Wednesday, July 7, 2021

चारू उर्फ चारुहास गणेश जोशी

 

पासष्ट वर्षीय चारुहास जोशी, ह्यांचे पर्वतारोहण व प्रस्तरारोहणात क्षेत्रात लाख मोलाचे योगदान आहे. ते वेलिंगकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट या प्रख्यात संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असून एक्सपीरीएन्शीअल लर्निग या विभागात प्रमुख असा पदभार सांभाळत आहेत. तसेच हार्ड नॅाक्सहिल्स ॲन्ड ट्रेल्स या अनुक्रमे कॅार्पोरेट ट्रेनिंगॲडव्हेंचर हॉलीडेज या क्षेत्रात योगदान करणाऱ्या संस्थेत ते भागीदार आहे. त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात ...

माझ्या यशाचे बहुतांश श्रेय मी गिर्यारोहण क्षेत्रांतील माझ्या जडणघडणीला देईन. डोंगराचे डोंगराएवढे उपकार स्मरून या प्रवासातील महत्त्वाचे पडावं विस्ताराने मांडतो.

मी शाळेत असताना एकदा वडिलांबरोबर गड किल्ले सफर घडली. आणि इथेच माझ्या गिर्यारोहणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीस शाळेतील मित्रांबरोबर डोंगरातील भटकंती सुरू झाली. एकीकडे मिडलस्कुल, तसेच हायस्कूलची स्कॅालरशीपही मिळवल्यानंतर स्कॅालर म्हणून ओळखला जाऊ लागलो.

प्रस्तरारोहणाची सुरुवात मात्र कॉलेज जीवनात झाली. कान्हेरी गुंफा कळवा-मुंब्रा तसेच मामा भांजा येथील प्रस्तरांवर आरोहण सुरू झाले. प्रस्तरारोहणात प्राविण्य मिळविण्यासाठी कराटे (बॅलन्स, स्ट्रेन्थ, स्फोटक  पॅावर तसेच फ्लेक्सीबीलीटीसाठी) बास्केटबॉल (बॅायन्सीसाठी) व ॲथलेटिक्सचा (स्टॅमिनासाठी) सराव करुन त्या सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवले. कराटे मधे ब्राउन बेल्ट, बास्केटबॉल संघाचा रुपारेल कॅालेजचा कॅप्टन व ॲथलेटिक्समधे ढीगभर मेडल्सची कमाई केली. बुध्दिबळातही सलग तीन वर्षे मुंबई विद्यापीठाची चॅम्पियनशिप तसेच आंतरविद्यापीठ रनर्स-अप पद मिळाले. देवाने देण्यात झुकते माप दिले होते.

आयुष्याच्या या वळणावर, निर्णय करणे अवघड होते की वरील क्षेत्रातील कोणत्या क्षेत्रात जास्त प्रमाणात मेहनत घेऊन ते आपलं कार्यक्षेत्र निश्चित करावे. गिर्यारोहणाची निवड करताना असा विचार केला की या क्षेत्रात बुद्धी, बळ, लवचिकता, निर्णय क्षमता, धैर्य इत्यादींचा कस लागणार व त्या व्रुध्दिंगत होणार!

१९७४ साली हिमालयातील पहिला ट्रेक मिलाम ग्लेशिअर हा दोन मित्रांसह केला. निसर्गाच्या त्या भव्यतेने भारावून गेलो. अंगी लीनता बाणवीण्यास असे अनुभव मदत करतात. आणि हे सर्व सुरू असताना रुपारेल, किर्ती, रुईया, लाला लजपतराय, न्यू लॅा कॅालेज व इतर अनेक विद्यापीठांच्या हाईक्स लीड करणे असे उद्योगही सुरू होते. यात भर म्हणजे गिरविहार संस्थेकडून प्रस्तरारोहण शिबिरासाठी, प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा साधारण १९७५ चा काळ होता. त्या वेळी प्रस्तरारोहणाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. उत्क्रांतीचा काळ होता. माझ्यासाठी ही मोठीच संधी मिळाली. मी संपूर्ण शिबिराचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले व मी ते अर्थातच स्वीकारले.

सर्व प्रथम चार दिवसांच्या शिबिराचा अभ्यासक्रम तयार केला. इतर योग्य प्रशिक्षकांची नेमणूक केली व प्रत्येकाला विशेष रोल देउन, त्यांच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली. बेसीक व ॲडव्हान्स प्रस्तरारोहण शिबिरामध्ये नेमका काय फरक आहे व त्या अनुषंगाने अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टी? व का? समाविष्ट कराव्यात या बाबतीत सुस्पष्टता आणली. सर्व प्रशिक्षकांचे मानधन किती असावे हे निश्चित केले व त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे समजावून सांगितले. अर्थातच हे शिबिर यशस्वी झाले. त्या शिबिरातील बरेचसे प्रशिक्षक व समकालीन प्रस्तरारोहक दूर दूरपर्यंत जाऊन बेलाग कडे कपारी सर करण्यासाठी मोहीमा आखत होते. परंतु माझ्या मते टेक्निकल चॅलेंज साठी दूर जाणं आवश्यक नव्हते. मुंबई जवळील मुंब्रा-कळवा, कान्हेरी गुंफा, मामा भांजा येथील अनेक कडे, बोल्डर्स हे मी माझे आरोहणाचे क्षेत्र ठरवले. या लोकल खडकांवरील अनेक प्रथम चढाया माझ्या नावावर आहेत. अनेक नावीन्यपूर्ण कल्पना मी शोधल्या, जसे की नी जॅम, बार्न डोअर मुव्हज इत्यादि. तसेच नट-बोल्ट पैकी नट आतुन घासुन त्याचे चोक बनविणे, रेल्वे रुळातील दगड गोळा करून ते चोक म्हणून वापरणे, पिटॅान बनवून ते वापरणे, असे उद्योगही केले.

७८/७९ च्या सुमारास ठाणे येथील चिल्ड्रेन रॅम्बलर्स तर्फे आयोजित केलेल्या एक्स्पीडीशन मध्ये फ्रेन्डशिप पीकवर, १०/११ वर्षे वयाच्या तीन मुलांचे समिट करवून मोठा जबाबदारी पार पाडली. श्रीकांत ओक (नेता) व मुकुंद देवधरने ठेवलेल्या विश्वासाचे चीज झाले! त्या वेळी हा एक विक्रमच गणला गेला. त्या काळी मनाली पासून चालत जावे लागे. फक्त एक गाईड घेऊन, एकही पोर्टर न घेता, ही मोहीम फत्ते केली.

पुढील वर्षी ‘IMF’ या शिखर संस्थेकडून आयोजित एका ब्रिटिश तुकडीचे नेतृत्व करत शिंगोला पास हा हाय अल्टीट्युड ट्रेक संपन्न झाला. यात उल्लेखनीय गोष्ट अशी की, दोन पडाव पार केल्यावर तिसऱ्या दिवशी एका ब्रिटिश सदस्याची, हाय अल्टीट्युड आजारामुळे परत सुरक्षित खाली पाठवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. सकाळी लवकर सुरूवात करुन मी त्याला घोड्यावर बसवून, गाईडला बरोबर घेऊन, संध्याकाळी दारच्छा या गावात पोहचलो. त्या आजारी माणसाला दुसऱ्या दिवशी बस मध्ये बसवून दिल्लीला पाठवण्यासाठी गाईडला मागे ठेवलं.

मी पहाटे ५ वाजताच परत बाकी सदस्यांना गाठण्यासाठी धावत निघालो. त्या दिवशी मला एकाच दिवसात चार पडाव अंतर पार करणे जरुरीचे होते. मी जेव्हा आजारी माणसाला घेऊन उतरलो तेव्हा बाकी सर्व पडाव तीनला पोचले. व मी १०,००० फूट उंचीवरील दारच्छा वरून सुरुवात केली तेव्हा ते शिंगोला पास ओलांडून पदमच्या बाजूला पडावं चारला पोचणार होते. पडावं दोन पर्यंत रस्ता माहित झाला होता. परंतु पुढील मार्ग मला एकट्याला शोधावा लागला. खिंडीत पोहचेपर्यंत बर्फवृष्टी सुरू झाल्याने पुढील मार्ग नाहीसा झाला होता. मोठाच प्रश्न निर्माण झाला. परंतु जीवन मरणाचा प्रश्न असल्याने, मी धीर न सोडता मार्गक्रमण करून संध्याकाळी ७ वाजताच पडावं चारला पोहचलो. एका दिवसांत, ८००० फूट चढत, १८००० फूटाच्या अती उंचीवर पोहोचलो, अनोळखी प्रदेशात, ६५ किलोमीटरचे डोंगरातील अंतर कापत मी या मुक्कामास पोहचलो होतो.

अशा जीवन मरणाच्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्याने बनलेली जडणघडण पुढील आयुष्यात कामी आली. मुंबईला परतल्यावर व्हिजेटीआय, ‘रुईया महाविद्यालयातील एनसीसी युनिट, ‘ठाणे माउंटेनीअर्स व ट्रेकर्स इ. अनेक संस्थांना प्रस्तरारोहणाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले. याच काळात श्री. रिबेरो हे ठाणे पोलीस दलाचे प्रमुख असताना पोलीस दलाचे प्रस्तरारोहण शिबीर मुंब्रा येथे संपन्न केले. १९८२ वर्ष अखेरीस स्व. संजय बोरोले यांनी दोन वेळा प्रयत्न करुनही यश न आल्यामुळे वानरलींगी उर्फ खडा पारसी हा जीवधन जवळील ४५० फुटांचा बेलाग सुळका चढण्यासाठी आमंत्रित केले. त्या काळी उपलब्ध असलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानाने तो अजिंक्य सुळका सर करणे शक्य नाही, असे माझ्या लक्षात आले. आपला भारत देश त्या काळी प्रस्तरारोहण क्षेत्रात पाश्चिमात्य देशांपेक्षा किमान ३०/४० वर्षे पिछाडीवर होता. परंतु अशक्यप्राय भासणाऱ्या या आव्हानाला मी मनाने स्वीकारले होते. मला आठवले की, त्याच वर्षी माझ्या एअर इंडियातील मित्रांने नुकतेच अमेरिकेतील बाजारात उपलब्ध झालेले ३ एक्स्पान्शन बोल्ट्स खरीदले होते. मला त्यामुळे आशेचा किरण दिसला. त्याच्याकडून ३५० रुपयांचा १ बोल्ट, असे तीनही खरेदी केले. इलेक्ट्रीशीयनचा रावळ पंच व हातोडा याने प्रस्तरात भोक करून ते बोल्ट्स त्यात ठोकून वापरायचे तंत्रज्ञान विकसित केले.

त्या आरोहणासाठी असे अनेक संख्येने बोल्ट्स लागणार असल्याचे लक्षात आले. खूप खर्च येणार होता.  आयात करणे अवघड होते व परवडणारेही नव्हते. मी ते स्वतः १९८२ मध्ये बनविले. परंतु त्यांच्या गुणवत्तेच्या चाचण्यांसाठी भारतात लॅब्स उपलब्ध नसल्याने चाचण्यांसाठी पध्दतही शोधली. डिझाईन थिंकींगचे ते उत्तम उदाहरण आहे. बाकी साहित्य गोळा करणे, हाही एक मोठाच प्रोजेक्ट होता. तेव्हा मोजक्याच संस्थांमध्ये माफक संख्येने उपलब्ध असणारी साधने मेहरबानी खात्यात मिळाली. कमीतकमी साधने वापरून हे आरोहण १९८३ मार्चमध्ये यशस्वी झाले.

हे आरोहण त्या काळातील गेम चेंजर ठरले. अनेक गोष्टी या क्षेत्रात प्रथम घडल्या.

* कृत्रिम प्रस्तरारोहण नव्यानेच सादर झाले.

* एकापेक्षा जास्त दिवसांचे प्रस्तरारोहण झाले.

* पहिलेच रात्रीचे प्रस्तरारोहण झाले.

* जेमतेम उभे राहाता येईल, अशा छोट्या जागेत रात्र घालवली गेली.

या सर्वांची हिमालय क्लबने दखल घेऊन स्लाईड शो आयोजित केला. मुंबई, पुणे, नाशिक व इतरही ठिकाणाहून आमंत्रण मिळुन असे अनेक शोज झाले. मीही मोकळेपणाने, महत्सप्रयासाने विकसीत केलेले तंत्रज्ञान सर्वांना वाटले. आणि त्यानंतरच्या काळात आयोजित केलेल्या, ॲडव्हान्स रॅाक क्लाईंबींग कोर्सेसना उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात श्री. सुनील मोहीलें, जे माझ्या कॅालेज जीवनापासून माझी साथ देत होते; त्यांनी अनमोल असे योगदान दिले. ‘खडा पारसी हा कृत्रिम प्रस्तरारोहणातील मानाचा पहिला दगड ठरला.

मला स्वतःला यानंतर परत अशी चढाई करण्यात स्वारस्य नव्हते. एकदा सिद्ध झाले की असे कोणतेही प्रस्तरारोहण, पुरेसे पैसे, वेळ व शारीरिक क्षमता विकसित केल्यावर शक्य आहे, तर मग माझ्यापुरतं त्यातील आव्हान संपुष्टात आले. आणि मग मी पुन्हा अशी चढाई करण्यात वेळ न दवडता वेगळे मोठे आव्हान शोधू लागलो.

कांचनजंगाच्या रुपात ते साकार होईल असे वाटू लागले. १९८८ साठी ह्या शिखरावर चढाईसाठी नेपाळ सरकार कडून परवानगी मिळाली. ८००० मीटरच्यावर असणाऱ्या १४ शिखरांपैकी एक व चढाईसाठी अत्यंत अवघड असा लौकिक असलेले हे जगातील तीन क्रमांकावर शिखर असून, भारतीय नागरिकांकडून कधीच प्रयत्नही न झालेले शिखर होते. १९८५ मध्ये ही परवानगी मिळाली आणि जोरदार तयारी सुरू झाली. एकीकडे तुकडीची निवड, प्रत्येकाचे स्थान व जबाबदारी निश्चित केल्यावर खर्चाचा अंदाज घेणे. नेपाळ मधील भारवाहक एजन्सी नक्की करणे, साधनांची सूची, इंपोर्ट लायसेन्स इ. तयारी बरोबरच प्री कांचनजुंगा मोहिमा आखण्यात आल्या.

माझ्या तुकडीने फाबरॅंग हे टेक्निकली कठीण पीक निवडले. बेस कॅंपनंतरची चढाई करण्यात मी, देवीसींग या आमच्या शेर्पा गाईड बरोबर पुढाकार घेतला. सूर्य मावळतीला असताना आम्ही दोघेपण १८,००० फूट उंचीच्या एका धारेवर पोहचलो. आणि रात्रीच्या मुक्कामासाठी आम्ही तंबू रोवण्यासाठी योग्य जागा शोधू लागलो. परंतु दोन्ही बाजूला तीव्र उतार असल्याने योग्य जागा मिळेना. एकीकडे अंधार दाटून येऊ लागला. थंडी आणि जोरदार वारा यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली. शेवटी नाईलाजाने  ॲक्सच्या सहाय्याने धार खोदून व नंतर बुटांनी तुडवून टु मॅन टेंटपुरती सपाट जागा तयार केली. कसाबसा तंबू उभा राहिला. पण स्लीपिंग बॅगमध्ये सेटल झाल्यावर जाणवत होतं की पाय एका दरीत व डोकं दुसऱ्या दरीत आहे. अविस्मरणीय अनुभव होता.
दुसऱ्या दिवशी उठून शिखर गाठले. परंतु खरा थरार पुढेच होता. हे नंतर कळले. झाले असे की उतरावयास सुरुवात केली. सर्वत्र ताजा हिम वर्षाव झालेला. त्यात तीव्र उतार, त्यामुळे बुटांना क्रॅंपॅान्सची अँटॅचमेंट लावुन सरुवात केली. ४००/५०० फूट खाली एक अरूंद हिमखाई वासून तयारच होती. त्यामुळे जपूनच एक एक पाऊल टाकावे लागत होते. तरीही काही कळायच्या आतच, ध्यानीमनी नसताना अचानक घसरलो. तीव्र उतार असल्याने घसरण्याचा वेग देखील वाढला. केवळ प्रतिक्षिप्त क्रिया व आधी केलेला सराव कामास येऊन, ॲक्स योग्य रीतीने हळुहळु रोवुन वेग नियंत्रित करुन ब्रेक लावण्यात यशस्वी झालो. देवाचे आभार मानले. कारण खाली हिमखाई माझा घास घेण्यासाठी तयारच होती. जरासा भानावर येऊन सुरुवात केली आणि परत एकदा घसरु लागलो. परत ब्रेक लावला. आणि आता मात्र मी चमकलो. काहीतरी अनाकलनीय असे घडत होते. मी घसरण्याचे कारण शोधून काढले. तेव्हा असे लक्षात आले की क्रॅंपॅान्स १० पॅाईंटर असल्याने त्यात बर्फ खाली गच्च गोळा होउन (Lumpenisation)  प्रतिरोध मिळत नव्हता. त्यामुळे घसरण होत होती. अडचणीची उकल झाल्यावर, दर पायरीला बुटावर ॲक्स आपटत Lumpenisation टाळत चालू लागलो आणि मग जमलं की

कांचनजुंगा खूपच मोठा प्रोजेक्ट होता. त्या काळी पर्वतारोहणासाठी प्रायोजक मिळविणे फारच दुरापास्त होते. परदेशातून साधन-सामुग्री मागवणे जिकिरीचे होते. परंतु अशक्यप्राय वाटणारी अशी अनेक आव्हाने पेलत प्रकल्प उभा राहिला, तो केवळ उत्तम टीमवर्कमुळे. परंतु असे आव्हान स्वीकारण्याची हिम्मत असणं हीच मुळात मोठी बाब होती.

मी ८००० मीटरच्या वर क्लाईंब करणारा, तेही ऑक्सीजनच्या मदतीशिवाय; प्रथम भारतीय नागरिक ठरलो. शिखर सर झाले नाही. पण मी व उदय कोळवणकर दोघे ८००० मीटर्सचा टप्पा गाठू शकलो, ही सुद्धा मोठीच झेप होती. प्रस्तरारोहण व पर्वतारोहण अशा दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे हाताच्या बोटावर मोजता येतील. देवाच्या कृपेने असे विशेषत्व माझ्या वाट्याला आले. दोन महिने सलग  १८,००० फूटांवर रहाण्याचा जगावेगळा अनोखा अनुभव मिळाला. अनेक जिवाभावाचे मित्र मिळाले.

यानंतर पुढील २/३ वर्षे मी व डॅा. मिलिंद चितळे जो कांचनजुंगा मोहीमेत आमच्या मोहिमेचा डॅाक्टर होता, आम्ही मिळुन मुंबई, पुणे, नाशिकच्या संस्थांसाठी माउंटन फर्स्ट एडमाउंटन रेस्क्युची अनेक शिबिरे विनामुल्य आयोजित करुन सर्वदूर प्रस्तरारोहणातील सुरक्षितता, रोप हॅंडलींग, मॅनेजमेंट, तसेच रेस्क्यु आणि फर्स्ट एडचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले. अशा रीतीने या क्षेत्राचा प्रसार होण्यास तसेच त्यातील सुरक्षितता वाढण्यास आमच्या परीने हातभार लावला.

भारतातील पहिली कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत जी हलवता येणे शक्य होते. त्यावर १९९१/९२ साली शिखर संस्थेतर्फे, सचिवालय जिमखाना मुंबई येथे प्रात्यक्षिक, संपन्न झाले. याची नुसती संकल्पनाच नाही, तर ती भिंत पूर्ण उभारणीत माझे शारीरिक योगदान होते. प्रात्यक्षिकात सहभागी होउ शकलो नाही. परंतु माझ्याकडे प्रशिक्षण केलेल्या मुलाने प्रात्यक्षिक देउन समारंभ संपन्न केला.

भारतातील स्पोर्ट क्लाईंबींगची हीच सुरुवात होती. याच सुमारास ऋषिकेश यादव याच्या विनंतीवरून अखिल महारष्ट्र गिर्यारोहण महासंघासाठी, भारतातील पहिली प्रस्तरारोहण स्पर्धा आयोजित केली. ६०/७० इच्छुक आपले प्राविण्य सिध्द करण्यास सरसावले. कान्हेरी गुंफेजवळचा प्रस्तरसमुह अशा उद्देशाने निवडला की, तेथे प्रस्तर प्रकारांची विविधता आढळते. पहिल्या फेरीत खडकांवर / बोल्डरवर चाचणी घेतली व ९ निवडक प्रस्तरारोहक उप उपांत्य फेरी व अंतिम फेरी साठी निवडले. या पुढील फेरीसाठी चिमणी व क्रॅकचा क्लाईंबीग भाग निश्चित केला. अशा रीतीने एकुण तीन फेऱ्यांत ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेची संपूर्ण आखणी करून त्यातील पंच म्हणून जबाबदारीही मी पार पाडली. अशा रीतीने देशातील प्रथम प्रस्तरारोहण स्पर्धा आयोजनाचा व निवड प्रकियेचा मानही मिळाला.

यानंतरचा मोठा पडावं सांगायचा तर १९९७ च्या एव्हरेस्ट मोहिमेचा संकल्प,  जो पूर्ण झाला १९९८ साली. जेव्हा ऋषिकेषच्या नेत्तृत्वात सुरेंद्र चव्हाण हा, एव्हरेस्ट समिट करणारा प्रथम भारतीय नागरिक ठरला. माझं या मोहिमेत तसे मोठे योगदान होते. या मोहिमेच्या हरएक अंगांची आखणी मी प्रत्यक्ष चढाईतील नेता या नात्याने केली होती. मोहिमेच्या यशासाठी सहभागी सदस्यांची मानसिकता सुदृढ करावी लागते. म्हणून मानसीक कणखरपणा व विजीगीषु वृत्तीसाठी स्व. भीष्मराज बाम सर, सांघिक भावना बळकट करण्यासाठी स्व. गणपती दाते सर, शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी डॅा. नितीन पाटणकर, व्यायाम प्रकार व नियमित सरावासाठी विनायक गोडबोले, तर मी स्वतः तांत्रिक कौशल्य व साधनांची निवड करावयाचे असे नियोजन केले होते. परंतु अंदाजा प्रमाणे रक्कम उभी करण्यात कमी पडल्याने मी व डॅा. चितळेने १९९७ च्या या नियोजनातून अंग काढून घेतले.

मग मी डॅा. चितळे बरोबर एकत्रित निर्णय घेतला की, हीच वेळ आहे. प्रत्यक्ष चढाईतून निव्रृत्ती घेऊन एक व्यवसाय उभारावा. हिल्स ॲन्ड ट्रेल्सच्या रुपात तो निर्माण केला. आतापर्यंत आपण ज्यात रमलो, त्या डोंगरावर भ्रमण करण्याचा आनंद इतरांनाही बरोबर घेऊन द्विगुणित करावा. तसेच साहस हे प्रभावी माध्यम वापरून कार्यकारी व्यवस्थापनातील कामगिरी व्रृद्घींगत करावी, असे बहुउद्देशीय उद्दीष्ट समोर ठेवून व्यवसायाला सुरुवात केली. तसेच प्रस्तरारोहणाचे प्रशिक्षण देणे सुरूच ठेवले.

अनेक नामवंत कार्पोरेट क्लायंट मिळत गेले. हजारो लोकांना हिमालयातील दुर्गम स्थानांचे दर्शन घडविले. या क्षेत्रातील योगदान व प्राविण्यामुळे लोकांनाही विश्वास वाटला व व्यावसायिक यश मिळाले. याच सुमारास मुंबई युनिव्हर्सिटीच्या क्रीडा विभागाकडून विनंती केली गेली की, त्यांना हायकींग क्लबचे पुनरुत्थान करायला मार्गदर्शन व मदत करावी. तेव्हा रत्नागिरी ते मुंबई सर्व कॅालेज त्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे, मोठा पसारा व मोठेच आव्हान होते. काका उर्फ विद्याधर जोशीने उत्साह दाखवला आणि हे शिवधनुष्य पेलले.

मुंबई युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी १९९८ ते २००८ पर्यंत विविध उपक्रम आयोजित करुन दिले. अनेक प्रस्तरारोहण शिबीरे, हाईक्स, दोन-चार दिवसांचे ट्रेक, एखादा हिमालयन ट्रेक, सायकल मोहिम, दरवर्षी रायगड चढाई स्पर्धा, इत्यादी उपक्रम सातत्याने संपन्न केले. दोन अनोखे ट्रेक नमूद करावयाचे तर स्व. डॅा. रानडे, रत्नागिरी कॅालेज यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेले मुचकुंदी व काजळी या नद्यांच्या उगमापासून मुखापर्यंत केलेले पायी पदभ्रमण.

या संधीमुळे अनेक कॅालेज तरुण संपर्कात आले. आणि मग त्यांना प्रस्तरारोहण सरावातुन उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्यासाठी प्रस्तरारोहण क्षेत्रातील ६ महीन्यांचा  प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करून, तो संमत करण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीकडे सुपुर्द केला. पण २००८ पासुन ते प्रकरण तसेच बासनात पडून राहिले आहे.


२००० साली स्व. अरुण सामंत यांच्या स्मरणार्थ, काही साजेसे स्मृतीस्थळ व्हावे. यासाठी त्यांचे बंधू गिरीश सामंत यांनी भेट घेतली. कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत उभी करण्याची माझी सुचना त्यांनी उचलून धरली. माझ्या संपूर्ण संकल्पनेप्रमाणे या प्रस्तर भिंतीचे सर्व फिचर्स, मुव्हज व होल्ड त्यात निर्माण केले. जसे की glacis, slab, wall, overhang, chimney, crack, gully, v chimney, corner, groove, pinch hold, mantle shelf etc. भिंत फेरोसीमेंटमधे बनवली. अनुभवी अथवा नवीन सदस्यांना त्यावर सराव करता यावा, ही भुमिका घेतली. भिंत आंतर राष्ट्रीय दर्जाची करण्याचे ठरविले. यावर चोक, SLCD इ. फीक्स करावयाचा सरावही शहरात करता यावा असे धोरण ठरवुन आरेखन नक्की केले. त्यावर लावायचे होल्ड्सही मी स्वतः  बनविले. संकल्पने पासूनची सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडली. माझ्या माहितीप्रमाणे अशा संकल्पनेची ही जगातील एकमेव भिंत असावी. त्यामुळे पुर्णतया भारतीय तंत्रज्ञान व बनावट असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा.

इ. स. २००० मधे वेलींगकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट या प्रख्यात संस्थेच्या डायरेक्टर व प्रोफेसरांचे एक शिबीर आयोजित केलं. त्यांना त्या अनुभवातून लक्षणीय लाभ झाला. पुढील ३ वर्षे त्यांच्याकडून त्यांच्या मॅनेजमेंट स्टुडंट्स साठी शिबीरं मिळाली. २००३ साली मला वेलिंगकर इन्स्टीट्यूट मधून प्राध्यापक पद देऊ केले आणि मीही ते लगेचच स्वीकारले. वेलींगकर इन्स्टीट्यूट मधे सर्व स्टुडंट्स माझ्या संपर्कात येतात. तसेच प्राध्यापकांसाठी मला वर्षात एक शिबीर आयोजित करावयाचे असते. आमच्या कार्पोरेट क्लायंट साठी सुध्दा मला शिबीर आयोजित करावयाचे असते. परंतु या सर्वांपेक्षा एक अनोखे आव्हान मी तेथे पेलले.

आमच्या DLP ( Distance Learning Program ) स्टुडंट्स साठी, मी एक १०० मार्कांचा  एक्स्पीरीएनशीअल लर्निंग,’ या नावाने वेगळा अभ्यासक्रम विकसित केला. स्वतंत्र अध्यापनशास्त्र निर्माण केले. तसेच स्वतंत्र मुल्यांकन पध्दत विकसित केली. माझ्या माहितीप्रमाणे भारतात आउटबाउंड ॲक्टिव्हिटीजचा अशा रीतीने वापर करुन मॅनेजमेंट शिक्षण देणारी वेलिंगकर ही एकमेव संस्था असावी.

आपल्या सर्वांना जाणून आनंद होईल, असा अजुन एक नावीन्यपूर्ण उपक्रम माझ्या पुढाकाराने वेलिंगकर मधे गेली ८ वर्षे राबविण्यात येत आहे व तो म्हणजे ३/४ दिवसांचे सह्याद्री व १० दिवस हिमालयातील शिबीर आमच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते व दोन्ही शिबिरांना भरभरून प्रतिसाद मिळतो. वेलींगकर ईन्स्टीट्यूटमधे आमचे ग्रुप डायरेक्टर प्रा. डॅा. उदय साळुंखे यांनी माझ्यापर ठेवलेला विश्वास, दिलेले स्वातंत्र्य, प्रोत्साहन व त्यांची पुरोगामी दृष्टी, यामुळेच हे योगदान शक्य झाले. डोंगरातील अडीअडचणी, कठीण मार्ग, लहरी निसर्ग व एकुणच अनपेक्षितता यांचा खुबीने वापर, व्यवस्थापन विकास, व्यक्तिमत्व विकास, प्रसंगावधान, सांघिक भावना व अशा अनेक गोष्टींसाठी करण्यात येतो. आम्ही आमच्या शिबिराचे नाव लीडरशीप डेव्हलपमेंटअसेच ठेवतो. आणि अशा उपक्रमांतुन स्वतंत्र भारताचे जबाबदार, प्रॅाडक्टीव्ह व कॅांन्ट्रीब्युटींग नागरिक घडविणे हे आमचे उद्दिष्ट असते. देशात सर्वत्र तसेच परदेशांत बॅंकॅाक, पटायला, मलेशिया, सिंगापूर, कुवालालंपुर, गॅबॅान, स्वीडन, अमेरिका येथे शिबीरे आयोजित करुन, आउटबाउंड ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून ॲक्शन लर्निंगचा प्रसार केला आहे.

२०१६ साली नेचर ट्रेल्स संस्थेकडून विचारणा करण्यात आली की, त्यांच्या चार जागा आहेत. जेथे प्रस्तरारोहण संबंधित उपक्रमांची मांडणी आहे. त्या सर्व जागांचे सेफ्टी ऑडीट करणे आवश्यक आहे. इथे माझ्या प्रस्तरारोहण कौशल्याचा, तसेच व्यवस्थापनातील ज्ञानाचाही कस लागणार होता. आमोद खोपकर यांनी सुचविल्या प्रमाणे, मी प्रथम ISO 21101:2014 या स्टॅंडर्डची प्रत आयात करून घेतली. व त्या स्टॅंडर्डच्या अनुषंगाने चारही जागांचे ऑडीट करुन, आवश्यक तो अहवाल सादर केला. तसेच अनेक सुधारणाही सुचविल्या. अशा तऱ्हेने महाराष्ट्रात तरी एखाद्या ॲडव्हेंचर साईट्सचे ISO 21101 अनुसरुन प्रोफेशनल ऑडीट प्रथमच झाले होते. आवरते घेताना एक दासबोधातील श्लोक उद्धृत करतो. प्रख्यात वकील व पर्वतारोही श्री. श्रीकांत ओक यांच्या कार्यालयामधे हा प्रदर्शित आहे.
  मी कर्ता ऐसे म्हणसी ।
  तेणे तूं कष्टी होती ।।
  राम कर्ता म्हणता पावसी ।
  येश किर्ती प्रताप ।।
       * * *