‘संस्था प्रथम,
संस्थेच्या वर कोणीही व्यक्ती असू शकत नाही,’ असे ठाम मत असणारे, ‘बापू’ या आदरणीय
नावाने ओळखले जाणारे, गिर्यारोहणातील शिस्तप्रिय
व्यक्तिमत्व म्हणजे, संतोष कल्याणपुर. ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबने’ गिर्यारोहणातल्या कामगिरी बद्दल त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने
सन्मानित केलेले आहे. तर गिरीमित्र संमेलन २०१० मध्ये ‘गिरिमित्र गिरिभ्रमण’ सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या ‘पिनॅकल क्लब’लाही ‘संस्थात्मक’ पुरस्कार मिळालेला आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये छत्तिस वर्षे नऊ महिने नोकरी करून वयाच्या ६०व्या वर्षी, १ जून २०२० रोजी ते निवृत्त झाले. आज संस्था ३३ व्या वर्षाकडे पदार्पण करीत आहे. आणि पूर्वीसारखेच संस्थेचे कार्यक्रम नवोदित सभासद राबवत आहेत. याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.
त्यांच्या कारकिर्तीचा आढावा, त्यांच्याच शब्दात...१९७५ साली किर्ती महाविद्यालयामध्ये मी बारावी साठी प्रवेश घेतला. त्याच वर्षी एनसीसी (NCC) मध्ये नाव नोंदवलं. एनसीसी तर्फे पावसाळी ट्रेकचे आयोजन करण्यात आलं होतं. आमच्या वरिष्ठांनी मला सांगितले की, ट्रेकला येण्यासाठी हंटर शूज आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हंटर शूज नसेल त्यांनी ट्रेकला येऊ नये. आता हंटर शूज काय चीज आहे, हेच मला माहित नव्हतं. बाटाच्या दुकानावर चौकशी केली असता त्याची किंमत 18 रुपये होती. माझे वडील मिल कामगार. अत्यंत गरीबी आणि हलाकी मध्ये आम्ही जीवन जगत होतो. हंटर शूज घेणे माझ्यासाठी अशक्यप्राय गोष्ट होती. त्यावर्षी मी ट्रेकला जाऊ शकलो नाही. ट्रेक वरून आलेल्या माझ्या सहकाऱ्यांनी ट्रेकचे वर्णन अशा पद्धतीने केले की, मी भारावूनच गेलो आणि ठरवलं की पुढल्या वर्षी ट्रेकला जायचंच. १९७६ ला लोहगड विसापूर ट्रेकचे आयोजन करण्यात आलं होतं. मी हंटर शूजची व्यवस्था करून त्या ट्रेकला गेलो. एनसीसी व्यतिरिक्त कॉलेजमध्ये असलेल्या हायकिंग क्लबच्या वतीने देखील ट्रेकचे आयोजन करण्यात येत असे. मग त्या ट्रेकला देखील मी जाऊ लागलो.
कॉलेजच्या ‘एनसीसी डे’ ला काही लोक ‘रॅपलिंगचे’ प्रात्यक्षिक देत असत. मला काहीच कळेना भिंतीवरून दोरीच्या साह्याने खाली कसे पटापट उतरतात. त्यातच कॉलेजच्या मासिका मध्ये बेसिक कोर्स केलेल्या एकाचा बर्फावर आईस अँक्स रोऊन उभा असलेला फोटो पाहिला. मी खूप प्रभावित झालो. त्याच्याकडे रॅपलिंग आणि बेसिक कोर्स बद्दल चौकशी केली. तो खूप सिनिअर होता. त्यांनी मला विचारले की, ‘तुझे वजन किती?’ मी म्हणालो, ‘४१ किलो’. तो जोरात हसला आणि म्हणाला, ‘फुक मारली, तर तू उडून जाशील. याबद्दल तु विचारही करू नकोस. हे तुझं काम नाही.’ मग मी मनात ठाम ठरवूनच टाकलं. बेसिक कोर्स करायचाच आणि याच कॉलेजमधल्या एनसीसीच्या प्रत्येक मुला-मुलींना याच भिंतीवरून रॅपलिंग करायला लावायचं. तेही अगदी मोफत.
१९८५ साली नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग, उत्तरकाशी येथून बेसिक कोर्स पूर्ण केला. अधून मधून ट्रेकिंग चालूच होतं. पण त्याला योग्य दिशा व मार्गदर्शन नव्हते. १९८६ साली माझा मित्र विनायक वेंगुर्लेकर यांनी श्री अनिल चव्हाण याची ओळख करून दिली. मग मी अनिल सोबत ‘हॉलिडे हायकर्स’ या संस्थे बरोबर अनेक ट्रेक्स आणि छोटे-मोठे सुळके (लिंगाणा, भवानी कडा, महालक्ष्मी सुळका) सर केले. अनिल चव्हाण यांच्यामुळे गिर्यारोहण या क्षेत्राकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला. शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच काही नियमांचे पालन करून आपण गिर्यारोहणाचा आनंद घेऊ शकतो, तसेच इतरांनाही देऊ शकतो, याची जाणीव झाली. हॉलिडे हायकर्स बरोबर ट्रेक करता करता, आमचा आठ दहा जणांचा वेगळा गट तयार झाला. आणि आम्ही सातत्याने सह्याद्रीमध्ये भटकंती करू लागलो. सह्याद्रीमध्ये माणिकगडची लिंगी, हडबीची शेंडी, लिंगाणा, नागनाथ, डांग्या, कर्नाळा, सीताबाईचा पाळणा, या सुळक्यांवर आम्ही आरोहण केले. काहीतरी वेगळे करण्याचा विचार आम्हाला सर्वांना त्यानंतर सतावू लागला. त्यातच श्री. अनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही १९८६ सालात टकमक कड्यावरून रॅपलिंग करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. संपूर्ण टकमक कडा रॅपलिंग करणे, तेही तुटपुंज्या साधनसामुग्रीसह (कारण दोन हार्नेस बाकीचे टेप स्लिंग) याचे आजही आश्चर्य वाटते. टकमक कडा यशस्वी रॅपलिंग नंतर आम्ही घेतलेला अनुभव आणि आनंद इतर सामान्य लोकांनाही व्हावा, म्हणून लगेचच १९८७ पासून जनसामान्यांसाठी टकमक रॅपलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून, तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भरघोस प्रतिसाद मिळाला. किल्ले रायगडावरील टकमक टोक येथून रॅपलिंग करण्याचा हा थरारक अनुभव जनसामान्यांना सातत्याने पंचवीस वर्ष देण्यात आला. आपली मुले गिर्यारोहणासाठी कोणाबरोबर जातात? ते लोक कसे आहेत? याचा पालकांना नेहमीच प्रश्न पडलेला असतो. यासाठी टकमक रॅपलिंगच्या वेळी सहभागींच्या पालकांनाही सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. यामुळे सर्व पालक ही खूश झाले. मग काही पालकांनीही रॅपलिंगचा आनंद अनुभवला. टकमक रॅपलिंग प्रशस्तीपत्रक वितरण समारंभाच्या वेळी पालकांचाही सत्कार करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक पालकांना आपल्या मुलांवर तसेच संस्थेवर असलेला विश्वास द्विगुणित झाला.
१९८६ साली मी किर्ती महाविद्यालय येथे एनसीसीच्या सरांना भेटून एनसीसीच्या मुला-मुलींसाठी मोफत रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग,
जुमारिंग याचे प्रशिक्षण देण्याचे आणि ‘एनसीसी डे’ ला गिर्यारोहण प्रात्यक्षिके करण्याचा प्रस्ताव मांडला. तो त्यांनी लगेच स्वीकारला. तसेच वर्षातून एकदा
सह्याद्रीमध्ये कॅडेट साठी ट्रेकिंगचे आयोजन करण्याचे मान्य झाले. त्याप्रमाणे किर्ती महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटना बारा वर्ष मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच त्यांच्यासाठी दरवर्षी सह्याद्रीमध्ये ट्रेकचे आयोजनही करण्यात आले.
श्री. अनिल चव्हाण यांच्यामुळे मला प्रख्यात गिर्यारोहक श्री. प्रदीप केळकर व कै. मिलिंद फाटक यांच्याबरोबर मदन गडाजवळील M2 सुळका चढाई मोहिमेत भाग घेण्याची संधी मिळाली. १९९० साली संस्थेतर्फे भैरवगडची भिंत, ढाक भैरीचा सुळका (सेंटर ROUTE) या प्रस्तर चढाई मोहिमेत मी भाग घेतला.
सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करता करता आम्हाला हिमालयाची ओढ लागली. तांत्रिक
कारणामुळे 'हॉलिडे हायकर्स' या संस्थेतून हिमालयात जायची परवानगी दिली गेली नाही.
त्यामुळे १९८८ साली आम्ही समविचारी लोकांनी ‘पिनॅकल क्लब’ची स्थापना केली.
त्याच वर्षी हिमालयातील ‘मोन’ (MON 16090') आणि ‘नोरबु’ (Norbu 17600') या शिखरावर मोहीमा आखण्यात आल्या आणि त्या यशस्वीही झाल्या. १९८९ साली आम्ही ‘कानामो’ (19800') शिखरावर मोहीम
आखली. तीही यशस्वी झाली.
१९९० साली संस्थेतर्फे आयोजित, अजिंक्य ‘मात्री’ शिखरावर (22050') तसेच १९९१ साली अजिंक्य ‘पनवाली द्वार’ (21987') आणि ‘बौलजुरी’ (19543')या यशस्वी मोहिमेत माझा सहभाग होता.
यानंतर मी हिमालयात जायचं नाही. पण संस्थेचा विस्तारामध्ये तसेच जनसामान्यामध्ये गिर्यारोहणाचा प्रसार करण्यात जास्त लक्ष देऊन, तरुण लोकांना संधी देण्याचे मनोमनी निश्चित केले. त्याप्रमाणे १९९२ मध्ये कामेट-अभीगामिन या मोहिमेला न जाता संपूर्ण मोहिमेची आखणी, तयारी, येणारी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी मी स्वतःला झोकून दिले. सदर मोहिमेत अनेक नवोदितांना संधी मिळाली आणि संस्थेचे दोन गिर्यारोहक ‘अभिगामिन’ शिखर माथा गाठण्यात यशस्वी ठरले.
गिर्यारोहणाचा प्रसार व्हावा म्हणून
संस्थेतर्फे अनेक शाळा, महाविद्यालय, सोसायटी यांना मोफत रॅपलिंग आणि रिव्हर क्रॉसिंगचे प्रशिक्षण
देऊन त्याचा थरार अनुभवण्याचा आनंद देण्यात आला. किर्ती कॉलेज(१२ वर्ष), रुईया कॉलेज (६ वर्ष), खालसा कॉलेज(४ वर्ष), आंबेडकर कॉलेज,
सेंट झेवियर्स टेक्निकल कॉलेज, सिडनहॅम कॉलेज, गोन्सलविस कॉलेज, शारदाश्रम विद्यालय, रत्नम कॉलेज, विद्याविकास हायस्कुल, होली क्रॉस हायस्कूल, अग्निशमक दल, मरोळ अश्या वेगवेगळ्या शाळा, कॉलेज आणि संस्था यांना प्रशिक्षण देऊन
गिर्यारोहणाचा,
प्रस्तरारोहणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लहान वयातच साहसाची व गिर्यारोहणाची आवड निर्माण होण्याकरिता, साहस शिबिराचे सातत्याने आयोजन संस्थेतर्फे केले आहे. संस्थेतर्फे पावसाळ्यात ‘भिवपुरी’ येथे ‘वॉटरफॉल रॅपलिंगचे’ ही आयोजन केले होते. त्याचा लाभ अनेक लोकांनी घेतला आहे.
‘कृत्रीम भिंत चढाई’ किंवा ‘स्पोर्ट्स क्लाईबिंग’ हा खेळ रुजवण्यात पिनॅकल क्लबचा मोठा वाटा आहे. स्पोर्ट्स
क्लाईबिग साठी सर्वप्रथम छोट्या आकाराची कृत्रिम प्रस्तर भिंत एलफिस्टनला एका
इमारतीच्या छोट्याशा खोलीमध्ये संस्थेतर्फे उभारली गेली.
संस्थेतर्फे प्रसिद्ध गिर्यारोहक कै. अरुण सामंत आणि कै. मिलिंद पाठक यांच्या
स्मरणार्थ सन २००० पासून गिर्यारोहण शिष्यवृत्ती देण्यात येते.
ज्या गिर्यारोहकांनी त्या त्या वर्षी सरकारमान्य गिर्यारोहण संस्थेतून बेसिक माउंटेनीरिंग
कोर्स पूर्ण केले आहेत त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयाच्या दोन शिष्यवृत्ती
देण्यात येतात.
गिर्यारोहण करताना निसर्गाची मुक्तहस्ते चाललेली लयलूट छायाचित्रित करण्याची गरज ओळखून संस्थेतर्फे २००३ साली ‘गिर्यारोहणातील छायाचित्रण’ या विषयावर एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. डोंगरदऱ्या भटकताना फोटो कसे काढावे? कॅमेराची काळजी कशी घ्यावी? याचे प्रशिक्षण नामवंत छायाचित्रकारांनी या शिबिरात दिले होते. गिर्यारोहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
सन २००३ साली संस्थेने, ‘यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान’ यांच्या सहकार्याने, ‘अखिल भारतीय’ स्तरावर ‘छायाचित्र
स्पर्धेचे’ आयोजन केले होते. या
स्पर्धेत ‘निसर्ग व गिर्यारोहण’ या विषयावर छायाचित्रे मागविली होती. त्याला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील पुरस्कार
विजेत्या तसेच इतर निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कला दालनात आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ सुमारे ३५०० गिरिप्रेमी व निसर्गप्रेमींना घेतला.
महाराष्ट्र सेवा संघा बरोबर पिनॅकल क्लबने दुसऱ्या गिरीमित्र
संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन केले. मुंबई पोलीसांतील अतिरेकी
विरोधी शीघ्र कृती दल (Quick Response Team) यांना देखील तीन वर्ष मोफत प्रस्तरारोहणाचे
प्रशिक्षण देण्यात आले.
सामाजिक जबाबदारी ओळखून घारापूरी पासून सुरूवात करत, दुर्गम भागातील आदिवासींसाठी संस्थेने आज पर्यंत नऊ मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिरांचे आयोजन केले.
महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी आणि एव्हर्ट सोसायटी यांच्या सहकार्याने टकमक रॅपलिंग, साहस शिबीर, आरोग्य शिबिर राबवताना, एच आय व्ही/ एड्स विरोधी प्रचाराचे बॅनर, भित्तीपत्रके तसेच माहिती पुस्तिकेतून सातत्याने तरुण-तरुणी, जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
सांदण व्हॅलीला लागून असणाऱ्या ‘साम्रद’ गावातील शाळेला
तसेच विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तूंचे वाटप करून क्लबने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे
केले. २ जुलै २०१२ रोजी गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेने ही सर्व मदत शाळेला सुपूर्द केली.
किल्लारी भूकंप ग्रस्तांना मदत, २६ जुलै २००५ ला मुंबईतील पूरग्रस्तांना मदत, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील जखमीना मदत, कारगिल युद्धातील शहीद कुटुंबांला मदत, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोफत शिबिर, केरळ येथील अनाथ मुलांसाठी मोफत साहस शिबिर, आटगाव येथील देवीच्या मंदिरात कारसेवा (मातीत विखुरलेल्या विरगाळाची, स्तंभांची पुनर्रचना करणे व तेथील ग्रामस्थांना त्याचे ऐतिहासिक महत्व सांगून हा अमोल ठेवा कसा संरक्षित ठेवता येईल या दृष्टीने ग्रामस्थांच्या मदतीने इतिहासातील या अमोल ठेव्याची जतन करण्याचा अनोखा कार्यक्रम केला), हरियाली संस्थेबरोबर वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबिर, तसेच गरजूंना रक्तदान असे अनेक कार्यक्रम सातत्याने संस्थेतर्फे राबविण्यात आले.
नवीन सभासदांचा आग्रहाखातर, तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१० साली हिमालयातील ‘थारकोट’ (20010') आणि ‘भानोटी’ शिखर (18520') मोहीम तसेच २०१६ साली ‘श्रीखंड महादेव’ ट्रेकमध्ये सहभागी झालो.
मी १९८३ मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नोकरीला लागलो. तेथेही पदभ्रमणाचे अनेक उपक्रम राबविले. माझ्या गिर्यारोहणाचा वाटचालीमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे, अधिकाऱ्यांचे तसेच माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच मी एवढी मजल मारू शकलो. त्यासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहीन.
हा सगळा उपक्रम राबवण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली. काही नावे आवर्जून घेण्यासारखी आहेत. अजूनही गुरुस्थानी असलेला श्री अनिल चव्हाण, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. विनायक वेंगुर्लेकर, श्री सचिंद्र आयरे, सौ. तेजस्वीनी व श्री अतुल कुलकर्णी, श्री विनोद पटेल, श्री विवेक शिंदे, श्री. विजय भाई शहा, श्री प्रशांत ठोसर, श्री. यतीन कोरे, श्री विनोद नाईक, श्री राजेश वरळीकर, श्री प्रफुल्ल भोसले, श्री विजय वाघधरे आणि आता संस्था सांभाळणारे श्री. शशिकांत वैद्य, श्री. महेश कांबळे असे अनेक नवोदित गिर्यारोहक यांना विसरून चालणार नाही.
माझ्यावर व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारे एव्हरेस्टवीर श्री सुरेंद्र चव्हाण, श्री हरीश भाई कपाडिया, श्री प्रजापती बोधणे, श्री ऋषीकेश यादव, श्री उमेश झिरपे यांच्यासाठी माझ्या मनात नेहमीच आदराचे स्थान राहिले
आहे.
अभिमान वाटतो बापू..! असे खंदे आणि झोकून देणारे शिलेदार होते त्यामुळे पुढची पिढी घडली..! मनःपूर्वक अभिनंदन..! @सुनील.. सुंदर घडतंय हे सगळं..! मनःपूर्वक धन्यवाद..! 🙏🙏
ReplyDeleteसुनिल तू लेखाची सुरवात परफेक्ट केली आहेस,
ReplyDelete"संस्था प्रथम" - हे बापूचे ब्रीदवाक्यच आहे,
मला १९९२ ला NIM बेसिक ची फिस बापूने Scholarship म्हणुन दिली होती, तेंव्हा पासून ओळखतो, नेतृत्वगुण मी ह्याव्याकडे बघूनच शिकलो, मला तेव्हापासून लहान भावासारखे जपले ह्यांनी, लिहिण्यासारखे खूप आहे, अजुन एक ब्लॉग होईल,
Love you ❤️ बापु
खूपच अभिमान वाटावा अशी कामगिरी ...धन्य.
ReplyDeleteबापू सर तुम्हाला मनापासून अभिनंदन, खरच तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. तुमच्या बरोबर ट्रेक करताना खूप छान अनुभव आहे. मला अभिमान आहे तुमचा v तुमच्या कर्तत्वाला माझा मनापासून मनाचा मुजरा.
ReplyDeleteबापू आमच्यासारख्या नव गिर्यारोहकांना तुम्ही सदैव मोलाचं मार्गदर्शन , सहकार्य केले आहे.
ReplyDeleteसंस्थेच्या उभारणीत आणि गिर्यारोहण सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आयुष्य वेचले आहे.
गिर्यारोहण करताना सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले, सामाजिक बांधिलकी जपत, गिर्यारोहण क्षेत्रात भरीव योगदान दिले. गिर्यारोहकांना भेडसावणाऱ्या समस्या विविध ठिकाणी मांडल्या आणि त्यामधून मार्ग काढण्यासाठी विचार सुचवलेत.
-महेश कांबळे
खुप छान...
ReplyDeleteएक असामान्य व्यक्तिमत्व.
'संस्था प्रथम', कुशल नेतृत्व, कार्यात झोकून द्यायची वृत्ती, वैयक्तिक प्रसिद्धी चा कधीच हव्यास नसलेला असा मनमिळावू आणि डोंगर भक्त असलेल्या संतोष चे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🏼 ... अतुल कुळकर्णी
ReplyDeleteसंतोष जी खरोखरच तुमची कामगिरी विलक्षण आहे. तुमच्या सारख्या जाणत्या गिर्यारोहकांनी महाराष्टातील गिर्यारोहण ची मुळे पक्की केली आहेत.
ReplyDeleteमनापासून शुभेच्छा !
मला खरोखरच अभिमान आहे कि संतोष हा माझा एक चांगला मित्र आहे आणि मला त्याचा हेवा वाटतो, त्यांनी निस्वार्थो पणाने केलेल्या गिर्यारोहण क्षेत्रातल्या कार्याचा , तसेच विविध क्षेत्रातल्या कार्याचा, संतोष तुला पुढील कार्यासाठी शुभेच्छा 💐💐
ReplyDeleteLife is full of thrills. Simply great. Keep it up. Best luck for future hikings
ReplyDeleteसंतोष खरोखरच ग्रेट आहेस
ReplyDeleteBapun baddal Kai lihu. Mi swata Takmak 2003 chya batch madla Ani tyanater geli 17 varshat Pinnacle sho jodla gelo.ata paryanta aganit sahyadri Ani 5 Himalayan expedition. NIM madhun basic.
ReplyDeleteMazi survat Kirti NCC Ani NCc Day madhun building Varun rappel down nai river crossing karun zhali.
Bapu jo jo Pinnacle shi associate ahe tya pratekashi atmiyatene boltata Ani tya pratekala ghadavnya madhe tyancha molacha hat nakkich ahe. Bapu jevdha premal ahe tevdha strict sudha amhi donhi rupa baghitli ahet. Pan jasta prem anubhavla ahe.navya mulan barober gheun tyachyatun leadership qualities explore karna kiva tyana trek leader banauna mage rahun support karna.he sudha anubhavla ahe.
Thank you so much for all your love
मित्रांनो,
ReplyDeleteगिर्यारोहण हे क्षेत्र जर"पंढरपूर"मानले तर,
या पंढरीचा"राजा"म्हणजे माझा"बापू"!
होय,गिर्यारोहण क्षेत्रातील,एक वजनदार,मानाचे आणि दिशादर्शक व्यक्तीमत्व म्हणजे"श्रीयुत संतोष चंद्रशेखर कल्याणपूर"
माझे भाग्य थोर 1986 च्या डिसेंबर पासून मी"बापू"च्या संपर्कात आलो,आणि"बापूमय"झालो.
व्यक्तीगत जीवनात सुध्दा अडी-अडचणीत मोठ्याभावा सारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहाणारा माझा विठ्ठल म्हणजे"बापू".
मी तरी या विठ्ठलाच्या चरणी सदा लिन राहून जन्माचे सार्थक झाल्याचे मानतो.
शेवटी एकच म्हणावेसे वाटते,"कानडा राजा पंढरीचा...!
सेवेचे ठायी ---अशोक विठ्ठल तामोरे.
मित्रा समाजासाठी आभाळाएवढ काम केलस आणि जराही गर्व नाही.सलाम तुझ्या कामाला.
ReplyDeleteलेखाची मांडणी अतिशय सुंदर, त्याच बरोबर जोपासलेला छंद अप्रतिम appriciate,,👍👍
ReplyDeleteमागे वळून पाहताना......
ReplyDeleteया लेखातून मागील तीस-पस्तीस वर्षाचा इतिहास डोळ्यासमोरून गेला
संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक चांगल्या वाईट गोष्टी नजरेसमोरून सरकत गेल्या
आपल्या गिर्यारोहणाच्या मैत्रीतून आपली कुटुंबे देखील जवळ आली, त्यामध्ये टकमक रॅपलिंग या प्रोग्रामचा सिंहाचा वाटा आहे
त्या काळात आपण कुटुंब पेक्षाही संस्थेवर जास्त प्रेम करत होतो ,अर्थात आज करत आहोत पण पहिल्यासारखे रेगुलर कार्यक्रम होत नाहीत.
त्या काळी संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या
संस्थेच्या पडत्या काळात तू सभासदांना एकत्र बांधून ठेवण्यात यशस्वी झाला. काही जवळचे मित्र लांब गेले संस्थेच्या हिताच्या दृष्टीने त्याची तू तमा बाळगली नाही आणि तू सत्याची कास सोडली नाहीस. म्हणून पिनॅकल क्लबला गिर्यारोहण क्षेत्रात मानाचे स्थान आहे.
आपले काही जवळचे गिर्यारोहक मित्र आपल्याला सोडून गेले याचे फार दुःख आहे
बापू एक सूचना करावीशी वाटते की वर्षातून असा एक किंवा दोन दिवस फिक्स करावे त्यादिवशी आपण सर्व मित्रांनी जमल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत मजा करावी
Great Kalliainpur
ReplyDeleteA Daredevil! You are our hero. Proud of you.
ReplyDeleteउत्तुंग व्यक्तिमत्व, पण पाय जमिनीवर
ReplyDeleteExcellent mini autobiography. A story of rags to Riches in terms of hiking experience. If possible write a book of all these experiences and your exploits of adventures. Marathi language is drafted too good. Keep the tag line Autobiography of a hiker. Regards. Sundeep shelukar.
ReplyDeleteआपले सहकारी मित्र संतोष कल्याणपूर यांनी सुंदर लेख लिहिला असून मांडणी छान केली आहे. त्यांनी आपल्या आवडीचा छंद चांगला जोपासला. त्यांनी आपल्या समाजकार्यातून अनेकांना मोठे केले आहे, जो माणूस दुसऱ्यांना मोठे करतो, तो आपोआपच स्वतः मोठा होतो. जो दुसऱ्यांना आनंद देतो, त्याचा स्वतःला निश्चितच आनंद मिळतो. संतोषचा लेख वाचल्यानंतर त्याचे कार्य किती मोठे आहे, हे आपणांस समजले. त्यांनी स्वताची महती कधीच सांगितली नाही, तसा त्याचा स्वभाव नाही. त्यांनी गिर्यारोहक म्हणून अनेक गड सर केले, पण स्वतःचे पाय जमिनीवरच ठेवले, त्याचा चेहराच सांगतो तो किती निस्वार्थी आहे. संतोषने आपल्या क्षेत्रात चांगले नावलौकिक केले आहे, गिर्यारोहणच्या कार्यात जीवन गौरव सारखे पुरस्कार मिळाले. संतोषच्या या कार्याला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteसंतोष,
ReplyDeleteसलाम तुझ्या कार्याला. संस्था प्रथम ही खरच खुप महत्वाचे आहे.
Bapu you are simply Great!! We are proud of you and the time spend with u is golden moments of our life..
ReplyDeleteVinod Naik.
*** " श्री. संतोष कल्याणपुर ....आपल्या उंच गिर्यारोहणाचं आम्हाला कौतुक आहेच....त्याचबरोबर आपला शांत स्वभाव, साधी राहणीमान, कशाचाही बडेजाव नाही, आवडीचा छंद जोपासत आपण सामाजिक बांधिलकीही जपली आहे. .....याचा सुध्दा अभिमान वाटतो. .....संतोष आपल्या कारकीर्दीला,कार्याला सलाम. -------" आपले खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.--
ReplyDeleteश्री. पोपट बनसोडे.
Hi
ReplyDeleteHi
ReplyDeleteखेळा मध्ये उंच व धीप्पाड माणसं असतात परंतु गिर्यारोहणा मध्ये सडपातळ व कमी उंची असलेली माणसे यशस्वी होतात त्याप्रमाणे संतोष तुझं व्यक्तिमत्त्व आहे लहान मुर्ती व किर्ती महान या उपाधीला प्राप्त झालास तुला समाजसेवेची आवड, गिर्यारोहणा मध्ये आवड, नविन मुलांना घडवणे, खेळा मध्ये सातत्य या गुणांमुळे तु यशस्वी झालास असेच नविन नविन प्रयोग करीत रहा व यशाची शिखरे प्राप्त होवो देवदास गीते मुंबई पोर्ट ट्रस्ट.
ReplyDeleteबापू तू मला तुझा मित्र मानतोस यातच मी धन्य झालो तु ६१ वर्षात पदार्पण केलेस नव्हे तू परत १६ वर्षाचा झालास तुझ्या मनातील ऊमेद तूझी ऊत्तूंग भरारी घेण्याची वृत्ती कधीच कमी होणार नाही.तू नेहमी आनंदी रहा मज्जेत रहा जमलं कधी तर हाक मार मी आहेच.
ReplyDeleteBapu ni anek giryarohak ghadvile tyatil mi suddha ek aahe. Bapu tuzi club chya prati asaleli nishtha v club varche prem amha sarvana ektra bhandhun thevate. Tu nehami aamachya sarvanchya madatila dhavun yetos v pudhehi yeshil. Tuzya baddal sangnyas shabd apure padtat. Bapu tuzya baddal amhala abhiman aahe.
ReplyDeleteShashikant.