पद्माकर सदाशिव गायकवाड
सभोवताली डोंगर आणि मधोमध वसलेले आमचे हे खोपोली गाव. आता मात्र झाले शहर. यामुळे रोजच डोंगरांचे दर्शन व्हायचे. शिवाय उदरनिर्वाहासाठी, लाकूड फाटा गोळा करण्यासाठी, अगदी लहानपणा पासूनच डोंगरात जाणे, आम्हाला क्रमप्राप्त होते, त्यामुळे "informal" गिर्यारोहणाची सुरुवात हि अगदी लहानपणीच झाली.
लहानपणापासून खेळाची आवड असल्याने त्यावेळेच्या स्थानिक परस्थितीनुसार
"कुस्ती" या खेळाकडे प्रथम वळलो. शालेय स्तरापासून ते राज्य व राष्ट्रीय
स्तरापर्यंत अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले व अनेक पदके संपादन केली. विद्यापीठ
स्तरावर सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्तरावरील आंतर विद्यापीठ स्पर्धेत
खेळण्याची संधी मिळाली.
वैयक्तिक खेळाबरोबरच सांघिक खेळ अर्थात आपला राष्ट्रीय खेळ "हॉकी"
या खेळात सुद्धा शालेय स्तरापासून ते राज्य, राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. अशा या मूळच्या खिलाडू
वृत्ती मुळे या साहसी खेळाकडे वळणे सोपे गेले.
पण खऱ्या अर्थाने माझ्या "Formal" गिर्यारोहणाची सुरुवात हि वयाच्या २०व्या
वर्षी म्हणजे १९८२ साली झाली.
२५ डिसेंबर १९८२ ते ३ जानेवारी १९८३ या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या वतीने, गुजरात स्टेट माऊंटेनिरींग इन्स्टिट्यूट, माउंट अबू, राजस्थान येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ‘बेसिक रॉक क्लाइंबिंग कोर्स’ चे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण
शिबिरात,
खोपोलीच्या के.
एम. सी. महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक श्री. माधव गोंडा आणि
विद्यार्थी म्हणून मी आणि माझा वर्गमित्र मोहन पाटील असे तीघे जण सहभागी झालो.
गिर्यारोहण कारकिर्दीला या प्रस्तरारोहण प्रशिक्षणाने माझी सुरुवात झाली.
कर्नाळा सुळका पहिल्यांदा सर केला.
पुढे १९८३ मध्ये हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ‘वेस्टर्न हिमालया माऊंटेनिरींग इन्स्टिट्यूट’ येथून बेसिक माऊंटेनिरींग प्रशिक्षण पूर्ण
करून हिमालयातील गिर्यारोहण कारकिर्दीलाही सुरुवात केली.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आपल्या इतर मित्रांना या साहसी
खेळाची माहिती दिली,
एक ग्रुप तयार
झाला आणि गडकिल्ल्याच्या भटकंतीला सुरुवात झाली.
अनेकांना गिर्यारोहण,
प्रस्तरारोहण
याचे वेड लागले,
आणि त्याचे
प्रत्यंतर 'यशवंती हायकर्स', खोपोली या संस्थेच्या स्थापनेत झाले.
१२ मार्च १९८३ रोजी खंडाळ्या जवळ असलेल्या नागफणी (Duke's Nose) या गिरीशिखरावर श्रीफळ वाढवून यशवंतीच्या
कार्याला सुरुवात झाली.
यशवंतीच्या प्रस्तरारोहण मोहिमा आणि गडकोट, लेण्यांची भटकंती सुरू झाली.
१९८० ते १९९० या दशकात महाराष्ट्रात प्रस्तरारोहण
मोहिमांचे अक्षरशः पेव फुटले होते. त्यात यशवंतीचाही खारीचा वाटा होता. या
मोहिमांचे नियोजन आणि नेतृत्व करण्याची संधी सुदैवाने मला मिळाली.
सह्याद्री व हिमालयातील गिर्यारोहण, प्रस्तरारोहण आणि पदभ्रमण मोहिमां बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात यशवंतीचे नाव
विशेषत्वाने घेतले जाते ते कार्य म्हणजे विमोचन कार्य (Rescue Operation) .
गिर्यारोहणातील अनुभव आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून आजपर्यंत पन्नास हून अधिक
विमोचन कार्य संस्थेने केले आहे. यातील अनेक मोहिमांचे नियोजन व नेतृत्व करून
सहभागी होण्याची संधी मला प्राप्त झाली.
यशवंतीच्या माध्यमातून सह्याद्री पर्वतातील कर्नाळा, हडबीची शेंडी, हरिश्चंद्र गडाची शेंडी, लेंडा सुळका,
वणार टोक, ढाक बहिरी, खडा पारशी, तेलबैला, लिंगाणा, सरसगड भिंत, माणिकगड लिंगी,
नागफणी (Duke's Nose), नवरा, नवरी, वन ट्री हिल,
इरशाळ गड दक्षिण
माची इत्यादी प्रस्तरारोहण मोहिमांचे नियोजन व नेतृत्व करून सहभागी होण्याची संधी
मला प्राप्त झाली.
हिमालयातील हनुमान तिब्बा, फ्रेंडशिप, लदाखी,
शितिधार, श्री कैलास, जोगिन १-२-३,
देव तिब्बा, मनाली, मकरबेह इत्यादी गिर्यारोहण मोहिमांमध्ये सहभागी होता आले. यातील १९९० साली आयोजित करण्यात आलेली गढवाल हिमालयातील श्रीकैलास (२२७४४ फूट) हि मोहीम संस्मरणीय ठरली.
निसर्ग नियम पाळून, पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करून कमीत कमी वस्तूंचा वापर करून जीवन जगण्याचा मंत्र, प्रा. माधव गोंडा सर यांचेकडून मला मिळाला.
निसर्गप्रेम व साहसी खेळाचे क्रीडांगण म्हणून मला नेहमीच गिर्यारोहणाचे आकर्षण
वाटले आहे. वृक्ष संवर्धन करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो.
या क्षेत्रात आलेली व्यावसायिकता काही अंशी ठीक आहे, व्यावसायिकता आल्यामुळे तरुण गिर्यारोहकांना
रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु त्याच बरोबर आयोजकांनी गिर्यारोहण हा साहसी खेळ
आहे. हे नेहमी लक्षात ठेऊन त्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षिततेशी कधीच
तडजोड न करता,
पर्यावरण
रक्षणाची जबाबदारी देखील घेणे आवश्यक आहे.
१९८८ सालची गोष्ट आहे. पावसाळ्यात ऑर्थर सीट पॉइंट, महाबळेश्वर येथे, विमोचन व शोध कार्य करताना, मी प्रथम उतरून पहिल्या टप्प्यावर थांबलो
होतो. नंतर विलास उंबरे याने उतरायला सुरुवात करताच, मोठी दरड कोसळली,
माझ्या हेल्मेट
वर लहान-मोठ्या दगडांचे आघात होत होते. दरडीचा आवाका मोठा असल्यामुळे, प्रचंड आवाज दरीत घुमत होता. सर्वांना वाटले, पद्माकर संपला. बराच वेळ निरव शांततेत गेला.
त्यानंतर माझा,
"I am okay". असा आवाज
गेल्यावर,
सर्वांचा जीव
भांड्यात पडला. हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे. असे जीवावर बेतलेले अनुभव अनेकदा आले
आहेत.
"Search & Rescue/ Recovery
operation", "शोध व विमोचन
कार्य",
या क्षेत्रात
कार्य करण्याची संधी मला खोपोली शहराच्या भौगोलिक रचनेमुळे प्राप्त झाली.
बोरघाटाच्या (खंडाळा घाट) पायथ्याशी असलेल्या, खोपोली पासूनच घाटाची सुरुवात होते. पूर्वी अरुंद रस्ते आणि अवघड वळणं यामुळे
अपघातांचे प्रमाण अधिक होते. अपघात होताच मदतीला धावून जाणे, हा खोपोली करांचा पिंडच बनला होता. १९८३
मध्ये ‘यशवंती हायकर्स’ या गिर्यारोहण संस्थेची स्थापना झाली आणि
तेव्हापासून घाटातील अपघात प्रसंगी होणाऱ्या मदतीला गिर्यारोहण तंत्राची जोड
लाभली.
सन १९८६ साली पहिल्यांदा गिर्यारोहण तंत्राचा उपयोग करून मृत पावलेल्या
अपघातग्रस्तांना दरीतून वर काढण्यात आले. आणि तेव्हापासून बोरघाट, माथेरान, महाबळेश्वर,
ठोसेघर इत्यादी
ठिकाणी होणाऱ्या अपघात प्रसंगी यशवंती हायकर्सची रेस्कू टीम सर्वत्र पोहोचू लागली
आहे. १९८९ मध्ये जांभुळपाड्याचा महापूर, १९९१ मध्ये उत्तरकाशी येथील भूकंप, १९९३ मध्ये लातूर- किल्लारी भूकंप, २०२१ मध्ये तळीये,
महाड, चिपळूण महापूर याप्रसंगी विशेष मदतकार्य
केले. आजतागायत यशवंतीचे कार्य चालू आहे. या कार्यात अनेकदा नेतृत्व व सहभागी
होण्याची संधी मला प्राप्त झाली.
यशवंती हायकर्स खोपोली,
अखिल महाराष्ट्र
गिर्यारोहण महासंघ या संस्थाच्या माध्यमातून गिर्यारोहण या साहसी खेळाचा विकास
करण्यासाठी मी प्रयत्नशील व कार्यरत आहे.
रेनॉल्ड् मेसनर,
हा माझा आवडता
गिर्यारोहक तर रायगड किल्ला विशेष आवडतो.
सुरक्षिततेशी तडजोड न करणे, ज्येष्ठ अनुभवी गिर्यारोहक एकत्र येऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम आखून अंमलबजावणी
करणे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, या शिखर संस्थेच्या माध्यमातून सुदृढ गिर्यारोहणाचा प्रचार प्रसार करणे, गरजेचे आहे असे वाटते.
मला गिरीमित्र गिरीभ्रमण पुरस्कार २००९ व GGIM Rescue award. २०१६ देवून गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक
सामाजिक संस्था,
पोलीस अधिक्षक व
शासकीय यंत्रणे कडून अनेकदा सन्मानित कण्यात आले आहे.
खोपोली नगर परिषद आणि यशवंती हायकर्स खोपोली यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी
५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
अशा पर्यावरण रक्षणा संबंधीच्या कार्यक्रमांच्या आयोजनात माझा सहभाग नेहमी असतो.
गिर्यारोहण या साहसी खेळाचा आनंद उपभोगत असताना वयाची साठी केव्हा पार केली हे
कळले देखील नाही.
साहसी खेळ हे माणसाच्या आयुष्यात सुदृढ व्यक्तिमत्वाची जडण घडण, वाढ, विकास करण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. सर्वांनी याचा निश्चित अनुभव घ्यावा.
ReplyDelete"डोंगरात रमणारा माणूस
त्याची अभिव्यक्ती निर्व्याज",
फारच छान वाटले वाचून...शुभेच्छा 👍