Tuesday, June 22, 2021

 संतोष चंद्रशेखर कल्याणपुर

संस्था प्रथम, संस्थेच्या वर कोणीही व्यक्ती असू शकत नाही, असे ठाम मत असणारे, बापू या आदरणीय नावाने ओळखले जाणारे, गिर्यारोहणातील शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे, संतोष कल्याणपुर. मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबने गिर्यारोहणातल्या कामगिरी बद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तर  गिरीमित्र संमेलन २०१० मध्ये गिरिमित्र गिरिभ्रमण सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या पिनॅकल क्लबलाही संस्थात्मक पुरस्कार मिळालेला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये छत्तिस वर्षे नऊ महिने नोकरी करून वयाच्या ६०व्या वर्षी, १ जून २०२० रोजी ते निवृत्त झाले. आज संस्था ३३ व्या वर्षाकडे पदार्पण करीत आहे. आणि पूर्वीसारखे संस्थेचे कार्यक्रम नवोदित सभासद राबवत आहेत. याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

त्यांच्या कारकिर्तीचा आढावा, त्यांच्याच शब्दात...

१९७५ साली किर्ती महाविद्यालयामध्ये मी बारावी साठी प्रवेश घेतला. त्याच वर्षी एनसीसी (NCC) मध्ये नाव नोंदवलं. एनसीसी तर्फे पावसाळी ट्रेकचे आयोजन करण्यात आलं होतं. आमच्या वरिष्ठांनी मला सांगितले की, ट्रेकला येण्यासाठी हंटर शूज आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हंटर शूज नसेल त्यांनी ट्रेकला येऊ नये. आता हंटर शूज काय चीज आहे, हेच मला माहित नव्हतं. बाटाच्या दुकानावर चौकशी केली असता त्याची किंमत 18 रुपये होती. माझे वडील मिल कामगार. अत्यंत गरीबी आणि हलाकी मध्ये आम्ही जीवन जगत होतो. हंटर शूज घेणे माझ्यासाठी अशक्यप्राय गोष्ट होती. त्यावर्षी मी ट्रेकला जाऊ शकलो नाही. ट्रेक वरून आलेल्या माझ्या सहकाऱ्यांनी ट्रेकचे वर्णन अशा पद्धतीने केले की, मी भारावूनच गेलो आणि ठरवलं की पुढल्या वर्षी ट्रेकला जायचंच. १९७६ ला लोहगड विसापूर ट्रेकचे आयोजन करण्यात आलं होतं. मी हंटर शूजची व्यवस्था करून त्या ट्रेकला गेलो. एनसीसी व्यतिरिक्त कॉलेजमध्ये असलेल्या हायकिंग क्लबच्या वतीने देखील ट्रेकचे आयोजन करण्यात येत असे. मग त्या ट्रेकला देखील मी जाऊ लागलो.

 कॉलेजच्या एनसीसी डे ला काही लोक रॅपलिंगचे प्रात्यक्षिक देत असत. मला काहीच कळेना भिंतीवरून दोरीच्या साह्याने खाली कसे पटापट उतरतात. त्यातच कॉलेजच्या मासिका मध्ये बेसिक कोर्स केलेल्या एकाचा बर्फावर आईस अँक्स रोऊन उभा असलेला फोटो पाहिला. मी खूप प्रभावित झालो. त्याच्याकडे रॅपलिंग आणि बेसिक कोर्स बद्दल चौकशी केली. तो खूप सिनिअर होता. त्यांनी मला विचारले की, ‘तुझे वजन किती?’ मी म्हणालो, ४१ किलो. तो जोरात हसला आणि म्हणाला, फु मारली, तर तू उडून जाशील. याबद्दल तु विचारही करू नकोस. हे तुझं काम नाही. मग मी मनात ठाम ठरवूनच टाकलं. बेसिक कोर्स करायचाच आणि याच कॉलेजमधल्या एनसीसीच्या प्रत्येक मुला-मुलींना याच भिंतीवरून रॅपलिंग करायला लावायचं. तेही अगदी मोफत.

 १९८५ साली नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग, उत्तरकाशी येथून बेसिक कोर्स पूर्ण केला. अधून मधून ट्रेकिंग चालूच होतं. पण त्याला योग्य दिशा व मार्गदर्शन नव्हते. १९८६ साली माझा मित्र विनायक वेंगुर्लेकर यांनी श्री अनिल चव्हाण याची ओळख करून दिली. मग मी अनिल सोबत हॉलिडे हायकर्स या संस्थे बरोबर अनेक ट्रेक्स आणि छोटे-मोठे सुळके (लिंगाणा, भवानी कडा, महालक्ष्मी सुळका) सर केले. अनिल चव्हाण यांच्यामुळे गिर्यारोहण या क्षेत्राकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलून गेला. शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच काही नियमांचे पालन करून आपण गिर्यारोहणाचा आनंद घेऊ शकतो, तसेच इतरांनाही देऊ शकतो, याची जाणीव झाली. हॉलिडे हायकर्स बरोबर ट्रेक करता करता, आमचा आठ दहा जणांचा वेगळा गट तयार झाला. आणि आम्ही सातत्याने सह्याद्रीमध्ये भटकंती करू लागलो. सह्याद्रीमध्ये माणिकगडची लिंगी, हडबीची शेंडी, लिंगाणा, नागनाथ, डांग्या, कर्नाळा, सीताबाईचा पाळणा, या सुळक्यांवर आम्ही आरोहण केले. काहीतरी वेगळे करण्याचा विचार आम्हाला सर्वांना त्यानंतर सतावू लागला. त्यातच श्री. अनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही १९८६ सालात टकमक कड्यावरून रॅपलिंग करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. संपूर्ण टकमक कडा रॅपलिंग करणे, तेही तुटपुंज्या साधनसामुग्रीसह (कारण दोन हार्नेस बाकीचे टेप स्लिंग) याचे आजही आश्चर्य वाटते. टकमक कडा यशस्वी रॅपलिंग नंतर आम्ही घेतलेला अनुभव आणि आनंद इतर सामान्य लोकांनाही व्हावा, म्हणून लगेचच १९८७ पासून जनसामान्यांसाठी टकमक रॅपलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून, तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भरघोस प्रतिसाद मिळाला. किल्ले रायगडावरील टकमक टोक येथून रॅपलिंग करण्याचा हा थरारक अनुभव जनसामान्यांना सातत्याने पंचवीस वर्ष देण्यात आला. आपली मुले गिर्यारोहणासाठी कोणाबरोबर जातात? ते लोक कसे आहेत? याचा पालकांना नेहमीच प्रश्न पडलेला असतो. यासाठी टकमक रॅपलिंगच्या वेळी सहभागींच्या पालकांनाही सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. यामुळे सर्व पालक ही खूश झाले. मग काही पालकांनीही रॅपलिंगचा आनंद अनुभवला. टकमक रॅपलिंग प्रशस्तीपत्रक वितरण समारंभाच्या वेळी पालकांचाही सत्कार करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक पालकांना आपल्या मुलांवर तसेच संस्थेवर असलेला विश्वास द्विगुणित झाला.

१९८६ साली मी किर्ती महाविद्यालय येथे एनसीसीच्या सरांना भेटून एनसीसीच्या मुला-मुलींसाठी मोफत रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, जुमारिंग याचे प्रशिक्षण देण्याचे आणि एनसीसी डे ला गिर्यारोह प्रात्यक्षिके करण्याचा प्रस्ताव मांडला. तो त्यांनी लगेच स्वीकारला. तसेच वर्षातून एकदा सह्याद्रीमध्ये कॅडेट साठी ट्रेकिंगचे आयोजन करण्याचे मान्य झाले. त्याप्रमाणे किर्ती महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटना बारा वर्ष मोफत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच त्यांच्यासाठी दरवर्षी सह्याद्रीमध्ये ट्रेकचे आयोजनही करण्यात आले.

श्री. अनिल चव्हाण यांच्यामुळे मला प्रख्यात गिर्यारोहक श्री. प्रदीप केळकर कै. मिलिंद फाटक यांच्याबरोबर मदन गडाजवळील M2 सुळका चढाई मोहिमेत भाग घेण्याची संधी मिळाली. १९९० साली संस्थेतर्फे भैरवगडची भिंत, ढाक भैरीचा सुळका (सेंटर ROUTE) या प्रस्तर चढाई मोहिमेत मी भाग घेतला.

सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करता करता आम्हाला हिमालयाची ओढ लागली. तांत्रिक कारणामुळे 'हॉलिडे हायकर्स' या संस्थेतून हिमालयात जायची परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे १९८८ साली आम्ही समविचारी लोकांनी पिनॅकल क्लबची स्थापना केली. त्याच वर्षी हिमालयातील मोन (MON 16090') आणि नोरबु (Norbu 17600') या शिखरावर मोहीमा आखण्यात आल्या आणि त्या यशस्वीही झाल्या. १९८९ साली आम्ही कानामो (19800') शिखरावर मोहीम आखली. तीही यशस्वी झाली.

१९९० साली संस्थेतर्फे आयोजित, अजिंक्य मात्री शिखरावर (22050') तसेच १९९१ साली अजिंक्य पनवाली द्वार (21987') आणि बौलजुरी (19543')या यशस्वी मोहिमेत माझा सहभाग होता.

यानंतर मी हिमालयात जायचं नाही. संस्थेचा विस्तारामध्ये तसेच जनसामान्यामध्ये गिर्यारोहणाचा प्रसार करण्यात जास्त लक्ष देऊन, तरुण लोकांना संधी देण्याचे मनोमनी निश्चित केले. त्याप्रमाणे १९९२ मध्ये कामेट-अभीगामिन या मोहिमेला न जाता संपूर्ण मोहिमेची आखणी, तयारी, येणारी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी मी स्वतःला झोकून दिले. सदर मोहिमेत अनेक नवोदितांना संधी मिळाली आणि संस्थेचे दोन गिर्यारोहक अभिगामिन शिखर माथा गाठण्यात यशस्वी ठरले.

 गिर्यारोहणाचा प्रसार व्हावा म्हणून संस्थेतर्फे अनेक शाळा, महाविद्यालय, सोसायटी यांना मोफत रॅपलिंग आणि रिव्हर क्रॉसिंगचे प्रशिक्षण देऊन त्याचा थरार अनुभवण्याचा आनंद देण्यात आला. किर्ती कॉलेज(१२ वर्ष), रुईया कॉलेज ( वर्ष), खालसा कॉलेज( वर्ष), आंबेडकर कॉलेज, सेंट झेवियर्स टेक्निकल कॉलेज, सिडनहॅम कॉलेज, गोन्सलविस कॉलेज, शारदाश्रम विद्यालय, रत्नम कॉलेज, विद्याविकास हायस्कुल, होली क्रॉस हायस्कूल, अग्निमक दल, मरोळ अश्या वेगवेगळ्या शाळा, कॉलेज आणि संस्था यांना प्रशिक्षण देऊन गिर्यारोहणाचा, प्रस्तरारोहणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 लहान वयातच साहसाची व गिर्यारोहणाची आवड निर्माण होण्याकरिता, साहस शिबिराचे सातत्याने आयोजन संस्थेतर्फे केले आहे. संस्थेतर्फे पावसाळ्यात भिवपुरी येथे वॉटरफॉल रॅपलिंगचे ही आयोजन केले होते. त्याचा लाभ अनेक लोकांनी घेतला आहे.

 कृत्रीम भिंत चढाई किंवा स्पोर्ट्स क्लाईबिं हा खेळ रुजवण्यात पिनॅकल क्लबचा मोठा वाटा आहे. स्पोर्ट्स क्लाईबिग साठी सर्वप्रथम छोट्या आकाराची कृत्रिम प्रस्तर भिंत एलफिस्टनला एका इमारतीच्या छोट्याशा खोलीमध्ये संस्थेतर्फे उभारली गेली.

संस्थेतर्फे प्रसिद्ध गिर्यारोहक कै. अरुण सामंत आणि कै. मिलिंद पाठक यांच्या स्मरणार्थ सन २००० पासून गिर्यारोहण शिष्यवृत्ती देण्यात येते. ज्या गिर्यारोहकांनी त्या त्या वर्षी सरकारमान्य गिर्यारोहण संस्थेतून बेसिक माउंटेनीरिंग कोर्स पूर्ण केले आहेत त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयाच्या दोन शिष्यवृत्ती देण्यात येतात.

 गिर्यारोहण करताना निसर्गाची मुक्तहस्ते चाललेली लयलूट छायाचित्रित करण्याची गरज ओळखून संस्थेतर्फे २००३ साली गिर्यारोहणातील छायाचित्रण या विषयावर एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. डोंगरदऱ्या भटकताना फोटो कसे काढावे? कॅमेराची काळजी कशी घ्यावी? याचे प्रशिक्षण नामवंत छायाचित्रकारांनी या शिबिरात दिले होते. गिर्यारोहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

 सन २००३ साली संस्थेने, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने, अखिल भारतीय स्तरावर छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत निसर्ग व गिर्यारोहण या विषयावर छायाचित्रे मागविली होती. त्याला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याती पुरस्कार विजेत्या तसेच इतर निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कला दालनात आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ सुमारे ३५०० गिरिप्रेमी व निसर्गप्रेमींना घेतला.

महाराष्ट्र सेवा संघा बरोबर पिनॅकल क्लबने दुसऱ्या गिरीमित्र संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन केले. मुंबई पोलीसांतील अतिरेकी विरोधी शीघ्र कृती दल (Quick Response Team) यांना देखील तीन वर्ष मोफत प्रस्तरारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

सामाजिक जबाबदारी ओळखून घारापूरी पासून सुरूवात करत, दुर्गम भागातील आदिवासींसाठी संस्थेने आज पर्यंत नऊ मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिरांचे आयोजन केले.

 महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी आणि एव्हर्ट सोसायटी यांच्या सहकार्याने टकमक रॅपलिंग, साहस शिबीर, आरोग्य शिबिर राबवताना, एच आय व्ही/ एड्स विरोधी प्रचाराचे बॅनर, भित्तीपत्रके तसेच माहिती पुस्तिकेतून सातत्याने तरुण-तरुणी, जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

 सांदण व्हॅलीला लागून असणाऱ्या साम्र गावातील शाळेला तसेच विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तूंचे वाटप करून क्लबने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. जुलै २०१२ रोजी गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेने ही सर्व मदत शाळेला सुपूर्द केली.

किल्लारी भूकंप ग्रस्तांना मदत, २६ जुलै २००५ ला मुंबईतील पूरग्रस्तांना मदत, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील जखमीना मदत, कारगिल युद्धातील शहीद कुटुंबांला मदत, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोफत शिबिर, केरळ येथील अनाथ मुलांसाठी मोफत साहस शिबिर, आटगाव येथील देवीच्या मंदिरात कारसेवा (मातीत विखुरलेल्या विरगाळाची, स्तंभांची पुनर्रचना करणे व तेथील ग्रामस्थांना त्याचे ऐतिहासिक महत्व सांगून हा अमोल ठेवा कसा संरक्षित ठेवता येईल या दृष्टीने ग्रामस्थांच्या मदतीने इतिहासातील या अमोल ठेव्याची जतन करण्याचा अनोखा कार्यक्रम केला), हरियाली संस्थेबरोबर वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबिर, तसेच गरजूंना रक्तदान असे अनेक कार्यक्रम सातत्याने संस्थेतर्फे राबविण्यात आले.

 नवीन सभासदांचा आग्रहाखातर, तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१० साली हिमालयातील थारकोट (20010') आणि भानोटी शिखर (18520') मोहीम तसेच २०१६ साली श्रीखंड महादेव ट्रेकमध्ये सहभागी झालो.

 मी १९८३ मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नोकरीला लागलो. तेथेही पदभ्रमणाचे अनेक उपक्रम राबविले. माझ्या गिर्यारोहणाचा वाटचालीमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे, अधिकाऱ्यांचे तसेच माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच मी एवढी मजल मारू शकलो. त्यासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहीन.

 हा सगळा उपक्रम राबवण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली. काही नावे आवर्जून घेण्यासारखी आहे. अजूनही गुरुस्थानी असलेला श्री अनिल चव्हाण, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. विनायक वेंगुर्लेकर, श्री सचिंद्र आयरे, सौ. तेजस्वीनी व श्री अतुल कुलकर्णी, श्री विनोद पटेल, श्री विवेक शिंदे, श्री. विजय भाई शहा, श्री प्रशांत ठोसर, श्री. यतीन कोरे, श्री विनोद नाईक, श्री राजेश वरळीकर, श्री प्रफुल्ल भोसले, श्री विजय वाघधरे आणि आता संस्था सांभाळणारे श्री. शशिकांत वैद्य, श्री. महेश कांबळे असे अनेक नवोदित गिर्यारोहक यांना विसरून चालणार नाही.

 माझ्यावर व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारे एव्हरेस्टवीर श्री सुरेंद्र चव्हाण, श्री हरीश भाई कपाडिया, श्री प्रजापती बोधणे, श्री ऋषीकेश यादव, श्री उमेश झिरपे यांच्यासाठी माझ्या मनात नेहमीच आदराचे स्थान राहिले आहे.