Sunday, October 16, 2022

राजेश गाडगीळ

राजेश गाडगीळ यांचे १९८३ पासून सह्याद्रीत व हिमालयात पर्वतभ्रमण सुरु झाले. आतापर्यंत त्यांनी ८५ सुळके व प्रस्तर भिंतीवर चढाई केली असून अंदाजे १०५ किल्ल्यावर भ्रमंती केली आहे.

१९८८ मध्ये प्राथमिक व १९९० मध्ये प्रगत पर्वतारोहणाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले व हिमालयातील ३५ शिखर मोहिमा केल्या. त्या मोहिमांमध्ये ३१ शिखरांच्या माथ्यावर पोहोचण्यात त्यांनी यश मिळवले असून, त्यापैकी २० शिखरांवर प्रथम चढाई करण्यात यश मिळवले आहे. त्याच बरोबर त्यांनी १२ अतिउंचावरील पदभ्रमण मोहिमा पार पाडल्या असून. ५१ वर्षीय राजेश यांचे ४९ वेळा हिमालयात पाऊल उमटले आहे. भारता बाहेर फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, स्लोव्हेनिया आदि ठिकाणी त्यांनी गिर्यारोहण केले आहे.

प्रस्तरारोहण प्रशिक्षक म्हणून १९८९ पासून ते कार्यरत आहेत. परिसर्ग प्रशिक्षक म्हणून १९९४ पासून २००५ पर्यंत ते कार्यरत होते. सन २००५ पर्यंत सह्यगिरी ट्रेकर्स संस्थेचे ते कार्यकारी अध्यक्ष होते. महाराष्ट्र गिर्यारोहण संघातर्फे महाराष्ट्र राज्या साठीच्या जमिनीवरील साहसी उपक्रमांसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा सुचना तयार करणाऱ्या तज्ञसमितीचा सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मार्च २०२२ पर्यंतद हिमालयन क्लबचे ते कार्यकारिणी सदस्य होते. सध्या राजेश महा ऍडव्हेंचर कौन्सिलचे प्रवक्ते व कार्यकारिणी सदस्य आहेत. त्याबरोबरच चक्रम हायकर्स, गिरीविहार आणि साद माउंटेनियर या संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत.

पाच वर्षे, ‘द हिमालय जर्नलच्या संपादनाचे कामही त्यांनी केले. त्याआधीची १३ वर्षे द हिमालयन जर्नल आणि द हिमालयन क्लबच्या इतर प्रकाशनांचे ते उप-संपादक होते.

त्यांच्या हिमालयीन मोहिमांचा आढावा -

ऑगस्ट/सप्टेंबर १९८८ मध्ये हिमाचल प्रदेशातील बियास व्हॅली मोहीमे अंतर्गत ‘लडाखी’ (५३४० मी), ‘शितीधर’ (५२९० मी), ‘फ्रेंडशिप’ (५२९० मी) आणि ‘मनाली’ (५६३० मी), तर गढवाल मधील ‘जोगिन ३’ (६११६ मी) सप्टेंबर १९८९ मध्ये आणि ‘अबी गामिन’ (७३५५ मी) मे/जून १९९१ मध्ये सर केले.

सप्टेंबर १९९१ मध्ये हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ‘हनुमान तिब्बा’ (५९२८ मी) सर केले.

सप्टेंबर १९९२ आणि मे/जून १९९३ मध्ये गढवाल मधील ‘स्वर्गरोहिणी १’ (६२५२ मी) वर दक्षिण कड्यावरून चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘छोटानाग’ (५२२० मी) सर केले.

जून १९९४ मध्ये परत ‘शितीधर’ शिखर गाठले. ऑगस्ट/सप्टेंबर १९९४ दरम्यान गढवाल मधील ‘कामेट’ शिखर सर करण्याचा प्रयत्नात त्यांना ७२८५ मीटर उंची गाठता आली.

मे/जून १९९५ मध्ये गढवाल मधील ‘माना पर्वत २’ (६७७१ मी) या शिखराच्या प्रथम आरोहणाचा मान मिळवला.

जुलै/ऑगस्ट १९९५ मध्ये झांस्कर मधील ‘शिंगो’ला जवळील ६२४८ मीटर उंचीचे अजिंक्य अनामिक शिखर सर केले.

जुलै/ऑगस्ट १९९६ मध्ये ‘शिंगो’ला जवळील ६३१८ मीटर उंचीचे  ‘रामजाक’ शिखर चढण्याचा प्रयत्न केला.

डिसेंबर, १९९६ मध्ये हिवाळी मोहीमे अंतर्गत किन्नौर मधील ‘हंसबेशान’ शिखराच्या क्षेत्रात भ्रमंती केली.

मे/जून १९९७ मध्ये गढवाल ट्रॅव्हर्स एक्स्पिडिशन अंतर्गत ‘पानपतीया बामक’, ‘भगीरथ खरक’ हिमनदी, ‘अरवा’ हिमनदी या परिसरातील ‘श्राक’ला (५७०० मी) खिंड पार केली, तर ‘सरगा’ खिंड (५८४० मी) गाठली.

सप्टेंबर १९९७ मध्ये कुमाऊँ मधील ‘सुजतील्ला’ शिखर (६४०० मी) चढण्याचा प्रयत्न केला.

सप्टेंबर १९९९ मध्ये गढवाल मधील ‘भगीरथ खरक’ हिमनदीमध्ये  ५४५० मीटर उंचीच्या अनामिक शिखरावर प्रथम चढाई केली, तसेच ‘अप्पर देवदेखनी’ पठाराचा माग घेतला. सप्टेंबर २००१ मध्ये गढवाल मधील ‘भगीरथ खरक’ हिमनदीतील ‘भगत’ शिखर (५६५० मी)  एकंदरीत दुसरी चढाई करून सर केले.

जुलै/ऑगस्ट, २००२ मध्ये झांस्कर मधील ‘शिंगो’ला जवळील ‘रामजाक' शिखरावर (६३१८ मी), ५६५० मीटर पर्यंत पोहोचले. पुन्हा जुलै/ऑगस्ट, २००३ मध्ये ‘रामजाकवर’ चढाईचा प्रयत्न केला. तेव्हा ५८५० मीटर पर्यंत पोहोचण्यात यश आले.

ऑक्टोबर २००३ ‘हंसबेशान’ शिखरावर त्यांच्या संघाने पहिले आरोहण केले होते.

ऑगस्ट, २००५ मध्ये पूर्व काराकोरम मधल्या सत्ती खोऱ्यातील ‘भारत– अमेरिका’ संयुक्त मोहीमेत एकूण तीन शिखरांवर पहिले आरोहण केले, ती म्हणजे ‘जुंगमा कांग्री’ (६३८७ मी), ‘रुदुंग रिंग’ (६०८२ मी) आणि ‘थोंगसा रि’ (५८८९ मी).

मे/जून, २००६ ‘ओब्रा गड’ मोहीमेत, ‘धोडू का गोंछा’ (५१३५ मी) या शिखरावर प्रथम आरोहण केले.

जुलै/ऑगस्ट, २००६ मध्ये ‘स्पिती’ खोऱ्यातील ‘खामेंगार’ भागात ‘६१६० मीटर उंचीचे अनामिक शिखर सर करण्याच्या प्रयत्नात ५४५० मीटर उंची गाठली.

ऑगस्ट/सप्टेंबर २००७, 'भारत - अमेरिका' संयुक्त मोहिमेत त्यांच्या संघाने आग्नेय कड्याच्या मार्गाने प्रथम चढाई करून ‘चोंग कुमदान १’ (७०५१ मी) हे शिखर सर केले. तसेच त्यांनी स्वतः या मोहिमेत ‘स्क्यांग’ (५७७० मी) शिखर सर केले.

जून/जुलै २००८ मध्ये ‘न्या कांग्री’ची (६४८० मी) मोहीम केली.

जुलै / ऑगस्ट २००९ मध्ये एका 'भारत - अमेरिका' संयुक्त मोहिमेत ‘प्लॅटू’ शिखरावर (७३१० मी) चढाईचा प्रयत्न करण्यात आला. त्याच मोहिमेत ‘त्सुमझोंग कांग्री’ (६०१० मी) या शिखरावर त्यांनी प्रथम आरोहण केले.

जुलै / ऑगस्ट २०११ मध्ये ‘लालूंग हिमनदी’ ही झंस्कार हिमालयातील शोधमोहीम पार पाडली. त्यानंतर जुलै / ऑगस्ट २०१२ मध्ये ‘लडाख’ मधील ‘आंग तुंग’ खोऱ्यात मोहीम आखली होती. त्यात त्यांनी ‘पेट्झे कांग्री’ (६१३० मी) आणि ‘लुग्झल पोम्बो’ (६४१४ मी) ही शिखरे प्रथमच सर केली.

जुलै/ऑगस्ट २०१४ ‘रस्सा’ हिमनदीची मोहीम आखली. त्यावेळी ‘तुसुम कांग्री’ (६२१९ मी) आणि ‘रस्सा कांग्री’ (६२५० मी) या दोन शिखरांवर प्रथम चढाई केली.

जुलै / ऑगस्ट २०१५ ला ‘रोंग खारू लुंग्पा’ मोहीम झाली. ‘६१९५ मी.’ उंचीचे अनामिक शिखर आणि ‘सगतोग्पा कांग्री' (६३०६ मी) या शिखरांवर प्रथम चढाई केली. त्याचवेळी ‘सगतोग्पा’ खिंड(५९१५ मी) प्रथम पार केली.

मे/जून २०१६ ला आधी 'शाही कांग्री‘ (६९३४ मी) या शिखराच्या पश्चिम मार्गाचा शोध घेण्यात आला. याच मोहिमेत न्या कांग्री’ (६५२० मी) या शिखरावर ६२८५ मीटर उंची गाठता आली.

जुलै/ऑगस्ट २०१७ ‘काराकोरम ट्रॅव्हर्स’ मोहीमेत अनोळखी हिमप्रदेशात अंदाजे ११० किमी अंतर पार केले. एका अनामिक (६०७० मी) शिखरावर पहिली चढाई केली. ‘रोंगडो’ला (५८०० मी), अर्गन’ला (५९५० मी), आणि ‘झामोरिओन’ला (५८६० मी) या खिंडी व एकूण सहा हिमनद्या पार केल्या.

जुलै/ऑगस्ट २०१८ ला ‘स्पिती’ मधील ‘कर्चा नाला’ मोहीमेत, अनामिक (६१३० मी) शिखरावर पहिली चढाई करून त्यानंतर 'होम्स' शिखर (६०७४ मी) होम्सखिंडीमार्गे सर केले.

जुलै/ऑगस्ट २०१९ ‘पूर्व काराकोरम’ मधील ‘सत्ती' खोऱ्याची मोहीम आखली होती. त्यात ‘ताशिस्पा री’ (६१०४ मी) शिखरावर त्यांनी पहिली चढाई केली.


ऑगस्ट २०२१ ला ‘पश्चिम कर्चा नाला’, लाहौल स्पिती येथील ‘फ्यांलब्ते’ (६०७५ मी) या शिखरावर पहिली चढाई करण्यात त्यांनी यश मिळविले.

ऑगस्ट २०२२ मध्ये ‘दक्षिण रोंगदो’ खोऱ्यातील ‘६०४० मी’ आणि '६२४५ मी' उंचीच्या अनामिक शिखरांवर पहिली चढाई केली.

त्यांचे हिमालयातील पदभ्रमण -

१. मे १९८३, १९८४ आणि १९९० हिमाचल मधील ‘बियास कुंड व रोहतांग पास’.

२. मे १९८६ आणि १९८७ मध्ये काश्मीर मधील ‘सिंथन व मार्गन पास’.

३. एप्रिल १९८८, मे २०१८ मध्ये पूर्व नेपाळ मधील ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’.

४. ऑक्टोबर १९९२ मध्ये पश्चिम नेपाळ मधील ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’.

५. नोव्हेंबर २००४ सोलांग व्हॅलीतील हिवाळी ट्रेक.

६. मार्च २००८ मध्ये गढवाल मधील दयारा बुगियाल,

७. सप्टेंबर २०१३ मध्ये लाहोल स्पिती तील कर्चा खोरे ते ग्यूंदी खिंड

८. मे २०१५, गढवाल मधील, दयारा बुगियाल ते धोडी ताल

९. जून व सप्टेंबर २०२१ मध्ये हिमाचल प्रदेश मधील भृगु तलाव, पतालसू, बियास कुंड वगैरे,.

किल्लारी भूकंप, लडाख ढगफुटी, निसर्ग वादळ, निरनिराळे अपघात अशा अनेक आपत्तींच्या वेळी मदतकार्यात त्यांनी सहभाग घेतला.

त्यांना गिरीमित्र संमेलन २०१६ मध्ये उत्कृष्ठ गिर्यारोहक पुरस्कार मिळालेला आहे.

व्यावसायिक गिर्यारोहणा बद्दल ते सांगतात, दुर्दैवाने आपल्याकडे गिरिभ्रमणाला देखील गिर्यारोहणात समाविष्ट केले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे डोंगरात फिरताना सुरक्षितता व गिर्यारोहणातील इतर शिस्त पाळून ते व्हावे, असे त्यांना वाटते.
















No comments:

Post a Comment