Sunday, October 16, 2022

राजेश गाडगीळ

राजेश गाडगीळ यांचे १९८३ पासून सह्याद्रीत व हिमालयात पर्वतभ्रमण सुरु झाले. आतापर्यंत त्यांनी ८५ सुळके व प्रस्तर भिंतीवर चढाई केली असून अंदाजे १०५ किल्ल्यावर भ्रमंती केली आहे.

१९८८ मध्ये प्राथमिक व १९९० मध्ये प्रगत पर्वतारोहणाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले व हिमालयातील ३५ शिखर मोहिमा केल्या. त्या मोहिमांमध्ये ३१ शिखरांच्या माथ्यावर पोहोचण्यात त्यांनी यश मिळवले असून, त्यापैकी २० शिखरांवर प्रथम चढाई करण्यात यश मिळवले आहे. त्याच बरोबर त्यांनी १२ अतिउंचावरील पदभ्रमण मोहिमा पार पाडल्या असून. ५१ वर्षीय राजेश यांचे ४९ वेळा हिमालयात पाऊल उमटले आहे. भारता बाहेर फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, स्लोव्हेनिया आदि ठिकाणी त्यांनी गिर्यारोहण केले आहे.

प्रस्तरारोहण प्रशिक्षक म्हणून १९८९ पासून ते कार्यरत आहेत. परिसर्ग प्रशिक्षक म्हणून १९९४ पासून २००५ पर्यंत ते कार्यरत होते. सन २००५ पर्यंत सह्यगिरी ट्रेकर्स संस्थेचे ते कार्यकारी अध्यक्ष होते. महाराष्ट्र गिर्यारोहण संघातर्फे महाराष्ट्र राज्या साठीच्या जमिनीवरील साहसी उपक्रमांसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा सुचना तयार करणाऱ्या तज्ञसमितीचा सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मार्च २०२२ पर्यंतद हिमालयन क्लबचे ते कार्यकारिणी सदस्य होते. सध्या राजेश महा ऍडव्हेंचर कौन्सिलचे प्रवक्ते व कार्यकारिणी सदस्य आहेत. त्याबरोबरच चक्रम हायकर्स, गिरीविहार आणि साद माउंटेनियर या संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत.

पाच वर्षे, ‘द हिमालय जर्नलच्या संपादनाचे कामही त्यांनी केले. त्याआधीची १३ वर्षे द हिमालयन जर्नल आणि द हिमालयन क्लबच्या इतर प्रकाशनांचे ते उप-संपादक होते.

त्यांच्या हिमालयीन मोहिमांचा आढावा -

ऑगस्ट/सप्टेंबर १९८८ मध्ये हिमाचल प्रदेशातील बियास व्हॅली मोहीमे अंतर्गत ‘लडाखी’ (५३४० मी), ‘शितीधर’ (५२९० मी), ‘फ्रेंडशिप’ (५२९० मी) आणि ‘मनाली’ (५६३० मी), तर गढवाल मधील ‘जोगिन ३’ (६११६ मी) सप्टेंबर १९८९ मध्ये आणि ‘अबी गामिन’ (७३५५ मी) मे/जून १९९१ मध्ये सर केले.

सप्टेंबर १९९१ मध्ये हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ‘हनुमान तिब्बा’ (५९२८ मी) सर केले.

सप्टेंबर १९९२ आणि मे/जून १९९३ मध्ये गढवाल मधील ‘स्वर्गरोहिणी १’ (६२५२ मी) वर दक्षिण कड्यावरून चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘छोटानाग’ (५२२० मी) सर केले.

जून १९९४ मध्ये परत ‘शितीधर’ शिखर गाठले. ऑगस्ट/सप्टेंबर १९९४ दरम्यान गढवाल मधील ‘कामेट’ शिखर सर करण्याचा प्रयत्नात त्यांना ७२८५ मीटर उंची गाठता आली.

मे/जून १९९५ मध्ये गढवाल मधील ‘माना पर्वत २’ (६७७१ मी) या शिखराच्या प्रथम आरोहणाचा मान मिळवला.

जुलै/ऑगस्ट १९९५ मध्ये झांस्कर मधील ‘शिंगो’ला जवळील ६२४८ मीटर उंचीचे अजिंक्य अनामिक शिखर सर केले.

जुलै/ऑगस्ट १९९६ मध्ये ‘शिंगो’ला जवळील ६३१८ मीटर उंचीचे  ‘रामजाक’ शिखर चढण्याचा प्रयत्न केला.

डिसेंबर, १९९६ मध्ये हिवाळी मोहीमे अंतर्गत किन्नौर मधील ‘हंसबेशान’ शिखराच्या क्षेत्रात भ्रमंती केली.

मे/जून १९९७ मध्ये गढवाल ट्रॅव्हर्स एक्स्पिडिशन अंतर्गत ‘पानपतीया बामक’, ‘भगीरथ खरक’ हिमनदी, ‘अरवा’ हिमनदी या परिसरातील ‘श्राक’ला (५७०० मी) खिंड पार केली, तर ‘सरगा’ खिंड (५८४० मी) गाठली.

सप्टेंबर १९९७ मध्ये कुमाऊँ मधील ‘सुजतील्ला’ शिखर (६४०० मी) चढण्याचा प्रयत्न केला.

सप्टेंबर १९९९ मध्ये गढवाल मधील ‘भगीरथ खरक’ हिमनदीमध्ये  ५४५० मीटर उंचीच्या अनामिक शिखरावर प्रथम चढाई केली, तसेच ‘अप्पर देवदेखनी’ पठाराचा माग घेतला. सप्टेंबर २००१ मध्ये गढवाल मधील ‘भगीरथ खरक’ हिमनदीतील ‘भगत’ शिखर (५६५० मी)  एकंदरीत दुसरी चढाई करून सर केले.

जुलै/ऑगस्ट, २००२ मध्ये झांस्कर मधील ‘शिंगो’ला जवळील ‘रामजाक' शिखरावर (६३१८ मी), ५६५० मीटर पर्यंत पोहोचले. पुन्हा जुलै/ऑगस्ट, २००३ मध्ये ‘रामजाकवर’ चढाईचा प्रयत्न केला. तेव्हा ५८५० मीटर पर्यंत पोहोचण्यात यश आले.

ऑक्टोबर २००३ ‘हंसबेशान’ शिखरावर त्यांच्या संघाने पहिले आरोहण केले होते.

ऑगस्ट, २००५ मध्ये पूर्व काराकोरम मधल्या सत्ती खोऱ्यातील ‘भारत– अमेरिका’ संयुक्त मोहीमेत एकूण तीन शिखरांवर पहिले आरोहण केले, ती म्हणजे ‘जुंगमा कांग्री’ (६३८७ मी), ‘रुदुंग रिंग’ (६०८२ मी) आणि ‘थोंगसा रि’ (५८८९ मी).

मे/जून, २००६ ‘ओब्रा गड’ मोहीमेत, ‘धोडू का गोंछा’ (५१३५ मी) या शिखरावर प्रथम आरोहण केले.

जुलै/ऑगस्ट, २००६ मध्ये ‘स्पिती’ खोऱ्यातील ‘खामेंगार’ भागात ‘६१६० मीटर उंचीचे अनामिक शिखर सर करण्याच्या प्रयत्नात ५४५० मीटर उंची गाठली.

ऑगस्ट/सप्टेंबर २००७, 'भारत - अमेरिका' संयुक्त मोहिमेत त्यांच्या संघाने आग्नेय कड्याच्या मार्गाने प्रथम चढाई करून ‘चोंग कुमदान १’ (७०५१ मी) हे शिखर सर केले. तसेच त्यांनी स्वतः या मोहिमेत ‘स्क्यांग’ (५७७० मी) शिखर सर केले.

जून/जुलै २००८ मध्ये ‘न्या कांग्री’ची (६४८० मी) मोहीम केली.

जुलै / ऑगस्ट २००९ मध्ये एका 'भारत - अमेरिका' संयुक्त मोहिमेत ‘प्लॅटू’ शिखरावर (७३१० मी) चढाईचा प्रयत्न करण्यात आला. त्याच मोहिमेत ‘त्सुमझोंग कांग्री’ (६०१० मी) या शिखरावर त्यांनी प्रथम आरोहण केले.

जुलै / ऑगस्ट २०११ मध्ये ‘लालूंग हिमनदी’ ही झंस्कार हिमालयातील शोधमोहीम पार पाडली. त्यानंतर जुलै / ऑगस्ट २०१२ मध्ये ‘लडाख’ मधील ‘आंग तुंग’ खोऱ्यात मोहीम आखली होती. त्यात त्यांनी ‘पेट्झे कांग्री’ (६१३० मी) आणि ‘लुग्झल पोम्बो’ (६४१४ मी) ही शिखरे प्रथमच सर केली.

जुलै/ऑगस्ट २०१४ ‘रस्सा’ हिमनदीची मोहीम आखली. त्यावेळी ‘तुसुम कांग्री’ (६२१९ मी) आणि ‘रस्सा कांग्री’ (६२५० मी) या दोन शिखरांवर प्रथम चढाई केली.

जुलै / ऑगस्ट २०१५ ला ‘रोंग खारू लुंग्पा’ मोहीम झाली. ‘६१९५ मी.’ उंचीचे अनामिक शिखर आणि ‘सगतोग्पा कांग्री' (६३०६ मी) या शिखरांवर प्रथम चढाई केली. त्याचवेळी ‘सगतोग्पा’ खिंड(५९१५ मी) प्रथम पार केली.

मे/जून २०१६ ला आधी 'शाही कांग्री‘ (६९३४ मी) या शिखराच्या पश्चिम मार्गाचा शोध घेण्यात आला. याच मोहिमेत न्या कांग्री’ (६५२० मी) या शिखरावर ६२८५ मीटर उंची गाठता आली.

जुलै/ऑगस्ट २०१७ ‘काराकोरम ट्रॅव्हर्स’ मोहीमेत अनोळखी हिमप्रदेशात अंदाजे ११० किमी अंतर पार केले. एका अनामिक (६०७० मी) शिखरावर पहिली चढाई केली. ‘रोंगडो’ला (५८०० मी), अर्गन’ला (५९५० मी), आणि ‘झामोरिओन’ला (५८६० मी) या खिंडी व एकूण सहा हिमनद्या पार केल्या.

जुलै/ऑगस्ट २०१८ ला ‘स्पिती’ मधील ‘कर्चा नाला’ मोहीमेत, अनामिक (६१३० मी) शिखरावर पहिली चढाई करून त्यानंतर 'होम्स' शिखर (६०७४ मी) होम्सखिंडीमार्गे सर केले.

जुलै/ऑगस्ट २०१९ ‘पूर्व काराकोरम’ मधील ‘सत्ती' खोऱ्याची मोहीम आखली होती. त्यात ‘ताशिस्पा री’ (६१०४ मी) शिखरावर त्यांनी पहिली चढाई केली.


ऑगस्ट २०२१ ला ‘पश्चिम कर्चा नाला’, लाहौल स्पिती येथील ‘फ्यांलब्ते’ (६०७५ मी) या शिखरावर पहिली चढाई करण्यात त्यांनी यश मिळविले.

ऑगस्ट २०२२ मध्ये ‘दक्षिण रोंगदो’ खोऱ्यातील ‘६०४० मी’ आणि '६२४५ मी' उंचीच्या अनामिक शिखरांवर पहिली चढाई केली.

त्यांचे हिमालयातील पदभ्रमण -

१. मे १९८३, १९८४ आणि १९९० हिमाचल मधील ‘बियास कुंड व रोहतांग पास’.

२. मे १९८६ आणि १९८७ मध्ये काश्मीर मधील ‘सिंथन व मार्गन पास’.

३. एप्रिल १९८८, मे २०१८ मध्ये पूर्व नेपाळ मधील ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’.

४. ऑक्टोबर १९९२ मध्ये पश्चिम नेपाळ मधील ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’.

५. नोव्हेंबर २००४ सोलांग व्हॅलीतील हिवाळी ट्रेक.

६. मार्च २००८ मध्ये गढवाल मधील दयारा बुगियाल,

७. सप्टेंबर २०१३ मध्ये लाहोल स्पिती तील कर्चा खोरे ते ग्यूंदी खिंड

८. मे २०१५, गढवाल मधील, दयारा बुगियाल ते धोडी ताल

९. जून व सप्टेंबर २०२१ मध्ये हिमाचल प्रदेश मधील भृगु तलाव, पतालसू, बियास कुंड वगैरे,.

किल्लारी भूकंप, लडाख ढगफुटी, निसर्ग वादळ, निरनिराळे अपघात अशा अनेक आपत्तींच्या वेळी मदतकार्यात त्यांनी सहभाग घेतला.

त्यांना गिरीमित्र संमेलन २०१६ मध्ये उत्कृष्ठ गिर्यारोहक पुरस्कार मिळालेला आहे.

व्यावसायिक गिर्यारोहणा बद्दल ते सांगतात, दुर्दैवाने आपल्याकडे गिरिभ्रमणाला देखील गिर्यारोहणात समाविष्ट केले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे डोंगरात फिरताना सुरक्षितता व गिर्यारोहणातील इतर शिस्त पाळून ते व्हावे, असे त्यांना वाटते.
















Wednesday, October 12, 2022

बाळ उर्फ जगन्नाथ राऊळ

नोव्हेंबर १९७९ला माझ्या पदभ्रमणाला सुरवात झाली. गो.नी दांडेकर यांच्या सोबत पाच दिवस राजगडावर होतो. तेव्हा किल्ला कसा पहावा? व छायाचित्रण कसे करावे? याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. आणि येथूनच माझ्या भटकंतीला खरी सुरुवात झाली.

हिमालय क्लब, हॉलिडे हायकर्स, नेचर लव्हर्स, केव्ह एक्सप्लोरर, पिनॅकल, चक्रम हायकर्स, फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया, आदी संस्थांचा मी आजीव सभासद आहे. सप्टेंबर १९८२ मध्ये मनाली येथे बेसिक कोर्स ग्रेड मिळवून पूर्ण केला. मग माझी जून १९८३ पासून हिमालयीन मोहिमांना सुरूवात झाली. प्रथम सेंट्रल पीक मोहिमे दरम्यान अनंनेम पीक सर केले. हॉलिडे हायकर्स सोबत ऑगस्ट १९८४ मध्ये गंगोत्री भागातील श्वेतवर्णा मोहिमे दरम्यान सैफी शिखर सर केले. तर ऑगस्ट १९८५ला माना नॉर्थ फेसच्या असफल मोहिमेत जास्त उंची गाठता आली.

फिल्म डिव्हीजन साठी देखील छायाचित्रण केले. सप्टेंबर १९८६ मध्ये उषा पागे यांच्या सोबत सतोपंथ शोध मोहीम राबवली. १९८७च्या ऑगस्ट मध्ये कुल्ती व्हॅली मोहिम पार पाडली. नेचर लवर्स या संस्थेच्या वतीने नेतृत्व करत ज्योरी, तंबू, सारा पहाड’, ही तीन शिखरं सर केली. ह्यात क्लब मधील नवोदित सभासदांना सामील करून घेतले व नवीन छायाचित्रकारांना देखील संधी दिली. सगळ्यानी ही शिखरे सर केली. १९९०च्या ऑगस्टमध्ये गंगोत्री भागातील म्हात्री शिखर मोहिमेत छायाचित्रण केले. २०१५ला मनाली जवळील सोलन व्हॅलीतील हनुमान तिब्बा क्षितिधार मोहिमेत, छायाचित्रकार म्हणून सहभाग घेतला.

हिमालयात पदभ्रमण देखील खूप केले आहे. यात जून १९८२ मध्ये पिंडारी ग्लेशियर व कफनी ग्लेशियर, ऑगस्ट १९८८ मध्ये रूप कुंड व होम कुंड ट्रेक, १९९३ला पंचकेदार ट्रेक, १९९४ला ट्रान्स हिमाचल ट्रेक, १९९६ला कुमाऊँतील सरहान सांगला, १९९७ला सिक्कीमचा समिती लेक, २००२ला तपोवन, शिवलिंग बेस कॅम्प विंटर ट्रेक, २००७ला पिंडारी ग्लेशियर आदी ठिकाणांचा उल्लेख करावा लागेल. चक्रम हायकर्स संस्थे सोबत, २००९ला अन्नपूर्णा सर्कल प्रदक्षिणा, २०१२ नंदादेवी बेस कॅम्प ट्रेक, ह्याच बरोबरीने युथ हॉस्टेल बरोबर मिझोराम, मेघालय, राजस्थान वाळवंट, ओरिसा कोस्टल, येथे ट्रेक व छायाचित्रण केले. ऑगस्ट २००६, सप्टेंबर २०१७ व ऑगस्ट २०२१ मध्ये लडाख मध्ये देखील भटकंती झाली.

सह्याद्री मध्ये नेचर लवर्स व हॉलिडे हायकर्स या संस्था सोबत, तुंगी सुळका मोहिमेत रेकी व आखणी मध्ये सहभाग घेऊन, पहिली सुपर ८ एम एम चित्रफित तयार केली. तसेच राजगडरायगड किल्ल्यावर बरीच मेहनत घेऊन व बऱ्याच वेळा रायगडावर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणां वरून सकाळ ते सूर्यास्तापर्यंत छायाचित्रण केल्यावर विनय आपटे ह्यांचा आवाज व तुकाराम जाधव ह्यांचे निवेदन, अशा त्रिवेणी संगमातून स्लाईड शो साकार केला. हा स्लाईड शो महाराष्ट्रात बराच गाजला. ह्याचे तीनशे पेक्षा जास्त शो झाले.

माहुली परिसरातील नवरा, नवरी, करवली, येथे देखील रेकी व छायाचित्रण करत हे सुळके सर केले. लिंगाणा, भवानी कडा, भैरव गड, मच्छिंद्र, तैल बैला, डुक्स नोझ, येथील चढाई मोहिमांत छायाचित्रण केले. ह्या व्यतिरिक्त बाण ह्या दुर्गम व आव्हानात्मक सुळक्याच्या रेकी व मोहीम आखणीत सहभाग तर होताच पण त्याच बरोबर येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून छायाचित्रण केले. एक उत्तम दर्जाचा स्लाईड शो मला बनविता आला. त्याचे चांगल्या पद्धतीने निवेदन तयार केले.


तसेच १९८८ पासून आज पर्यंत भरतपुर, रणथंबोर, जिमकॉर्बेट, चोकता, दुधवा, बांधव गड, कान्हा, पेंच, ताडोबा, नागझिरा व इतर अभायारण्यात छायाचित्रण केले.
डब्लू. डब्लू. एफ. माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या जोपासना ट्रस्ट साठी छायाचित्रे दिली. व त्या माध्यमातून वन रक्षकांस गणवेष, औषध उपचार व रुग्णवाहिका देण्यात आल्या. सुनील राज यांच्या जिद्द मासिकासाठी काहि छायाचित्रे दिली. देशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पारितोषिक व प्रशस्ती पत्रक प्राप्त केली. स्लाईड शोच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांमध्ये गिर्यारोहण क्षेत्राची माहिती व आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. पर्यावरण रक्षणनिसर्ग सर्वधन ह्या बाबतीत देखील कार्य केले.

Sunday, October 9, 2022

 अनिल परशुराम चव्हाण

वयाच्या १९व्या वर्षी मी पहिल्यांदा एन. सी. सी. मधून लोहगडावर गेलो. धाडसाची आवड आणि NCC मुळे मी गिर्यारोहणाकडे वळलो. काहीतरी नवीन करण्याच्या आवडी पोटी सह्याद्री व हिमालयाकडे आकर्षित झालो. त्यानंतर हिमालयातील लियो पुर्जियल - नविन मार्गाने (२२४१०), खनेज शिखर (१७१६०), बाउलजुरी (१९९६७), मोन चोटी (१६०९८), कानामो (१९६८२), पूर्वी सर न झालेले लौशेर (२०३५४), फ्लूटेड शिखर (२०२५८), निंगमारी (२०३७१), सेंटिनल (१८१४१) सर केले. नंदाखात (२१८१७), हाफ डोम (१९१००), सुइटिला (२१०३१) या शिखरांवर चढण्याचा प्रयत्न केला. तर स्वर्गरोहिणी १ नवीन दक्षिण मार्गाने (२०६३३) सर करण्याचा प्रयत्न केला. तसेच बारा सुक्खा खिंडीवर (१८००) तसेच  मानाच्या वायव्वे कडील (२३४०४) शिखरावर २२४४० उंची पर्यंत मजल मारली आहे.

बहुतेक मदनगड जवळील सुळका मी पहिल्यांदा सर केला. नंतर सह्याद्रीत आधी सर न झालेले बाण, सिताबाईचा पाळणा, माणिकगड लिंगी, गोसावी सुळका, कोहज किल्ल्याची लिंगी, अलंग, कुलंग, मदन जवळील सुळके यांवर प्रथम चढाई केली. राजगड प्रदक्षिणा प्रथम मारली. टकमक टोक रॅपलिंग प्रथमतः सर्वांसाठी आम्ही चालू केले.

कोणतीच मोहिम मला तशी कठिण वाटली नाही. ज्यांच्या कडून नवीन काही शिकता येते, त्या सगळ्यांनाच मी गुरू मानतो.

जागतिक तपमानवाढीचा  निसर्गावर होणार विपरित परिणाम टाळण्यासाठी जंगल वाचवले पाहिजे आणि प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, असे मला वाटते.

काळानुरूप धाडस करण्यामध्ये पैसा आला आणि त्याचबरोबर प्रसिध्दी आली, त्यामुळे व्यावसायिकरण वाढले. कच्चे-लिंबू भटके नेते झाले आणि अपघात वाढले, त्यावर काहीतरी ठोस निर्णय घेतले जावेत, ही अपेक्षा.

प्रत्येक मिळालेली संधी स्वीकारावी व आपल्या कुवतीप्रमाणे गिर्यारोहण चालू ठेवावे, हा मला गिर्यारोहणाने दिलेला मंत्र आहे.

कोणत्याही मोहिमेसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे महत्वाचे आहे.

स्वतःचा आत्मविश्वास, अनुभव, तुकडीच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्या बरोबर पैशाचे पाठबळ आणि ध्येय हे गिर्यारोहण करताना आवश्यक असते. अनुभव हा गुरू असतो, तो बरेच काही सुचवतो आणि शिकवतो. त्यावर आपण आपले बरे वाईट निर्णय घेऊ शकतो.

माझी कमजोरी तशी काहीच नाही. पण अगोदर साधन सामुग्रीची कमतरता भासायची, परंतु त्यावाचून काही अडले नाही. 'आहे, त्यामध्ये हेतू साध्य करणे', हे ब्रीद होते. पण स्वतःची शारीरिक क्षमता वाढवून जाणे, हे आम्ही करत होतो.

अपघात झाल्यावर आपल्या काय चुका झाल्या, त्यावर मोठ्या व अनुभवी साथीदारां बरोबर बोलून नवीन गोष्टी शिकणे, मला नेहमीच योग्य वाटतात.

चंदेरीला काही वर्षांपूर्वी एका शाळेतील मुलांना गिर्यारोहणासाठी नेले होते, परतताना, प्रचंड पाऊस आला आणि पूर्ण मार्ग वेगवान पाण्याने व्यापून गेला, त्यातून मात करून आम्ही सर्वांना सुखरूप खाली आणले होते. हा प्रसंग अविस्मरणीय आहे.

इसावली (लांजा)गावातील भुयार, कोकणातील घोडेबिळ हे खूप मोठे भुयार, मालवण किल्ल्यातील विहिरीतील भुयार, ब्रह्मानंद स्वामी भुयार आदी भुयार संशोधनातील मोहिमा मी पार पाडल्या.

हॉलिडे हाइकर्स क्लब, ‘हिमालयन क्लब आणी पिनॅकल क्लब या संस्थांचा मी सभासद आहे.

स्वर्गीय अरुण सामंत माझे आवडते गिर्यारोहक होते.

राजगड तर मला आवडतोच, पण खऱ्या अर्थाने पूर्ण सह्याद्री परिसर मला आवडतो. तसेच पहिल्यांदा सर्वांसाठी सुरू केलेली टकमक टोक रॅपलिंग मोहीम देखील मला आवडते.

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी सह्याद्रि मध्ये जमा होणारे कचऱ्याचे ढीग आधी थांबवले पाहिजे. आणि त्यासाठी काहीतरी ठोस करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.