Friday, October 1, 2021

 प्रदीप सदाशिव केळकर

प्रदीप तसा लहानपणापासून उत्तम जलतरणपटू आहे. तसेच जिल्हा पातळीवर खो खो खेळाचा दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. सतत काहीतरी नवीन करायचं, काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम हातात घेत यशस्वीपणे राबवायचे, ही त्याची वृत्ती,  यातूनच १९७८ ला पहिल्यांदा तो निसर्गामध्ये भटकंतीला गेला आणि बघता बघता निसर्गाच्या प्रेमातच पडला.

१९७९ ते १९८१ दरम्यान तो फक्त गिर्यारोहण करत होता. पण ते करता करता हळूहळू मुंब्र्याच्या डोंगरावर त्याचा प्रस्तरारोहणाचा सराव चालू झाला. या दरम्यान त्याचा मित्र राजेंद्र रानडे याच्या माध्यमातून हॉलिडे हायकर्स व नेचर लवर्स या मुंबईच्या नामांकित संस्थेची त्याची ओळख झाली. त्यां संस्थां बरोबर २५ जानेवारी १९८१ रोजी लिंगाणा सुळक्यावर त्याने यशस्वी चढाई केली. हिरा पंडित, दिलीप झुंजारराव, रमाकांत महाडिक, नरेंद्र सेठिया, जगन्नाथ राऊळ अशा दिग्गजां बरोबर प्रस्तरारोहण मोहिमांचा श्री गणेशा झाला. पुढील काळात प्रजापती बोधने, कै. अरुण सावंत कै. मिलिंद फाटक यांच्या सारख्या निष्णात गिर्यारोहकाकडून त्याला खूप काही शिकायला मिळाले.

हे सर्व करत असताना किर्ती कॉलेज मध्ये दोन वेळा व पेंढारकर कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष प्रस्तरारोहणाच्या प्रात्यक्षिकांचे धडे त्याने दिले आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्रातील अनेक कॉलेजांमध्ये कृत्रीम प्रस्तरारोहणाचे अनेक उपक्रम यशस्वीपणे त्याने राबविले आहेत.

आत्तापर्यंतच्या त्याच्या वाटचालीत ३० अजिंक्य तर ३० ते ४० अजिंक्य मार्गाने चढाई करत त्याने सुळके सर केले आहेत. जानेवारी २००८ रोजी म्हणजेच त्याच्या यशस्वी दहाव्या लिंगाणा चढाई मोहीमेत, त्याला पहिल्या अवघड लिंगाणा मोहिमेत मदत करणाऱ्या स्थानिक गावकरी बबन याच्या नऊ वर्षाच्या मुलाला लिंगाण्याच्या माथ्यावर यशस्वीपणे पाय रोवण्यास मदत करण्याचे भाग्य त्याला मिळाले. विशेष म्हणजे लिंगाणा मोहिम त्याच्यासाठी कायमच आव्हानात्मक तसेच स्फूर्तीदायक व खास राहिली आहे. १६ नोव्हेंबर १९८४ मध्ये त्याने लिंगाणा सुळक्यावर एकट्याने यशस्वी चढाई केली होती. परंतु त्यावेळेला आत्ता एवढी प्रसार माध्यमे उपलब्ध नसल्यामुळे फार थोड्या गिर्यारोहकांना या घटनेची माहिती झाली. त्यामुळे काही काळाने ह्या यशस्वी एकट्याने केलेल्या मोहिमेची महाराष्ट्रात नोंद घेतली गेली.

सह्याद्रीत मोहिमा चालू असतानाच त्याला हिमालयाचे वेध लागले. १९८३ मध्ये मनाली येथे पर्वतारोहणाच्या बेसिक कोर्स मध्ये श्रेणीमध्ये त्याने प्रावीण्य मिळवले. मग पुढील वाटचालीत पाच हिमालयन मोहिमां मध्ये यशस्वी सहभाग घेतला. आणि या सर्व अनुभवाच्या जोरावर सहा हाय अल्टिट्युड ट्रेकचे यशस्वी आयोजन केले.

गेली ३६ वर्षे प्रस्तरारोहण शिबिरातून अनेकांना त्याने मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट सेक्टर मध्ये ११० कंपन्यांचे कार्यक्रम आउटडोर एक्सपर्ट या नात्याने यशस्वीपणे राबविले आहेत.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे १९८६ साली पहिल्यांदा कोकणातील मुलांसाठी रत्नागिरीमध्ये गिर्यारोहण क्षेत्राच्या वाढीसाठी प्रस्तरारोहण शिबिराचे आयोजन केले. त्यानंतर स्थापन झालेल्या रत्नदुर्ग माउंटेनियर या कोकणातील एकमेव रजिस्टर संस्थेला सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेने या वाटचालीत अत्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. आपत्ती व्यवस्थापनात जिल्हा पातळीवर अनेक वेळा संस्था सरकारी कामात मदतीसाठी धावून गेली आहे. आज संस्थेमध्ये दुसरी पिढी अत्यंत सक्षमपणे कार्यरत आहे. या संस्थेला नुकताच शिखर सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार', स्वा. सावरकर स्मारक, मुंबई यांच्या वतीने घोषित झाला. संस्थेचा प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्थातच प्रदीप कौतुकास पात्र आहे.

हे सर्व करत असताना किर्ती कॉलेज मध्ये दोन वेळा व पेंढारकर कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष प्रस्तरारोहणाच्या प्रात्यक्षिकांचे धडे त्याने दिले आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्रातील अनेक कॉलेजांमध्ये कृत्रीम प्रस्तरारोहणाचे अनेक उपक्रम यशस्वीपणे त्याने राबविले आहेत.

आत्तापर्यंत त्याने टकमक कड्यावरून सात ते आठ वर्ष, तसेच ड्युक्स नोज वरून चार ते पाच वर्ष याच बरोबर नानाच्या अंगठ्यावर वरून रॅपलिंगचे कार्यक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. तीन-चार वर्ष वॉटरफॉल रॅपलिंगचेही आयोजन यशस्वीपणे केले आहे.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेल लीला येथे दिनांक १५ ऑगस्ट २०१२ रोजी एन. एस. जी. कमांडोच्या नंतर यशस्वी प्रात्यक्षिके दाखविण्याचे भाग्य त्याला मिळाले. हे पहिलेच नागरी सादरीकरण होते. १९९१ च्या पहिल्या राज्यस्तरीय प्रस्तरारोहण स्पर्धेत तो दुसरा व १९९३ मध्ये झालेल्या स्पर्धेत तो चौथा आला होता. तसेच १९९४ झाली झालेल्या पहिल्या राष्ट्रीय वॉल क्लाइंबिंग स्पर्धेत महाराष्ट्रातून त्याची निवड झाली होती.

तापर्यंत महाराष्ट्रभर अनेक स्लाईड-शो द्वारे त्याने मुलांच्या मनात जिद्द, चिकाटी व साहस तसेच नेतृत्वगुण जोपासण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

१९८६ साला पासून एका गरजू विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीला शिबिरामध्ये निशुल्क प्रवेश देण्याची संकल्पना राबवणारा कदाचित तो पहिला गिर्यारोहक असे. अनेक वर्षे या क्षेत्रात निस्पृहपणे वैयक्तिक व संस्थात्मक प्रशिक्षि देत, आज तो सक्षम पणे या क्षेत्रात स्वतःची कामगिरी पार पाडत आहे.

 हे सर्व करत असताना त्याने सामाजिक बांधिलकी जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे १९८५ झाली आंतरराष्ट्रीय युवक वर्षात प्रयत्नांची शर्थ करत रात्री ते १२ या वेळात, राजगड किल्ल्याच्या कड्यावर अडकलेल्या गिर्यारोहकांना सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच १९८६ साली अजिंक्य बा मोहिमेत झालेल्या अपघातात क्षणाचाही विलंब न करता, गिर्यारोहक मित्राची त्याने सुटका केली आहे. त्याच बरोबर ड्युक्सनोज रॅपलिंगच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका मुलीचेही प्राण वाचविले आहेत.

एक जून १९९७ रोजी भर पावसात किल्ले माहुली येथे एक हजार फूट खोल दरीमध्ये रॅपलिंग करत उतरत गिर्यारोहकाचा मृतदेह काढला आहे. तसेच किल्लारी भूकंप मदत पथकात दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व करून सलग आठ दिवस मदतीचे कार्य केले आहे.

नोव्हेंबर २०१८ साली ३८ किलोमीटरची गिरनार परिक्रमा पावणे आठ तासात त्याने पूर्ण केली. एक दिवसानंतर गुरुशिखराच्या दहा हजार पायऱ्या केवळ पाच तासात चढून पुन्हा खाली सुखरूप पोहोचला आहे.

१९९७ला क्रिकेट विश्वचषकासाठी बनविलेल्या कॅडबरी पिकनिक या जाहिरातीचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही त्याने काम पाहिले.

जुलै २००२ मध्ये झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय गिरीमित्र संमेलनाच्या प्रमुख पदी त्याची निवड झाली होती. तसेच सहा जून २००६ मध्ये झालेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या उपाध्यक्ष पदाचे भाग्य त्याला लाभले.

१४ ऑगस्ट २०१६ मध्ये कॅलिफोर्नियामधील माउंट डेना  हे शिखर त्याने सर केले. त्याच बरोबर १५ ऑगस्ट २०१६ रोजी साडेआठ हजार फुटावरून भारताचा तिरंगा हातात धरून कॅलिफोर्नियामध्ये स्काय डायव्हिंग केले.

या ४२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये गिर्यारोहण व सामाजिक क्षेत्रात अनेक पुरस्कार त्याला मिळाले. त्यातील काही अभिमानास्पद पुरस्कार म्हणजे, श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार - महाराष्ट्र राज्य, ठाणे महापौर व ठाणे गौरव पुरस्कार - ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र सन्मान - एचआरडी संस्था, गिरीमित्र गिर्यारोह सन्मान - महाराष्ट्र सेवा संघ, ठाणे रत्न - हिंदुस्थान टाइम्स, केळकर कुलभुषण पुरस्कार - केळकर कुळसंमेलन २०२०, गडकोटांचे मानकरी सह्याद्री मित्र संमेलन, याच बरोबर लायन्स क्लब, रोटरी एक्सलन्स ॲवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी त्याला गौरविले आहे.

बाण सुळक्यावर आनंद शिंदे सोबतआजपर्यंत दृक-श्राव्य माध्यमातून अनेक ठिकाणी त्याच्या मुलाखती झाल्या असून वृत्तपत्रांमध्ये देखील अनेक मुलाखती व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

या सर्व अभिमानास्पद वाटचालीत त्याला बेस्ट उपक्रमातील त्याचे सहकारी. गिर्यारोहक व गिर्यारोहण संस्था, तसेच आप्तस्वकिय यांचे मोलाचे योगदान आहे, असे तो आवर्जून सांगतो.

३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर, सप्टेंबर २०१५ रोजी मुंबईच्या बेस्ट उपक्रमातून तो निवृत्त झाला. पण अजूनही तो त्याच उमेदीने गिर्यारोहण करत असतो.

11 comments:

  1. एका अनोख्या अप्रतिम व्यक्तिमत्वाची सुंदर आणि परिपूर्ण ओळख करून दिली आहे. एक उल्लेख करायला हवा,तो म्हणजे (माझ्या माहितीप्रमाणे) गिर्यारोहणासाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे ते पहिले मानकरी आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. गिर्यारोहणातील प्रथम शिवछत्रपती पुरस्कार::
      श्री प्रजापती बोधने.(1986 किंवा 1987)

      Delete
    2. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.💐💐


      Delete
    3. एक कॉमेंट नेटवर्क समस्येमुळे तीन वेळा आली आहे.क्षमस्व.
      ह्या सर्व्हर मध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असावा असे दिसते आहे.तारीख आणि वेळ चुकीची दाखवित आहे.
      (05/10/2021@8.47)

      Delete
  2. धन्य आहोत आम्ही तुमचे ज्यांना तुमच्यासारखे गुरू लाभले..

    ReplyDelete
  3. Dear
    Pradeep
    You are simply the Great...

    ReplyDelete
  4. प्रदीप ने आमच्या बरोबर गंगोत्री परिसरातील मंदा 1 या मोहिमेमध्ये 1991 मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या सदा उस्तही व्यक्तिमत्वाचे जवळून ओळख झाली.
    प्रदीप ला उदंड शुभेच्छा !
    उमेश झिरपे

    ReplyDelete
  5. अभिनंदन आणि शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. �� नमस्कार! आपल्या उत्तुंग वाटचाली बद्दल खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद!

    ReplyDelete
  7. मनापासुन अभिनंदन!पुढिल वाटचालीबद्दल शुभेच्छा!आपली गिरीभ्रमनाची आवड बघुन आम्हीपण बर्‍याच ठिकाणी गिरीभ्रमण करु लागलोय.अशीच स्फुर्ती आपणाकडुन सर्वांना मिळो हिच अपेक्षा

    ReplyDelete
  8. अभिनंदन सर तुमच्या कार्याला सलाम.

    ReplyDelete