Thursday, November 17, 2022

उदय कोळवणकर


१९७५ साली १७ वर्षांचा असताना, दादर मधील रुईया व रुपारेल कॉलेजेस मध्ये पावसाळी भ्रमंतीचा उपक्रम चालू होता. सतिश जाधव याच्यामुळे त्यांच्या संपर्कात आलो व सह्याद्रितील भ्रमंतीला माझी सुरूवात झाली. नंतर मालाडच्या 'नेचर लवर्स' संस्थेबरोबर पदभ्रमण, वन्यजीव अवलोकन मोहिमा सुरू झाल्या. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमधून फिरता फिरता सूळके साद घालू लागले.

क्लायंबर क्लबने आयोजित केलेली प्रस्तरोहणाची प्रशिक्षणे घेतली.

त्यावेळी श्री हिरा पंडीत यांनी रायगडाच्या टकमक कड्यावर चढाई केली होती. त्यातून प्रेरणा घेऊन, दिलीप झुंजाररावच्या मार्गदर्शनाखाली शहापूर जवळील नवरा सुळक्यावर प्रसतरारोहण केले. १९८३ साली केलेली ही पहिली चढाई होती. नंतर नवरी’, ‘लूज बोल्डर’, अशा अनेक मोहिमा चालू असताना हिमालयाचे वेध लागले.

उत्तरकाशीच्या, नेहरू इंन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मध्ये हिमालयातील गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले.

१९८५ मध्ये प्रजापती बोधणे यांच्या नेतृत्वाखाली, ‘हॉलीडे हायकर्स या संस्थे मार्फत, माना शिखरावरील मोहिमेत भाग घेतला. त्यानंतर, गिरीविहार संस्थेमार्फत १९८७ मध्ये फाबरांग व १९८८ मध्ये कांचनजुंगा शिखरावरील मोहीमेत भाग घेतला.

फाबरांग मोहीमेत खूप छान अनुभव मिळाला. संजय बोरोले, चारूहास जोशी, अनिल कुमार यांच्याकडून खूप शिकता आले. ती मोहीम हा माझ्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे.

१९८८ साली, ‘कांचनजुंगा मोहीमेच्या तयारीत खूप शिकायला मिळाले. शिखर चढाईची संधी मिळाली. सर्वात उंच जाता आले. २७,५०० फूट उंचीपर्यंत कृत्रिम प्राणवायूशिवाय जाण्याचा नागरी गिर्यारोहकाचा विक्रम झाला. आयुष्याला वेगळे वळण मिळाले.

त्यानंतर गंगोत्री, हनुमान तिब्बा, देव तिब्बा अशा काही हिमालयीन मोहीमांचे नेतृत्व केले.

१९८८ च्या दरम्यान अतिउंचीवर लागणारी उत्कृष्ट प्रतीची साधन सामुग्री भारतात उपलब्ध नव्हती. ती परदेशातून आयात करावी लागली. बरेच पैसेही खर्चही झाले. 'यंग झिंगारो ट्रेकर्स' संस्थेने ती साधनसामुग्री व अन्नधान्य व्यवस्थित बांधून दिले. त्यामूळे संपूर्ण मोहीमेत कधीच अडचण आली नाही.

परदेशातून आयात केलेल्या या साधनांचा अमूल्य ठेवा, आम्ही अतिउंचीपासून मुंबईपर्यंत सांभाळून आणला व कांचनजुंगा माउंटेनिआरिंग फाउंडेशन मार्फत जवळ जवळ २५ वर्षे निगराणी करून सांभाळला. ही उच्च दर्जाची साधने जवळ जवळ ४०० मोहिमांना वापरता आली. या योगदानाचा अभिमान वाटतो.

उत्तरकाशी भागात झालेल्या भूकंपाच्या वेळी माननीय उषा भिडे यांच्या नेत्रुत्वाखाली प्रत्यक्ष गावागावात जाऊन मदतकार्य करता आले.

मा. शाबीरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट मोहीमेच्या सन्मानासाठी मिरवणूकीचे आयोजन केले व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या स्थापनेसाठी लोहगडावर झालेल्या सम्मेलनाच्या आयोजनात सहभाग होतो. पुढे महासंघाची घटना लिहीण्यास मदत केली.

'यंग झिंगारो' या संस्थेमुळे अंधमित्रांच्या संपर्कात आलो. सह्याद्रितील गड-किल्यांवर नेता नेता, अंधमित्रांच्या जगातील पहिल्या हिमालयीन गिर्यारोहण मोहीमेत सामील होऊन चढाईचे नेतृत्व करायला मिळाले.

मी नोकरी करत असलेल्या टाटा पॉवर कंपनी मध्येही गिर्यारोहण संबधित काही उपक्रम सुरू केले. नाट्यविभागातही सहभाग होता. त्यात राज्यपातळीवर सन्मान मिळाले.

१९९८ सालच्या पहिल्या भारतीय नागरी, यशस्वी एव्हरेस्ट मोहीमेचा उपनेता म्हणून नेता ऋषिकेश यादव याच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. 

गिर्यारोहणाच्या अनुभवाचा काहीजण व्यवसाय म्हणून वापर करू लागले आहेत. आपल्या कौशल्याचा, ज्ञानाचा, अनुभवाचा वापर अर्थाजनासाठी करणे यात काहीच गैर नाही. मलाही अशी संधी मिळाली आहे. नवोदितांच्या सुरक्षेची काळजी मात्र पुरेपूर घेतली पाहिजे. अजिबात हयगय नको. अधिक नफ्यासाठी सुरक्षा बाजूला ठेऊन चालणार नाही. गिर्यारोहणात व्यवसायाच्या खूप संधी आहेत. आमच्या कांचनजुंगा मोहीमेतील काही सदस्य, मोहीमेनंतर या व्यवसायात उतरले आहेत व यशस्वी झाले आहेत. मात्र संयम व तारतम्य हवे.

 

माझ्यासाठी व सर्व गिर्यारोहकांसाठी संयम व तारतम्य हाच तर गिर्यारोहणातून मिळालेला मंत्र आहे. एखाद्या मोहीमेची तयारी शारीरिक व मानसिक कस पहाते. अनुभव तर कामी येतोच, पण नवीन तंत्र, कल्पना यांची पण जोड लागतेच. सतत अद्यावत असावे लागते. आज तंत्र, साधन सामुग्री आधुनीक झाली आहे. पण एव्हरेस्ट सारख्या सुरवातीच्या मोहिमा, त्या काळचे तंत्रज्ञान व साधने वापरून कशा झाल्या असतील, या विचारानेच मती गुंग होते. आणि हाच विचार अडचणींवर मात करायला प्रेरित करतो.

कुठच्याही मोहीमेत शेर्पा, हमाल, स्वयंपाकी, मदतनीस ह्या सगळ्यांचे एकच कुटुंब व्हायला पाहिजे. काही मोहीमांतील चूकां मधून हे शिकलो. हे शिकणे पुढे १९९८ च्या एव्हरेस्ट मोहिमेत कामी आले.

याच मोहिमेत, प्रथम शिखर चढाई करणारा सुरेंद्र चव्हाण पाचव्या तळावर असताना हवामान बिघडले. भारतीय हवामान खात्याशी आम्ही संपर्कात होतोच. त्यांच्या कडून हवामान लवकरच निवळण्याची शक्यता आहे हे कळले. इतर अनेक देशांचे चढाईवीर घाबरून तिथूनच खाली आले. पण वैयक्तिक अनुभवानुसार, सुरेंद्रला एक दिवस तिथेच थांबण्याचा सल्ला दिला व त्यापुढील दोन दिवसात सुरेंद्र शिखरावर पोहोचला. मोहिम यशस्वी झाली. हा विजय कांचनजुंगा मोहीमेच्या अनुभवा मुळेच शक्य झाला.

निसर्गाची आवड म्हणून पायी भ्रमंती, त्यातून गडकोट अनुभवणे, पूढे प्रस्तरारोहण, दुर्गम सुळके, मोठ्या पदभ्रमण मोहिमा, हिमालयात पदभ्रमण, शिखर चढाई मोहीमा, नवोदितांना मार्गदर्शन, मुलांसाठी सर्वांगिण विकास करणारी शिबिरे, हिमालयात गिर्यारोहण मोहिमा, मृत्यू जवळून पहाणे, राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार आणि गिरीमित्र सम्मेलनात 'गिरीमित्र' पुरस्कार, हा सगळा प्रवास रोमांचकारी आणि अविस्मरणीय आहे.

मित्रमंडळी, कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. नेचर लव्हर्स, हॉलिडे हायकर्स, क्लायंबर क्लब, एक्स्पोरर्स एन्ड अँडव्हेंचर्स, गिरीविहार, के.एम.एफ., टाटा पॉवर अँडव्हेचर विंग, या सर्वांनी हे शिल्प साकार कले. मध्यंतरी काही महिने जिद्दच्या संपादनात देखील मदत करता आली.

निवृत्त होता होता नैसर्गिक शेती सुरू केली. सायकलिंगचा आनंद घेत आहे.

या प्रवासातला १९७५ सालचा पहिला ट्रेक ढाक बहिरी गुहा व १९८७ सालचे फाबरँग शिखर मोहिम अविस्मरणीय आहेत.

सर्व गिर्यारोहकांनी मिळून मिसळून पुढे जाणे व सुरक्षेची पूर्ण काळजी घेणे, हे गिर्यारोहणाच्या सुदृढ प्रगतीसाठी आवश्यक आहे. असे झाले तर, या क्षेत्रात वावरल्याचा आनंद द्विगुणीत होईल.

वयाने लवकर गिर्यारोहण सुरू केले असते तर, अजून खूप काही करता आले असते. पण असो. जे आहे, त्यातूनच पुढे जाणे हेच आपण सर्व गिर्यारोहणातून शिकतो.             * * *














































1 comment: