकता त्यांनी ठेवली.

हिमालयीन मोहिमेसाठी गिरिभ्रमण, कातळारोहण, हिम-बर्फारोहण अशा रितीने तीन टप्प्यांत खेळात प्रगती करावी. आठ हजारी मोहिमेच्या झटपट मागे लागणे नको. तसेच माऊंटेनियरिंग करताना स्वयंसिद्ध पद्धतीने मोहीम राबवावी. अशा पद्धतीने अनुभव आणि वारंवार प्रयत्न केल्याशिवाय यशप्राप्ती शक्य होत नाही. पण आनंद द्विगुणित होतो. शिखरापर्यंतचा प्रवास हा अन्य शिखरांवर चढाई करताना प्रेरित करतो. शिखरांवर चढाई करायला, तसा माणूस हा कमजोरच आहे. गिर्यारोहण खेळात स्पर्धा नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आनंदी बनावे इतकेच. आपली आवड हीच शक्ती आहे. गिर्यारोहण करताना झालेल्या चुकांतून धडा म्हणजे, वातावरणाशी समरसता हवीच, उत्तम साधने हवीत, माघार म्हणजे आयुष्यातील अपयश नाही हे कायम मनात असले पाहिजे. चार ते सहा जणांचा लहान संघ मोहिमेत असावा. त्याने पर्वतावर, वातावरणावर प्रतिकूल परिणाम होणार नाही. शेर्पा, गाईड फक्त सहकारी म्हणून असावे. सारथी नकोत,’ असे ते म्हणतात. अल्पाईन पद्धतीला, त्यांचा मनापासून पाठिंबा आहे. कारण सोपे ते कठीण अशी वाटचाल हेच खेळाचे सूत्र असते. शिवाय ही पद्धत सर्वांत पर्यावरण अनुकूल आहे.

या निकषातून १९८२ मध्ये उषःप्रभा पागेंच्या सहकार्याने गिरीप्रेमी संस्थेची स्थापना त्यांनी केली. पहिली मोहिम उष:प्रभा पागेंच्या नेतृत्वाखाली आखली. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी शशी रानडे, श्रीकांत ओकच्या मार्गदर्शनाखाली दुधा स्लॅब येथे अवघड रॉक क्लाइंबिंगची माहिती करून घेतली, सराव केला आणि पारसिक पिनॅकल चढून त्यावर शिक्का मोर्तब केले. गिरिप्रेमीची लिओ पार्गियलही पहिलीच मोहिम यशस्वी झाली.

१९८४ मध्ये कामेत रांगेतील बिधन पर्वत मोहिम यशस्वी,  तर १९८६ मध्ये याच शिखराच्या शेजारील देवबन शिखऱ सर करण्याचा प्रयत्न त्यांना अर्धवट सोडावा लागला.

त्यांनी कर्नाळा व लिंगाणा या सुळक्यांवर देखिल छोट्या संघातून चढाई केली आहे.

त्यांच्या मते, किल्ले पर्यटन म्हणून गिर्यारोहण करताना शारीरिक तंदुरुस्ती पुरेशी आहे. अनुभव आवश्यक नाही. पण माऊंटेनियरिंग खेळ म्हणून गिर्यारोहण करताना प्रशिक्षण, सराव आणि प्रदीर्घ प्रयत्न हवेत.

 मनोहर', 'केसरी', 'स्वराज्य', 'सकाळ', 'महाराष्ट्र टाईम्स', ‘जिद्द इत्यादी नियतकालिकांनी गिरिभ्रमणातील अनुभव शब्दबध्द करण्यास त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले. त्यातूनच पुढे आव्हान', ‘गिरीदुर्गांच्या पहाऱ्यातून',  'दुर्ग तोरणा'दुर्ग पुरंदर ही पुस्तके निर्माण झाली. माऊंटेनियरिंग म्हणजे काय हे त्यांच्या 'गिर्यारोहण गाथा आणि रोमांचक गिर्यारोहण' या पुस्तका मधून समजते. तरुण, तरुणींमध्ये गिरिभ्रमणाचे प्रेम निर्माण व्हावे, गिरिभ्रमणाचेही एक शास्त्र असते, त्याची पथ्ये असतात आणि अशी डोंगरयात्रा-क्रीडा अधिकच निखळ आनंददायी ठरते, हे अनेकांना कळावे ह्या हेतूने पाळंदे यांनी 'डोंगरयात्रा' या ग्रंथाची रचना केली आहे.

२०१९ मध्ये बेस कॅम्पवरूनहे पुस्तक प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचे अनुभव कथन, त्यांनी इतर मान्यवरांच्या सहकार्याने यामध्ये संपादित केले आहे.

गिर्यारोहणामध्ये काही प्रमाणात झालेल्या व्यावसायिकरणामुळे माऊंटेनियरिंग खेळाची पिछेहाट झाल्यासारखी वाटते. व्यवसाय करणाऱ्या मंडळींचा, साहसी पर्यटक अथवा आरोहक यांचा योग्य फायदा झाला आहे. एजन्सी व्यवसायाला संधी निर्माण झाली, साधनसामुग्री कारखानदारी, दुकाने वाढली. स्थानिक वाटाडे, शेर्पा, हॉटेल आदिंचे उत्पन्न वाढले. चांगले मार्गदर्शक तयार झाले आणि पुढे होतील. या गिर्यारोहणातील संधी आहेत, असे ते म्हणतात.

प्रयत्न, निडरपणा, स्वावलंबी आनंदी जीवन, साहचर्य आदी गुण गिर्यारोहणामुळे वाढले, असे त्यांना वाटते.

आता वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली आहे. पण  अल्पाईंन पध्दतीने तसेच शेर्पा शिवाय आणि प्राणवायूचे सिलिंडर न वापरता आठ हजारी शिखरावर जर एखाद्या भारतीयाने चढाई केली तर त्यांचे कौतुक करायची त्यांची इच्छा आहे. यासाठी व्यावसायिकांनी आर्थिक वाटा उचलावा. तसेच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जिल्हा पातळीवर माऊंटेनियरिंगचा प्रसार केला पाहिजे असे त्यांना वाटते. हा खेळ योग्य नियम पाळले तर जीवनशैली बदलणारा आहे. अर्थात यासाठी माऊंटेनियरने स्वमूल्यमापन करणे गरजेचे आहे. तसेच निकष पक्के करून संघटनेने पारितोषिके द्यायला हवीत. बेस कॅम्पवरून हे पुस्तक त्यादृष्टीने अभ्यासावे असे त्यांचे मत आहे.

डोंगरांमधून पावलांच्या ठशां शिवाय काही ठेऊ नका, सुखद आठवणीं वाचून काही नेऊ नका, हा संदेश ते सर्वांना देतात.

त्याच्या डोंगरयात्रा या पुस्तकाला १९९४ मध्ये केसरी-मराठा संस्थेचा पुरस्कार मिळाला. २०१० मध्ये महाराष्ट्र सेवा संघाचा साहित्य पुरस्कार, २०११ मध्ये गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचा पुरस्कार आणि २०१३ मध्ये गिरीमित्र जीवनगौरव पुरस्कार, अश्या विविध पुरस्कारांनी ते गौरविले गेले आहेत. मात्र हे सर्व साहित्य पुरस्कार आहेत. माऊंटेनियरिंग खेळाचे पारितोषिक निकषच नाहीत तर पुरस्कार कसे अशी खंत ते अखेर व्यक्त करतात.

7 comments:

  1. इतक्या तपशीलात वाचायला मिळालं .अतिशय सुंदर लिहिलं आहे . पाळंदे सरांची बहुतेक सगळी पुस्तकं मी वाचली आहेत . त्यांचा मुलगा ह्रषिकेशचंही वाचलय . passion काय असतं ते सरांकडे पाहुन समजतं
    adv seemantini noolkar satara

    ReplyDelete
  2. पाळंदे सरांची फार छान माहिती दिली आहे. त्यांची पुस्तके गिर्यारोहण क्षेत्रासाठी चांगली मार्गदर्शक आहेत.

    ReplyDelete
  3. पाळंदे सरांचा गिर्यारोहण कार्यकिर्दी बद्दल खूप चांगली माहिती लिहिली आहेत.

    ReplyDelete
  4. Excellent. He supported, guided, helped a lot in my early days.
    A true gentleman

    ReplyDelete
  5. पाळंदे सर , उषाताई व इतरांनी सुरू केलेल्या गिरिप्रेमी संस्थे मध्ये मला जे सतत मार्गदर्शन मिळत आहे हि माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे असे मी समजतो. पाळंदे सरांचे काम खूप मोठे आहे. मन:पूर्वक प्रणाम!

    ReplyDelete
  6. श्री आनंद पाळंदे यांचा हा गिर्यारोहणातील प्रवास अतिशय प्रेरणा देणारा व मार्गदर्शक आहे त्यांचे लेखनही तसेच आहे मात्र याचा प्रसार वाढायला हवा आते आपले सर्वांचे काम आहे.....असे वाटते....

    ReplyDelete