नोव्हेंबर १९७९ला माझ्या पदभ्रमणाला सुरवात झाली. गो.नी
दांडेकर यांच्या सोबत पाच दिवस राजगडावर होतो. तेव्हा किल्ला कसा पहावा? व छायाचित्रण कसे करावे? याबाबत त्यांनी
मार्गदर्शन केले. आणि येथूनच माझ्या भटकंतीला खरी सुरुवात झाली.
हिमालय क्लब, हॉलिडे हायकर्स, नेचर लव्हर्स, केव्ह
एक्सप्लोरर, पिनॅकल, चक्रम हायकर्स, फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया, आदी संस्थांचा
मी आजीव सभासद आहे. सप्टेंबर १९८२ मध्ये मनाली येथे बेसिक कोर्स ‘ए’ ग्रेड मिळवून पूर्ण केला. मग माझी जून १९८३ पासून हिमालयीन
मोहिमांना सुरूवात झाली. प्रथम ‘सेंट्रल पीक’ मोहिमे
दरम्यान ‘अनंनेम पीक’ सर केले. हॉलिडे हायकर्स सोबत ऑगस्ट १९८४ मध्ये गंगोत्री
भागातील ‘श्वेतवर्णा’ मोहिमे
दरम्यान ‘सैफी’ शिखर सर केले.
तर ऑगस्ट १९८५ला ‘माना नॉर्थ
फेस’च्या असफल मोहिमेत जास्त उंची गाठता आली.
फिल्म डिव्हीजन साठी देखील छायाचित्रण केले. सप्टेंबर १९८६
मध्ये उषा पागे यांच्या सोबत ‘सतोपंथ शोध
मोहीम’ राबवली. १९८७च्या ऑगस्ट मध्ये ‘कुल्ती व्हॅली’ मोहिम पार पाडली. नेचर लवर्स या संस्थेच्या वतीने
नेतृत्व करत ‘ज्योरी’, ‘तंबू’, ‘सारा पहाड’, ही तीन शिखरं
सर केली. ह्यात क्लब मधील नवोदित सभासदांना सामील करून घेतले व नवीन छायाचित्रकारांना
देखील संधी दिली. सगळ्यानी ही शिखरे सर केली. १९९०च्या ऑगस्टमध्ये गंगोत्री भागातील
‘म्हात्री’ शिखर मोहिमेत छायाचित्रण केले. २०१५ला मनाली जवळील सोलन
व्हॅलीतील ‘हनुमान तिब्बा’ व ‘क्षितिधार’ मोहिमेत, छायाचित्रकार म्हणून सहभाग घेतला.
हिमालयात पदभ्रमण देखील खूप केले आहे. यात जून १९८२
मध्ये पिंडारी ग्लेशियर व कफनी ग्लेशियर, ऑगस्ट १९८८ मध्ये रूप कुंड व होम कुंड
ट्रेक, १९९३ला पंचकेदार ट्रेक, १९९४ला ट्रान्स हिमाचल ट्रेक, १९९६ला कुमाऊँतील सरहान
सांगला, १९९७ला सिक्कीमचा समिती लेक, २००२ला तपोवन, शिवलिंग बेस कॅम्प विंटर
ट्रेक, २००७ला पिंडारी ग्लेशियर आदी ठिकाणांचा उल्लेख करावा लागेल. चक्रम हायकर्स
संस्थे सोबत, २००९ला अन्नपूर्णा सर्कल प्रदक्षिणा, २०१२ नंदादेवी बेस कॅम्प ट्रेक, ह्याच बरोबरीने युथ हॉस्टेल बरोबर मिझोराम, मेघालय,
राजस्थान वाळवंट, ओरिसा कोस्टल, येथे ट्रेक व छायाचित्रण केले. ऑगस्ट २००६,
सप्टेंबर २०१७ व ऑगस्ट २०२१ मध्ये लडाख मध्ये देखील भटकंती झाली.
सह्याद्री मध्ये नेचर लवर्स व हॉलिडे हायकर्स या संस्था सोबत, ‘तुंगी सुळका’ मोहिमेत रेकी व आखणी मध्ये सहभाग घेऊन, पहिली सुपर ८ एम
एम चित्रफित तयार केली. तसेच ‘राजगड’ व ‘रायगड’ किल्ल्यावर बरीच मेहनत घेऊन व बऱ्याच वेळा रायगडावर जाऊन वेगवेगळ्या
ठिकाणां वरून सकाळ ते सूर्यास्तापर्यंत छायाचित्रण
केल्यावर विनय आपटे ह्यांचा आवाज व तुकाराम जाधव ह्यांचे निवेदन, अशा त्रिवेणी संगमातून ‘स्लाईड शो’ साकार केला. हा स्लाईड शो महाराष्ट्रात
बराच गाजला. ह्याचे तीनशे पेक्षा जास्त शो झाले.
माहुली परिसरातील ‘नवरा’, ‘नवरी’, ‘करवली’, येथे देखील रेकी
व छायाचित्रण करत हे सुळके सर केले. लिंगाणा, भवानी कडा, भैरव गड, मच्छिंद्र, तैल
बैला, डुक्स नोझ, येथील चढाई मोहिमांत छायाचित्रण केले. ह्या व्यतिरिक्त
‘बाण’ ह्या दुर्गम व आव्हानात्मक सुळक्याच्या
रेकी व मोहीम आखणीत सहभाग तर होताच पण त्याच बरोबर येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून छायाचित्रण केले. एक उत्तम दर्जाचा ‘स्लाईड शो’ मला बनविता आला. त्याचे चांगल्या
पद्धतीने निवेदन तयार केले.
तसेच १९८८ पासून आज पर्यंत भरतपुर, रणथंबोर, जिमकॉर्बेट,
चोकता, दुधवा, बांधव गड, कान्हा, पेंच, ताडोबा, नागझिरा व इतर अभायारण्यात छायाचित्रण
केले. डब्लू. डब्लू. एफ. व माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ‘जोपासना ट्रस्ट’ साठी छायाचित्रे दिली. व त्या माध्यमातून वन रक्षकांस
गणवेष, औषध उपचार व रुग्णवाहिका देण्यात आल्या. सुनील राज यांच्या ‘जिद्द’ मासिकासाठी
काहि छायाचित्रे दिली. देशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पारितोषिक व प्रशस्ती
पत्रक प्राप्त केली. स्लाईड शोच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांमध्ये गिर्यारोहण
क्षेत्राची माहिती व आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. ‘पर्यावरण रक्षण’ व ‘निसर्ग सर्वधन’ ह्या बाबतीत देखील कार्य केले.
No comments:
Post a Comment