वयाच्या २४ व्या वर्षी, म्हणजे १९७२ साली पदभ्रमणाला सुरुवात केली. १९७२ साली पावसाळ्यात कॉलेजच्या मित्रांबरोबर माथेरानला गेलो होतो. तेंव्हा वन ट्री हिलच्या पायथ्याच्या वरोसे गावातले, प्रसिद्ध शिकारी श्री. अर्जुन शिंदे यांच्याबरोबर तेथील परिसरात भटकंती केली, ती मनाला भावली. हीच पहिल्या भटकंतीची सुरुवात होय.
मग १९७५
साली हिमालय
पर्वतारोहण संस्थेतून प्राथमिक पर्वतारोहणाचे प्रशिक्षण व १९७६
साली तेथूनच प्रगत पर्वतारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले.
त्यावेळी या संस्थेचे संचालक तेनसिंग नोर्गे होते व त्यावेळी दोन वेळा एव्हरेस्ट
शिखर सर करणारे, पहिले गिर्यारोहक नावांग गोम्बू आमच्या गटाचे नेते होते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले.
१९७७
साली तेलबैलाच्या पहिल्या भिंतीची (गुहा असलेल्या बाजूने) ‘प्रथम चढाई’ केली. हीच लिंगाणा सुळका चढाई मोहिमेची
मुहुर्तमेढ होती. त्यानंतर वांगणी जवळील चंदेरी, म्हसमाळ येथील डोंगरवजा
सुळक्यांवर चढाया केल्या.
१९७८
साली २६ डिसेंबरला लिंगाणा सुळक्याची ‘प्रथम चढाई’
केली आणि हीच महाराष्ट्रातील सुळके चढाईची खरी सुरुवात होती. या साहसासाठी शिवसेना
प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात
सत्कार तर केलाच; शिवाय पुलंनी पत्र लिहून खास अभिनंदन केलं होतं.
१९८२
साली केलेली दौंड्या उर्फ भिल्लीणीचा पूड उर्फ नांगरदार ही घाटवाट देखील कस
पाहणारी होती.
१९८३
साली माहुली किल्ले समुहातील नवरा उर्फ भटोबा सुळक्याची केलेली चढाई, ही आजवरची
सर्वात आव्हानात्मक चढाई होती.
हिमालयातील
मोहीमा १९७७ पासून सुरु झाल्या. पहिली मोहीम श्रीकैलास वर केल्यावर, १९७८ साली
जोगीन ३, १९७९ साली मात्री, १९८१ साली कोटेश्र्वर, १९८२ साली भागिरथी २, १९८३ साली
कोटेश्र्वर हिवाळी मोहीम, १९८४ साली योगेश्वर, सेंट्रल पिक, स्टोक कांग्री अशा सतत
चालू असलेल्या हिमालयातील मोहीमा वयाच्या ७४ व्या वर्षीही चालू आहेत .
१९८६
साली पुण्यातील गिर्यारोहक श्री. नंदू पागे यांचे सतोपंथ शिखरच्या पायथ्याशी
हिमकडा कोसळून निधन झाले होते. तो गाडलेला तंबू आणि शव शोधण्यात मोलाची कामगिरी
बजावता आली.
१९९२
साली पत्नी व दोन मुलं यांना सोबत घेऊन मुंबई - लेह - खारदुंगला पास - मुंबई अशी मोटारसायकल
मोहीम पार पाडली. यानंतर दोनदा पुन्हा लेह - लडाख
मोहीमा यशस्वी केल्या. त्यानंतर तीन वेळा स्कॉर्पिओने सहकुटुंब लेह - लडाख
मोहिमा पूर्ण केल्या .
महाराष्ट्रातील
१५-१६ गुहा शोधून, ‘भुयार
शोधन’ या क्षेत्राची
महाराष्ट्राला प्रथमच ओळख करुन दिली. त्यातील अंबोलीच्या हिरण्यकेशी मंदिरापाठील
भुयाराचा शोध घेत, हिरण्यकेशी नदीच्या उगमाचा प्रथमच शोध घेतला. याशिवाय अनेक
गडांवरील, सागरी किल्ले आणि भुईकोटांमधील विस्मृतीत गेलेल्या गुहा उजेडात आणल्या.
याशिवाय नव्या पिढीतील असंख्य तरुणांना गिर्यारोहण क्षेत्रात पुढे आणण्याचे व्रत, वयाच्या ७५ व्या वर्षातही चालू ठेवले आहे.
Nice info Sunil .
ReplyDelete