Monday, September 26, 2022

हिरा उर्भ वीरेंद्र पंडीत

  वयाच्या २४ व्या वर्षी, म्हणजे १९७२ साली पदभ्रमणाला सुरुवात केली. १९७२ साली पावसाळ्यात कॉलेजच्या मित्रांबरोबर माथेरानला गेलो होतो. तेंव्हा वन ट्री हिलच्या पायथ्याच्या वरोसे गावातले, प्रसिद्ध शिकारी श्री. अर्जुन शिंदे यांच्याबरोबर तेथील परिसरात भटकंती केली, ती मनाला भावली. हीच पहिल्या भटकंतीची सुरुवात होय.

  मग १९७५ साली हिमालय पर्वतारोहण संस्थेतून प्राथमिक पर्वतारोहणाचे प्रशिक्षण व १९७६ साली तेथूनच प्रगत पर्वतारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यावेळी या संस्थेचे संचालक तेनसिंग नोर्गे होते व त्यावेळी दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारे, पहिले गिर्यारोहक नावांग गोम्बू आमच्या गटाचे नेते होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले.

  १९७७ साली तेलबैलाच्या पहिल्या भिंतीची (गुहा असलेल्या बाजूने) प्रथम चढाई केली. हीच लिंगाणा सुळका चढाई मोहिमेची मुहुर्तमेढ होती. त्यानंतर वांगणी जवळील चंदेरी, म्हसमाळ येथील डोंगरवजा सुळक्यांवर चढाया केल्या.

  १९७८ साली २६ डिसेंबरला लिंगाणा सुळक्याची प्रथम चढाई केली आणि हीच महाराष्ट्रातील सुळके चढाईची खरी सुरुवात होती. या साहसासाठी शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात सत्कार तर केलाच; शिवाय पुलंनी पत्र लिहून खास अभिनंदन केलं होतं.

  १९८२ साली केलेली दौंड्या उर्फ भिल्लीणीचा पूड उर्फ नांगरदार ही घाटवाट देखील कस पाहणारी होती.

  १९८३ साली माहुली किल्ले समुहातील नवरा उर्फ भटोबा सुळक्याची केलेली चढाई, ही आजवरची सर्वात आव्हानात्मक चढाई होती.

  हिमालयातील मोहीमा १९७७ पासून सुरु झाल्या. पहिली मोहीम श्रीकैलास वर केल्यावर, १९७८ साली जोगीन ३, १९७९ साली मात्री, १९८१ साली कोटेश्र्वर, १९८२ साली भागिरथी २, १९८३ साली कोटेश्र्वर हिवाळी मोहीम, १९८४ साली योगेश्वर, सेंट्रल पिक, स्टोक कांग्री अशा सतत चालू असलेल्या हिमालयातील मोहीमा वयाच्या ७४ व्या वर्षीही चालू आहेत .

  १९८६ साली पुण्यातील गिर्यारोहक श्री. नंदू पागे यांचे सतोपंथ शिखरच्या पायथ्याशी हिमकडा कोसळून निधन झाले होते. तो गाडलेला तंबू आणि शव शोधण्यात मोलाची कामगिरी बजावता आली.

  १९९२ साली पत्नी व दोन मुलं यांना सोबत घेऊन मुंबई - लेह - खारदुंगला पास - मुंबई अशी मोटारसायकल मोहीम पार पाडली. यानंतर दोनदा पुन्हा लेह - लडाख  मोहीमा यशस्वी केल्या. त्यानंतर तीन वेळा स्कॉर्पिओने सहकुटुंब लेह - लडाख मोहिमा पूर्ण केल्या .

  महाराष्ट्रातील १५-१६ गुहा शोधून, भुयार शोधन या क्षेत्राची महाराष्ट्राला प्रथमच ओळख करुन दिली. त्यातील अंबोलीच्या हिरण्यकेशी मंदिरापाठील भुयाराचा शोध घेत, हिरण्यकेशी नदीच्या उगमाचा प्रथमच शोध घेतला. याशिवाय अनेक गडांवरील, सागरी किल्ले आणि भुईकोटांमधील विस्मृतीत गेलेल्या गुहा उजेडात आणल्या.

  याशिवाय नव्या पिढीतील असंख्य तरुणांना गिर्यारोहण क्षेत्रात पुढे आणण्याचे व्रत, वयाच्या ७५ व्या वर्षातही चालू ठेवले आहे.








फोटो - साभार फेसबुक

Thursday, September 22, 2022

सतीश दत्तात्रय गायकवाड़ उर्फ डॅडी

मनोगत..

गेली पंचेचाळीस वर्ष मी गिर्यारोहण क्षेत्रात आहे. विशाळगडा पासून माझी गिर्यारोहणाला सुरूवात झाली. कळकराय या सुळक्यावर मी प्रथम आरोहण केले. अजूनहि मी गिर्यारोहण क्षेत्राशी निगडीत आहे. माझे बरेचसे गिर्यारोहण सहयाद्रित व हिमालयात झाले आहे. बेसिक, अॅडव्हान्स, सर्च अॅण्ड रेस्कू, Method and Instruction कोर्स झाले आहेत. माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली, या संस्थेतर्फे अनेक सामाजिक कार्यक्रमात भाग घेतला. यात किल्लारी व भूज भूकंप मदत कार्य, रक्तदान शिबिरं, आदिवासी भागात मदत, गिर्यारोहण शिबिरे यात माझा सहभाग होता.

युथ हॉस्टेलच्या वतीने आयोजित ट्रांस सह्याद्री मोहिम (सलग सह्याद्री मोहिम)१९८३ ही माझी सह्याद्रीतील पहिली मोहिम. त्रंबकेश्वर ते गोवा १२०० किमी. ३५ दिवस, अष्टविनायक, डोंबिवली - बंगलोर आदी सायकल मोहिमा मी केल्या.

त्यानंतर हिमालयातील मरखा व्हॅली, कांग यस्ते, हनुमान तिब्बा, लडाखी, शितिधार, व्हाईट सेल, केदार डोम, श्रीकैलाश, जोगिन, बिधान पर्वत, कामेट अबिगामिन, स्वर्गरोहिणी, स्टॅाक कांगरी, सतोपंत ताल पदभ्रमण, व्हॅली ऑफ फ्लॉवर, दोडिताल, तपोवन आदी ठिकाणी पदभ्रमण आणि आरोहण केले आहे. यात कामेट, अबीगामिन ह्या हिमालयीन मोहिमा मला कठिण वाटल्या.

लिंगाणाहडबीची शेंडी हे सुळके माझे आवडते आहेत.

हिमालयातील साहसाचा थरार, ‘महाराजांनी बांधलेल्या गड कोटां बद्दल आस्था, यामुळे मी गिर्यारोहणाकडे वळलो. वृक्षारोपणाने जागतीक तपमान वाढीवर आपण नियंत्रण मिळवू शकू, असे मला वाटते.

प्रत्येक क्षेत्राचे आता व्यावसायिकरण झाले आहे. या क्षेत्राचा योग्य वापर केला पाहिजे. साहसी पर्यटनाला वाव आहे. आयोजकांनी कठिण प्रसंगात न घाबरता मार्ग काढला पाहिजे.

साहसी उपक्रम आखताना अनुभव फार महत्वाचा आहे. त्याच बरोबर तांत्रिक कुशलता, शारिरीक तंदूरूस्ती तितकीच महत्वाची असते.

‘’ध्येय असेल तर कुठेही यशस्वी होता येते’’, हा मंत्र मला गिर्यारोहणातून मिळाला. कोणतीही मोहिम राबवताना गिर्यारोहकाचा शारिरिक फिटनेस महत्वाचा असतो, त्याच बरोबर सांघीक काम आणि चांगल्या गिर्यारोहकांची फळी उभी केली पहिजे.

निसर्ग ट्री प्लैटेशनमाउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली या संस्थाशी मी संलग्न आहे.

रक्तदान शिबिरासाठी सायन हॅास्पिटल कडून तिसरे पारितोषिक गडकोटाचे मानकरी या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले आहे.

सुरेंद्र चव्हाण हा माझा आवडता गिर्यारोहक असून राजगड़ व गणपतिपुळे ही सुंदर स्थळे मला फारच भावतात.

तसेच मी सर्वत्र सहली आयोजित करतो.