Wednesday, October 27, 2021

 दिलीप पंढरीनाथ झुंजारराव

दिलीप झुंजारराव यांना निसर्गसंवर्धनाची आवड लहानपणापासूनच होती. त्यातून वैयक्तित पातळीवर अनेक गडांवर व गडपरिसरात जमेल तसे वृक्षारोपण व बिजारोपण ते करत आहेत. स्वतः घरी कंपोस्ट निर्मितीही गेली अनेक वर्ष करत आहेत. अनेक सुळक्यांवर प्रथम चढाईचा मान त्यांना जातो. २००५ साली गिरीमित्र गिर्यारोहक सन्मान देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. आता ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात ...

शिवइतिहासाची, पर्यावरणाची आणि साहसाची आवड गिर्यारोहणाकडे वळायला मला कारणीभूत ठरली. माझे महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर दुसऱ्याच वर्षी कान्हेरी येथे मी बेसिक रॉक क्लाइंबिंग प्रशिक्षण घेतले. त्यावेळी ज्यांनी मला मार्गदर्शन केले ते आदरणीय शरद ओवळेकर सर व माळी सर हे माझे आदर्श आहेत. ऑगस्ट १९७८ला मी पहिले गिर्यारोहण नाणेघाट येथे केले आणि माझ्या गिर्यारोहणाला सुरूवात झाली.

मे १९७९ साली कर्नाळ्याचा बुधला मी एका दिवसात सर केला. आणि नोव्हेंबर १९८० साली पदरगडाच्या कलावंतीणीचा महाल येथे सह्याद्रीतील पहिली प्रस्तरारोहण मोहीम राबवली. या सह्याद्रीतील प्रस्तरारोहणासाठी ज्यांनी मला मुक्त हस्ताने प्रोत्साहन दिलं ते हिरा पंडीत मला गुरूस्थानी आहे.

डिसेंबर १९८३ साली माहुली गडाचा, नवरा उर्फ भटोबा हा अजिंक्य सुळका दक्षिण बाजूच्या चढाई मार्गाने सर करण्याची मोहीम ही सर्वात कठिण मोहिम माझ्यासाठी होती.

नाणेघाट - ऑगस्ट १९७८, बदलापूर नवरा-नवरी - नोव्हेंबर १९७८, माहुली - डिसेंबर १९७८, राजमाची - जानेवारी १९७९, कर्नाळा - मे १९७९, तावली – जून १९७९, नागफणी - जुलै १९७९, कामणदुर्ग - सप्टेंबर १९७९, चंदेरी - सप्टेंबर १९७९, लोहगड, विसापूर - नोव्हेंबर १९७९, तांदूळवाडी किल्ला - डिसेंबर १९७९, इरशाळ, प्रबळगड, माथेरान - जानेवारी १९८०, मुंबई-पुणे चालणे - मार्च १९८०, अशेरी गड, कोहोज - मार्च १९८०, रायगड – मार्च १९८०, पेब, माथेरान - जुलै १९८०, नाणेघाट, जीवधन, चावंड, हडसर, लेण्याद्री, शिवनेरी – ऑगस्ट १९८०, तावली सुळके - ऑक्टोबर १९८०, पदरच्या किल्ल्याचा कलावंणीचा महाल, प्रथमारोहण – नोव्हेंबर १९८०, महालक्ष्मी सुळका - फेब्रुवारी १९८९, पेठ उर्फ कोथळीगड - जुलै १९८१, राजगड - ऑगस्ट १९८१, ढाकभैरी – नोव्हेंबर १९८१. नकटा प्रथमारोहण – नोव्हेंबर १९८१, नागेश्वर, वासोटा, महिपतगड, सुमारगड, रसाळगड – डिसेंबर १९८१, हडबिची शेंडी – जानेवारी १९८२, लिंगाणा –जानेवारी १९८२, अडसुळे - फेब्रुवारी १९८२, कळकराय सुळका – मार्च १९८२, माहुली ४५० फूट चिमणी प्रथमारोहण – एप्रिल १९८२, कोकणकडा उजवी माकडनाळ – मे १९८२, लिंगाणा, भवानीकडा, हिरकणी कडा – नोव्हेंबर १९८२, कवनाई, धासकोन - डिसेंबर १९८२, भैरवगड, दाऱ्या घाट, जानेवारी १९८३, प्रबळगड – फेब्रुवारी १९८३, आजोबा – मार्च १९८३, चांदवड, इंद्राई, राजधेर, धोडप – एप्रिल १९८३, हरिश्चंद्र नळीची वाट - मे १९८३, साल्हेर - ऑगस्ट १९८३, माणिकगड - ऑगस्ट १९८३, कुलंग, मदनगड, अलंगगड  नोव्हेंबर १९८३, नवरा उर्फ भटोबा – प्रथमारोहण डिसेंबर १९८३, तैलबैला दुसरी भिंत प्रथमारोहण – मार्च १९८४, तुंगी सुळका प्रथमारोहण – एप्रिल १९८४, गोरखग़ड, मच्छिंद्र - जुलै १९८४, वजीर, प्रथमारोहण – डिसेंबर १९८४, लूज बोल्डर, प्रथमारोहण - फेब्रुवारी १९८५, राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड सोलो ट्रेक – नोव्हेंबर १९८८, कोकणदिवा सोलो – ऑक्टोबर २००९, नवऱ्याची करवली - जानेवारी २०११, पावनगड, पन्हाळगड, विशाळगड, पावनखिंड ट्रेक - सप्टेंबर २०१४, डांग्या सुळका - नोव्हेंबर २०१४, अंजनेरी, नवरा- नवरी, घोडा सुळके - जानेवारी २०१५, पहिने नवरी-नवरा सुळके – मार्च २०१५, मलंगगड - मार्च २०१६, वानरलिंगी सुळका - मार्च २०१६, रोहिदास शेंडी सुळका - नोव्हेंबर २०१७, फंट्या सुळका - एप्रिल २०१८, सांगनोरे सुळका व कोळेवाडींचा बुधला – मे २०१८ असे गिर्यारोहण आणि प्रथम प्रस्तरारोहण मी खूप केले.

पिडारी ग्लेशियर ट्रेक जून १९८३, सेंट्रल पिक मोहिम (५८१७ मिटर), अनामिक अजिंक्य शिखर जून १९८३, रुदुगैरा मोहिम सप्टेंबर १९८३, सैफि मोहिम सप्टेंबर १९८४, माना नॉर्थ फेस मोहिम ऑगस्ट १९८५ इत्यादी हिमालयातील पदभ्रमण व चढाई मोहिमा देखील केल्या आहेत. पार्ले, मुंबई येथील हॉलिडे हायकर्स व प्रामुख्याने निसर्गरक्षण आणि संवर्धन यात कार्यरत असलेल्या द नेचर लव्हर्स, या संस्थाच्या साथीने माझी ही वाटचाल झाली.

मात्र सह्याद्रीतील बाण सुळका चढायचा राहून गेला. त्यामुळे बाण व हिमालयातील एव्हरेस्ट शिखरावर आरोहण करण्याची माझी खूप इच्छा आहे.

ही भटकंती करताना वातावरणातील बदल जाणवू लागले. या जागतिक तपमान वाढीचं मुख्य कारण म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड या वायु मध्ये होणारी वाढ. अतिनील किरणे थेट पृथ्वीवर आल्यामुळे तपमान वाढत आहे. पेट्रोलजन्य खाजगी वाहनांचा गरजेपेक्षा अधिक वापर होत आहे. तो टाळण्यासाठी मी सार्वजनिक वाहन वापरण्याला प्राधान्य देतो. कार्बन डाय ऑक्साईडचा दुष्परिणाम कमी करण्याचा वैयक्तित प्रयत्न म्हणून जमेल तितकी झाडं लावण्याचा प्रयत्न करतो व इतरांनाही त्याचं महत्व पटवून देतो.

गिर्यारोहणातील व्यावसायिकतेमुळे सहभागी सभासदांमधील भावनिक बंध नाहिसा होऊन, एकमेकांशी जुळवून घेण्याची वृत्ती, परस्परांना मदत करण्याची वृत्ती नाहिशी झाली आहे, असे मला वाटते. काही व्यावसायिक आयोजक गिर्यारोहण क्षेत्राकडे पैसा कमावण्याचे क्षेत्र समजून सहभागी सभासदांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघातही वाढले आहेत.

व्यावसायिकरण विरहित गिर्यारोहणात सामुहिक नेतृत्व गुणाच्या वाढीचा, पर्यावरण रक्षणाच्या अमाप संधी आहेत. फक्त त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे.

गिर्यारोहणाने मला दिलेला मंत्र म्हणजे, हाती घ्याल ते तडीस न्या. गिर्यारोहण करताना तात्रिक कौशल्य, शारिरीक तंदुरूस्ती सोबतच अनुभवही तितकाच महत्वाचा असतो. म्हणून नविन मोहिमेसाठी सभासद निवडताना प्रत्येकाची शारिरीक क्षमता जाणून त्याप्रमाणे त्याच्यावर जबाबदारी सोपवायला हवी. ज्याभागात मोहिम आखली आहे. त्या परिसराची पूर्ण माहिती करून घेणे महत्वाचे आहे. मोहिमेचा योग्य कालावधी निवडायला हवा. मोहिमेसाठी लागणारा अन्न पुरवठा योग्यवेळी होण्यासाठी त्याचे तपशिलवार पँकिंग करणे महत्वाचे आहे. मोहिमेसाठी लागणारे तांत्रिक साहित्य आगाऊ जमा करणे. प्रत्येकाच्या सुरक्षिततेचा विचार करून त्याची उपाय योजना करणे आवश्यक आहे. मोहिमेत अनपेक्षित उद्भवू शकणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी एक राखीव गट तयार ठेवणे, हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मोहिमेसाढी लागणारा पैसा, अन्न व औषधे याचं योग्य नियोजन करावे व मगच मोहिमेवर निघावे.

शिखरावर चढाई करताना विरळ हवामानात श्वासोच्छवास करताना होणारा त्रास ही माझा कमजोरी जरी असली तरी मजबूत इच्छाशक्तिच्या जोरावर मी मोहिमा पार पाडल्या आहेत..

तसे गिर्यारोहण करताना पूर्वी झालेल्या चुका पुढल्या वेळी टाळणे व पाहिलेल्या चुका आपण न करणे हा धडा मी शिकलो. मार्च २०१६ला वानरलिंगी सुळका चढताना अपेक्षे पेक्षा उशीर झाला. साहजिकच उतरायला उशीर झाल्यामुळे काळोखात उतरताना ऱँपलिंग करण्याचा एक रोप अडकून राहिला, दुसरा हाताशी असलेला रोप वापरण्यापूर्वी अडकलेल्या रोपवरून दुसऱ्या रोपवर चेंज ओव्हर करायला गेलो तर सोबत असलेल्या मुलीचे केस त्यात गुंतले गेले. ती अशा रितीने अडकली की तिने जगण्याची आशाच सोडली. मग उपाय म्हणून वरचा अडकलेला दोर कापून केसही कापायला लागले. नंतर तिला दुसऱ्या रोपने सुरक्षित रित्या खाली आणण्याचे काम रात्रीच्या अंधारात करण्याचे अवघड दिव्य पार पाडावे लागले.

मी सायकलिंग पण केले पण एकदाच, मित्राची गियर नसलेली साधी सायकल घेऊन डिसेंबर १९८३ मध्ये रेवस ते पणजी असा किनार पट्टीने प्रवास केला आहे.

एडमंड हिलरी हा माझा आवडता गिर्यारोहक तर रायगड व माहुली हे आवडते गड आहेत. १९८४ साली नवीन नेतृत्वाला वाव देण्यासाठी आखलेली माहुलीतील सुळके आरोहणाची, आरोहणाचा अश्वमेघ ही आवडलेली मोहिम होय.

गिर्यारोहण क्षेत्राच्या सुदृढ वाढीसाठी या क्षेत्रात आलेली बाजारू वृत्ती दूर करण्याची पहिली गरज आहे. संस्थात्मक गिर्यारोहणाला पुन्हा चालना देण्याचीही गरज आहे, असे मला वाटते.

Sunday, October 17, 2021

आनंद पाळंदे

सत्तर वर्षीय श्री. आनंद पाळंदे यांनी गेली ५० वर्षे गिरिभ्रमणाचा आनंद लुटला आहे. महाराष्ट्रातील सह्य पर्वतामधील एकही डोंगरदरी, एकही दुर्गकपार किंवा एकही पठारप्रदेश नसेल जेथे पाळंदे यांनी भ्रमण केलेले नाही.

१९६४ मध्ये साहित्यिक गो नी दाण्डेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढलेल्या दहा दिवस दहा दुर्गया यात्रेच्या पुण्यातील कार्यक्रमातून व शाखेच्या किल्ल्यांच्या सहलीतून त्यांना गडदुर्गांची ओळख झाली. व पुढे त्यांचे बंधू इतिहासाचे अभ्यासक श्री. रमाकांत पाळंदे यांच्यामुळे वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी दुर्ग पर्यटनाला आणि गिरिभ्रमणाला सुरुवात केली. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सानिध्यामुळे पाळंदे यांचे सह्याद्री गिरिभ्रमण हे अधिकाधिक डोळस होत गेले. श्री. चंद्रकांत वाकणकरमुळे, मुंबईतील गिरिविहार संस्थेचे ते सभासद झाले. त्यांच्या हाईकमधून डोंगरातील आनंद अधिक समजून घेता आला. बैंक आफ बरोडातील नोकरीत आर्थिक स्थैर्य लाभल्यामुळे आवड जोपासत अभ्यास करणे सुलभ झाले. पुढे त्यांनी भारत आऊटवर्ड बाउंड पायोनियर्स या संस्थेचा रॉक क्लाइंबिंगचा कोर्सही केला.

गुरूवर्य डॉ.बापूकाका पटवर्धन, श्रीमती उषःप्रभा पागे, प्रा. सीताराम रायकर, श्री. दिलीप निंबाळकर इत्यादी सुहृदांच्या, जवळकीच्या मार्गदर्शनामुळे पाळंदेंच्या गिरिभ्रमणाला, डोंगरयात्रेला एक क्रीडा म्हणून परिमाण लाभले. आणि माऊंटेनियरिंग खेळाकडे ते ओढले गेले.

इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि  गिरिभ्रमणातील आनंद हे दुर्गांकडे आकर्षित होण्याचे प्रमुख कारण आहे, तर भव्यता, साहस व माऊंटेनियरिंग खेळाची खुमखुमी हे हिमालयाकडे आकर्षित होण्याचे कारण आहे, असे ते म्हणतात.

त्यांनी बेसिक माऊंटेनियरिंग कोर्स, नेहरू पर्वतारोहण संस्था, उत्तर काशी येथे १९७५ मध्ये पूर्ण केला. व नंतर गिरिभ्रमण संस्थेच्या १९७७ मधील श्रीकैलास मोहिमेत भाग घेतला. १९७८ मध्ये शितीधर शिखर सर केले. पुढे गंगोत्री हिमालयातील रुदुगैरा व थेलू या मोहिमांत नेतृत्व केले.

तर १९८६ मध्ये देवबन, ही गिर्यारोहण कारकीर्दीतील सर्वात कठीण मोहीम त्यांनी पार पाडली. या मोहिमेत बेस कॅम्पवरूनच परतावे लागले. प्रतिकूल हवामान आणि हिम वर्षावाला त्यांना तोंड द्यावे लागले. एकूण सात माऊंटेनियरिंग मोहिमा केल्या. काही मोहीमांचे नेतृत्वही केले. एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे ते बेस कॅम्पवरून शिखर पूर्व तळावर पोहोचले होते. त्यावेळी हवा प्रतिकूल असल्याने त्यांना बेस कॅम्प गाठावा लागला. पण, पुन्हा नव्याने चढाईची मानसिकता त्यांनी ठेवली.

हिमालयीन मोहिमेसाठी गिरिभ्रमण, कातळारोहण, हिम-बर्फारोहण अशा रितीने तीन टप्प्यांत खेळात प्रगती करावी. आठ हजारी मोहिमेच्या झटपट मागे लागणे नको. तसेच माऊंटेनियरिंग करताना स्वयंसिद्ध पद्धतीने मोहीम राबवावी. अशा पद्धतीने अनुभव आणि वारंवार प्रयत्न केल्याशिवाय यशप्राप्ती शक्य होत नाही. पण आनंद द्विगुणित होतो. शिखरापर्यंतचा प्रवास हा अन्य शिखरांवर चढाई करताना प्रेरित करतो. शिखरांवर चढाई करायला, तसा माणूस हा कमजोरच आहे. गिर्यारोहण खेळात स्पर्धा नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आनंदी बनावे इतकेच. आपली आवड हीच शक्ती आहे. गिर्यारोहण करताना झालेल्या चुकांतून धडा म्हणजे, वातावरणाशी समरसता हवीच, उत्तम साधने हवीत, माघार म्हणजे आयुष्यातील अपयश नाही हे कायम मनात असले पाहिजे. चार ते सहा जणांचा लहान संघ मोहिमेत असावा. त्याने पर्वतावर, वातावरणावर प्रतिकूल परिणाम होणार नाही. शेर्पा, गाईड फक्त सहकारी म्हणून असावे. सारथी नकोत,’ असे ते म्हणतात. अल्पाईन पद्धतीला, त्यांचा मनापासून पाठिंबा आहे. कारण सोपे ते कठीण अशी वाटचाल हेच खेळाचे सूत्र असते. शिवाय ही पद्धत सर्वांत पर्यावरण अनुकूल आहे.

या निकषातून १९८२ मध्ये उषःप्रभा पागेंच्या सहकार्याने गिरीप्रेमी संस्थेची स्थापना त्यांनी केली. पहिली मोहिम उष:प्रभा पागेंच्या नेतृत्वाखाली आखली. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी शशी रानडे, श्रीकांत ओकच्या मार्गदर्शनाखाली दुधा स्लॅब येथे अवघड रॉक क्लाइंबिंगची माहिती करून घेतली, सराव केला आणि पारसिक पिनॅकल चढून त्यावर शिक्का मोर्तब केले. गिरिप्रेमीची लिओ पार्गियलही पहिलीच मोहिम यशस्वी झाली.

१९८४ मध्ये कामेत रांगेतील बिधन पर्वत मोहिम यशस्वी,  तर १९८६ मध्ये याच शिखराच्या शेजारील देवबन शिखऱ सर करण्याचा प्रयत्न त्यांना अर्धवट सोडावा लागला.

त्यांनी कर्नाळा व लिंगाणा या सुळक्यांवर देखिल छोट्या संघातून चढाई केली आहे.

त्यांच्या मते, किल्ले पर्यटन म्हणून गिर्यारोहण करताना शारीरिक तंदुरुस्ती पुरेशी आहे. अनुभव आवश्यक नाही. पण माऊंटेनियरिंग खेळ म्हणून गिर्यारोहण करताना प्रशिक्षण, सराव आणि प्रदीर्घ प्रयत्न हवेत.

 मनोहर', 'केसरी', 'स्वराज्य', 'सकाळ', 'महाराष्ट्र टाईम्स', ‘जिद्द इत्यादी नियतकालिकांनी गिरिभ्रमणातील अनुभव शब्दबध्द करण्यास त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले. त्यातूनच पुढे आव्हान', ‘गिरीदुर्गांच्या पहाऱ्यातून',  'दुर्ग तोरणा'दुर्ग पुरंदर ही पुस्तके निर्माण झाली. माऊंटेनियरिंग म्हणजे काय हे त्यांच्या 'गिर्यारोहण गाथा आणि रोमांचक गिर्यारोहण' या पुस्तका मधून समजते. तरुण, तरुणींमध्ये गिरिभ्रमणाचे प्रेम निर्माण व्हावे, गिरिभ्रमणाचेही एक शास्त्र असते, त्याची पथ्ये असतात आणि अशी डोंगरयात्रा-क्रीडा अधिकच निखळ आनंददायी ठरते, हे अनेकांना कळावे ह्या हेतूने पाळंदे यांनी 'डोंगरयात्रा' या ग्रंथाची रचना केली आहे.

२०१९ मध्ये बेस कॅम्पवरूनहे पुस्तक प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचे अनुभव कथन, त्यांनी इतर मान्यवरांच्या सहकार्याने यामध्ये संपादित केले आहे.

गिर्यारोहणामध्ये काही प्रमाणात झालेल्या व्यावसायिकरणामुळे माऊंटेनियरिंग खेळाची पिछेहाट झाल्यासारखी वाटते. व्यवसाय करणाऱ्या मंडळींचा, साहसी पर्यटक अथवा आरोहक यांचा योग्य फायदा झाला आहे. एजन्सी व्यवसायाला संधी निर्माण झाली, साधनसामुग्री कारखानदारी, दुकाने वाढली. स्थानिक वाटाडे, शेर्पा, हॉटेल आदिंचे उत्पन्न वाढले. चांगले मार्गदर्शक तयार झाले आणि पुढे होतील. या गिर्यारोहणातील संधी आहेत, असे ते म्हणतात.

प्रयत्न, निडरपणा, स्वावलंबी आनंदी जीवन, साहचर्य आदी गुण गिर्यारोहणामुळे वाढले, असे त्यांना वाटते.

आता वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली आहे. पण  अल्पाईंन पध्दतीने तसेच शेर्पा शिवाय आणि प्राणवायूचे सिलिंडर न वापरता आठ हजारी शिखरावर जर एखाद्या भारतीयाने चढाई केली तर त्यांचे कौतुक करायची त्यांची इच्छा आहे. यासाठी व्यावसायिकांनी आर्थिक वाटा उचलावा. तसेच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जिल्हा पातळीवर माऊंटेनियरिंगचा प्रसार केला पाहिजे असे त्यांना वाटते. हा खेळ योग्य नियम पाळले तर जीवनशैली बदलणारा आहे. अर्थात यासाठी माऊंटेनियरने स्वमूल्यमापन करणे गरजेचे आहे. तसेच निकष पक्के करून संघटनेने पारितोषिके द्यायला हवीत. बेस कॅम्पवरून हे पुस्तक त्यादृष्टीने अभ्यासावे असे त्यांचे मत आहे.

डोंगरांमधून पावलांच्या ठशां शिवाय काही ठेऊ नका, सुखद आठवणीं वाचून काही नेऊ नका, हा संदेश ते सर्वांना देतात.

त्याच्या डोंगरयात्रा या पुस्तकाला १९९४ मध्ये केसरी-मराठा संस्थेचा पुरस्कार मिळाला. २०१० मध्ये महाराष्ट्र सेवा संघाचा साहित्य पुरस्कार, २०११ मध्ये गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचा पुरस्कार आणि २०१३ मध्ये गिरीमित्र जीवनगौरव पुरस्कार, अश्या विविध पुरस्कारांनी ते गौरविले गेले आहेत. मात्र हे सर्व साहित्य पुरस्कार आहेत. माऊंटेनियरिंग खेळाचे पारितोषिक निकषच नाहीत तर पुरस्कार कसे अशी खंत ते अखेर व्यक्त करतात.

Friday, October 1, 2021

 प्रदीप सदाशिव केळकर

प्रदीप तसा लहानपणापासून उत्तम जलतरणपटू आहे. तसेच जिल्हा पातळीवर खो खो खेळाचा दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. सतत काहीतरी नवीन करायचं, काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम हातात घेत यशस्वीपणे राबवायचे, ही त्याची वृत्ती,  यातूनच १९७८ ला पहिल्यांदा तो निसर्गामध्ये भटकंतीला गेला आणि बघता बघता निसर्गाच्या प्रेमातच पडला.

१९७९ ते १९८१ दरम्यान तो फक्त गिर्यारोहण करत होता. पण ते करता करता हळूहळू मुंब्र्याच्या डोंगरावर त्याचा प्रस्तरारोहणाचा सराव चालू झाला. या दरम्यान त्याचा मित्र राजेंद्र रानडे याच्या माध्यमातून हॉलिडे हायकर्स व नेचर लवर्स या मुंबईच्या नामांकित संस्थेची त्याची ओळख झाली. त्यां संस्थां बरोबर २५ जानेवारी १९८१ रोजी लिंगाणा सुळक्यावर त्याने यशस्वी चढाई केली. हिरा पंडित, दिलीप झुंजारराव, रमाकांत महाडिक, नरेंद्र सेठिया, जगन्नाथ राऊळ अशा दिग्गजां बरोबर प्रस्तरारोहण मोहिमांचा श्री गणेशा झाला. पुढील काळात प्रजापती बोधने, कै. अरुण सावंत कै. मिलिंद फाटक यांच्या सारख्या निष्णात गिर्यारोहकाकडून त्याला खूप काही शिकायला मिळाले.

हे सर्व करत असताना किर्ती कॉलेज मध्ये दोन वेळा व पेंढारकर कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष प्रस्तरारोहणाच्या प्रात्यक्षिकांचे धडे त्याने दिले आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्रातील अनेक कॉलेजांमध्ये कृत्रीम प्रस्तरारोहणाचे अनेक उपक्रम यशस्वीपणे त्याने राबविले आहेत.

आत्तापर्यंतच्या त्याच्या वाटचालीत ३० अजिंक्य तर ३० ते ४० अजिंक्य मार्गाने चढाई करत त्याने सुळके सर केले आहेत. जानेवारी २००८ रोजी म्हणजेच त्याच्या यशस्वी दहाव्या लिंगाणा चढाई मोहीमेत, त्याला पहिल्या अवघड लिंगाणा मोहिमेत मदत करणाऱ्या स्थानिक गावकरी बबन याच्या नऊ वर्षाच्या मुलाला लिंगाण्याच्या माथ्यावर यशस्वीपणे पाय रोवण्यास मदत करण्याचे भाग्य त्याला मिळाले. विशेष म्हणजे लिंगाणा मोहिम त्याच्यासाठी कायमच आव्हानात्मक तसेच स्फूर्तीदायक व खास राहिली आहे. १६ नोव्हेंबर १९८४ मध्ये त्याने लिंगाणा सुळक्यावर एकट्याने यशस्वी चढाई केली होती. परंतु त्यावेळेला आत्ता एवढी प्रसार माध्यमे उपलब्ध नसल्यामुळे फार थोड्या गिर्यारोहकांना या घटनेची माहिती झाली. त्यामुळे काही काळाने ह्या यशस्वी एकट्याने केलेल्या मोहिमेची महाराष्ट्रात नोंद घेतली गेली.

सह्याद्रीत मोहिमा चालू असतानाच त्याला हिमालयाचे वेध लागले. १९८३ मध्ये मनाली येथे पर्वतारोहणाच्या बेसिक कोर्स मध्ये श्रेणीमध्ये त्याने प्रावीण्य मिळवले. मग पुढील वाटचालीत पाच हिमालयन मोहिमां मध्ये यशस्वी सहभाग घेतला. आणि या सर्व अनुभवाच्या जोरावर सहा हाय अल्टिट्युड ट्रेकचे यशस्वी आयोजन केले.

गेली ३६ वर्षे प्रस्तरारोहण शिबिरातून अनेकांना त्याने मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट सेक्टर मध्ये ११० कंपन्यांचे कार्यक्रम आउटडोर एक्सपर्ट या नात्याने यशस्वीपणे राबविले आहेत.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे १९८६ साली पहिल्यांदा कोकणातील मुलांसाठी रत्नागिरीमध्ये गिर्यारोहण क्षेत्राच्या वाढीसाठी प्रस्तरारोहण शिबिराचे आयोजन केले. त्यानंतर स्थापन झालेल्या रत्नदुर्ग माउंटेनियर या कोकणातील एकमेव रजिस्टर संस्थेला सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेने या वाटचालीत अत्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. आपत्ती व्यवस्थापनात जिल्हा पातळीवर अनेक वेळा संस्था सरकारी कामात मदतीसाठी धावून गेली आहे. आज संस्थेमध्ये दुसरी पिढी अत्यंत सक्षमपणे कार्यरत आहे. या संस्थेला नुकताच शिखर सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार', स्वा. सावरकर स्मारक, मुंबई यांच्या वतीने घोषित झाला. संस्थेचा प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्थातच प्रदीप कौतुकास पात्र आहे.

हे सर्व करत असताना किर्ती कॉलेज मध्ये दोन वेळा व पेंढारकर कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष प्रस्तरारोहणाच्या प्रात्यक्षिकांचे धडे त्याने दिले आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्रातील अनेक कॉलेजांमध्ये कृत्रीम प्रस्तरारोहणाचे अनेक उपक्रम यशस्वीपणे त्याने राबविले आहेत.

आत्तापर्यंत त्याने टकमक कड्यावरून सात ते आठ वर्ष, तसेच ड्युक्स नोज वरून चार ते पाच वर्ष याच बरोबर नानाच्या अंगठ्यावर वरून रॅपलिंगचे कार्यक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. तीन-चार वर्ष वॉटरफॉल रॅपलिंगचेही आयोजन यशस्वीपणे केले आहे.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेल लीला येथे दिनांक १५ ऑगस्ट २०१२ रोजी एन. एस. जी. कमांडोच्या नंतर यशस्वी प्रात्यक्षिके दाखविण्याचे भाग्य त्याला मिळाले. हे पहिलेच नागरी सादरीकरण होते. १९९१ च्या पहिल्या राज्यस्तरीय प्रस्तरारोहण स्पर्धेत तो दुसरा व १९९३ मध्ये झालेल्या स्पर्धेत तो चौथा आला होता. तसेच १९९४ झाली झालेल्या पहिल्या राष्ट्रीय वॉल क्लाइंबिंग स्पर्धेत महाराष्ट्रातून त्याची निवड झाली होती.

तापर्यंत महाराष्ट्रभर अनेक स्लाईड-शो द्वारे त्याने मुलांच्या मनात जिद्द, चिकाटी व साहस तसेच नेतृत्वगुण जोपासण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

१९८६ साला पासून एका गरजू विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीला शिबिरामध्ये निशुल्क प्रवेश देण्याची संकल्पना राबवणारा कदाचित तो पहिला गिर्यारोहक असे. अनेक वर्षे या क्षेत्रात निस्पृहपणे वैयक्तिक व संस्थात्मक प्रशिक्षि देत, आज तो सक्षम पणे या क्षेत्रात स्वतःची कामगिरी पार पाडत आहे.

 हे सर्व करत असताना त्याने सामाजिक बांधिलकी जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे १९८५ झाली आंतरराष्ट्रीय युवक वर्षात प्रयत्नांची शर्थ करत रात्री ते १२ या वेळात, राजगड किल्ल्याच्या कड्यावर अडकलेल्या गिर्यारोहकांना सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच १९८६ साली अजिंक्य बा मोहिमेत झालेल्या अपघातात क्षणाचाही विलंब न करता, गिर्यारोहक मित्राची त्याने सुटका केली आहे. त्याच बरोबर ड्युक्सनोज रॅपलिंगच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका मुलीचेही प्राण वाचविले आहेत.

एक जून १९९७ रोजी भर पावसात किल्ले माहुली येथे एक हजार फूट खोल दरीमध्ये रॅपलिंग करत उतरत गिर्यारोहकाचा मृतदेह काढला आहे. तसेच किल्लारी भूकंप मदत पथकात दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व करून सलग आठ दिवस मदतीचे कार्य केले आहे.

नोव्हेंबर २०१८ साली ३८ किलोमीटरची गिरनार परिक्रमा पावणे आठ तासात त्याने पूर्ण केली. एक दिवसानंतर गुरुशिखराच्या दहा हजार पायऱ्या केवळ पाच तासात चढून पुन्हा खाली सुखरूप पोहोचला आहे.

१९९७ला क्रिकेट विश्वचषकासाठी बनविलेल्या कॅडबरी पिकनिक या जाहिरातीचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही त्याने काम पाहिले.

जुलै २००२ मध्ये झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय गिरीमित्र संमेलनाच्या प्रमुख पदी त्याची निवड झाली होती. तसेच सहा जून २००६ मध्ये झालेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या उपाध्यक्ष पदाचे भाग्य त्याला लाभले.

१४ ऑगस्ट २०१६ मध्ये कॅलिफोर्नियामधील माउंट डेना  हे शिखर त्याने सर केले. त्याच बरोबर १५ ऑगस्ट २०१६ रोजी साडेआठ हजार फुटावरून भारताचा तिरंगा हातात धरून कॅलिफोर्नियामध्ये स्काय डायव्हिंग केले.

या ४२ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये गिर्यारोहण व सामाजिक क्षेत्रात अनेक पुरस्कार त्याला मिळाले. त्यातील काही अभिमानास्पद पुरस्कार म्हणजे, श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार - महाराष्ट्र राज्य, ठाणे महापौर व ठाणे गौरव पुरस्कार - ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र सन्मान - एचआरडी संस्था, गिरीमित्र गिर्यारोह सन्मान - महाराष्ट्र सेवा संघ, ठाणे रत्न - हिंदुस्थान टाइम्स, केळकर कुलभुषण पुरस्कार - केळकर कुळसंमेलन २०२०, गडकोटांचे मानकरी सह्याद्री मित्र संमेलन, याच बरोबर लायन्स क्लब, रोटरी एक्सलन्स ॲवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी त्याला गौरविले आहे.

बाण सुळक्यावर आनंद शिंदे सोबतआजपर्यंत दृक-श्राव्य माध्यमातून अनेक ठिकाणी त्याच्या मुलाखती झाल्या असून वृत्तपत्रांमध्ये देखील अनेक मुलाखती व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

या सर्व अभिमानास्पद वाटचालीत त्याला बेस्ट उपक्रमातील त्याचे सहकारी. गिर्यारोहक व गिर्यारोहण संस्था, तसेच आप्तस्वकिय यांचे मोलाचे योगदान आहे, असे तो आवर्जून सांगतो.

३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर, सप्टेंबर २०१५ रोजी मुंबईच्या बेस्ट उपक्रमातून तो निवृत्त झाला. पण अजूनही तो त्याच उमेदीने गिर्यारोहण करत असतो.