Thursday, June 3, 2021

Dhananjay Madan

                             धनंजय मदन

धनंजय काशिनाथ मदन, हे गिर्यारोहण क्षेत्रातील एक महत्वाचे व्यक्तीमत्व, ‘आप्पाया आदरणीय नावाने सर्वजण त्यांना संबोधतात. गिरीमित्र संमेलना सारख्या, सर्व संस्थाच्या एकत्रित उपक्रमात आप्पांची हजेरी नसेल व रायगड-पनवेल विभागाची जबाबदारी नसेल तर तो कार्यक्रम अपूर्ण वाटेल. इतका हा माणूस प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा. त्यांची ही छोटीशी ओळख,

'या वाटेवर ते कसे वळले?” असं विचारलं असता ते * म्हणाले, “मी शाळेत म्हणजे अगदी आठवी नववीत असतानाच आप्पांची म्हणजे गो. नी. दांडेकर यांची खूप पुस्तकं वाचली. त्यामुळे डोंगराकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलली. वृत्तपत्रांतूनही मी गिर्यारोहणासंबंधीच्या बातम्या आवडीने वाचायला लागलो. त्यातूनच १९८० साली वयाच्या २१व्या वर्षी मी गिर्यारोहणाची सुरूवात केली. प्रथम मी १९८० च्या पहिल्या-वहिल्या रायगड प्रदक्षिणेला गेलो. त्या अनुभवाने माझं विश्वच बदललं, मी गिर्यारोहणाच्य़ा प्रेमातच पडलो. मग ८५ साली मी 'केव्हज एक्स्प्लोरर्स' या नामांकित संस्थेच्या संपर्कात आलो.

त्यांच्याबरोबर मी काही ट्रेक्स केले. तसेच ८५ सालीच मी प्रस्तरारोहणाचा एक कोर्सही केला. मग हळू हळू मी सारखाच आणि बऱ्याचदा एकटाच ट्रेक्सवर जाऊ लागलो. आणि हरिश्चंद्रगड व प्रचितगड माझे आवडते झाले, तर घुमटी व कंधारडोह हा माझा आवडता परिसर झाला. लिंगाणा किल्ल्यापासून माझी सह्याद्रीच्या प्रवासास सुरूवात झाली. तोच माझा आवडता सुळका वजा किल्ला झाला. तर कर्नाळा सुळका सर करून प्रस्तरारोहण क्षेत्रात मी पाऊल टाकले. मग पाचलिंगी, कळकराय, नागफणी, प्रबळगड येथील देहू-चाहू, माणिकलिंगी ह्या सह्याद्रीतील प्रस्तरारोहण मोहिमा केल्या..

मी राहात असलेल्या वाड्यात माझ्याच वयाची काही मुलं होती. मी ट्रेकला जातो म्हटल्यावर ते माझ्याबरोबर येऊ लागले. त्यांना घेऊन मी एकदा कर्नाळ्याला गेलो. मग आम्ही एकत्र जाऊ लागलो. सुरवातीला आम्ही स्वतःला नुसतं 'निसर्गप्रेमी' म्हणून संबोधत होतो. पण ते काही बरं वाटेना. मग आम्ही माउंटेनियर्स असोसिएशन ऑफ पनवेल असं नाव घेतलं. पण तेही तितकसं बरोबर वाटेना. शेवटी ८७ मध्ये 'निसर्गमित्र' या सर्वसमावेशक नावाने आम्ही काम सुरू केले.

'दुर्ग संवर्धन' हे निसर्गमित्र ने हाती घेतलेलं पहिलं मोठं काम होतं. मदन म्हणाले, “दुर्गमित्र बरोबर आम्ही दुर्गसंवर्धनाच्या दृष्टीने बरंच काम केलं. कर्नाळा, प्रबळगड, इर्शाळगड, सुधागड इथे आम्ही विशेष करून खूप काही केलं. सुधागडाचं जे अप्रतिम महाद्वार आहे ते पूर्णपणे मातीखाली गेलं होतं. ते 'मातीचे ढिगारे उपसून महाद्वार मोकळं करायचं काम आम्ही केलं.

त्या कामाबरोबर मग पुढे-पुढे 'निसर्गमित्र' ने आपल्या कामात खूप वैविध्य आणलं, 'त्याची गरज का वाटली?' हे सांगताना मदन म्हणाले, “संस्थेचे काम चालू असताना नवीन खूप माणसं जोडली जायला लागली. ह्या सगळ्यांना आकर्षून घेतील असे कार्यक्रम आखण्याची गरज आम्हाला जाणवायला लागली. त्यातूनच मग आम्ही निसर्ग शिबिरे (नेचर कॅम्प), प्रस्तरारोहण शिबीरं, निसर्ग भटकंती (नेचर ट्रेल) जंबो ट्रेक्स वगैरे सुरू केले. तसंच ८७-८८ साली 'मोहीम इंद्रावतीची फेम जगदीश गोडबोले, उल्हास राणे, बऱ्याचशा गैरसरकारी संस्था आदींनी एकत्र येऊन पश्चिम घाट बचाव मोहीम हाती घेतली होती. आम्ही त्यात सहभागी झालो. त्यात कन्याकुमारीहून एक यात्रा निघाली होती व एक धुळ्याहून निघाली होती. सह्याद्रीचा, इथल्या जंगल-दऱ्या-खोऱ्यांचा व्यापक अभ्यास त्यात करण्यात आला होता. गोव्याला एका मोठ्या संमेलनाने या मोहिमेचा समारोप झाला होता. त्या संमेलनाला तर निसर्ग मित्रचे दोघे गेले होतेच, पण मी या मोहिमेची रायगड जिल्ह्यातील सगळी आघाडी सांभाळली होती. ती माझी या क्षेत्रातली पहिली मोठी उडी म्हणता येईल. त्यातून माझ्या खूप ओळखीही झाल्या. तसंच निसर्गाशी संबंधित अनेक प्रश्नांचं आकलनही मला झालं. त्यातून मग फक्त ट्रेकिंगच करत राहायचं की मुलभूत, विधायक असं आणखी काही करायचं या प्रश्नाने मला अस्वस्थ केलं. मी निसर्ग संवर्धनाच्या कामात स्वतःला झोकून दिलं. त्यामुळे बी.एन.एच.एस. व युथ हॉस्टेल सारख्या संस्थाशीही जोडला गेलो.

मदन यांनी 'निसर्गमित्र'च्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक गोष्टी केल्या व अजुनही करताहेत. ते म्हणाले, “वृक्षारोपण मोहिमा, वाड्या-वस्त्यांवर कपडे-औषधे वाटप, प्रस्तरारोहण शिबीरं, मुलांसाठी निसर्ग शिबिरं, चित्रकला-निबंध स्पर्धा, रेस्क्यू ऑपरेशन अशा असंख्य गोष्टी तर आम्ही अव्याहतपणे करतोच आहोत. पण आम्ही नेमाने वन्यजीव सप्ताह व जागतिक वसुंधरा दिनही साजरा करतो. त्या निमित्ताने आम्ही छायाचित्र प्रदर्शन, नामवंतांची व्याख्यानं, मिरवणुका आदी उपक्रम योजून जनजागृती घडवून आणतो.'

पुढे मदन यांनी दार्जिलिंगच्या संस्थेतून गिर्यारोहणाचा पायाभूत अभ्यासक्रम वयाच्या ४० व्या वर्षी A ग्रेडने पूर्ण केला. सह्याद्रीतल्या असंख्य मोहिमांबरोबरच हिमालयातील भागीरथी २ व पोलोगोंका ह्या हिमालयीन शिखरांवरही चढायाही केल्या आहेत. युथ हॉस्टेलच्या सारपास मोहीमेत ते मनाला येथे कॅप लीडर होते.  अन्नपूर्णा बेस कॅम्प, एव्हरेस्ट बेसकॅप अशा ट्रेकिंग मोहिमांतही ते लीडर म्हणून सहभागी होते. शारिरीक कमजोरी व कमी अनुभवाने आपण मागे पडतो पण प्रचंड इच्छाशक्ती तुम्हाला विजय मिळवून देते, असे त्यांचे म्हणणे आहे. आजही ते ट्रेक्स करतात. पण निव्वळ ट्रेक्स हे त्यांचं स्वप्न नाही. तो त्यांचा ध्यास नाही. पर्यावरण निसर्ग संवर्धनाचा ध्यास त्यांना लागला आहे.

   पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून कोणतेही वाहन ते बाळगत नाहीत. ऊर्जेचा व इंधनाचा कमीत कमी वापर व्हावा हा त्यांचा उद्देश आहे. पेपर कप-डिश यांचा देखील वापर ते टाळतात.  जे या क्षेत्रात व्यवसाय करतात त्यांनी पर्यावरणाची हानी टाळावी, त्यासाठी संसाधने जपून वापारावीत, असे ते सुचवतात.

ते म्हणाले, “कन्याकुमारी पर्यंत सायकल ट्रेक काढण्याचं माझं खूप वर्षापासूनचं स्वप्न होते. ते १ ते १९ फेब्रुवारी २००५ या काळातच पूर्ण झालं. सायकलच्या वापरामुळे इंधन वाचतं. तसंच हवाही शुद्ध राहते. त्यामुळे सायकलचा अधिकाधिक वापर करा हा संदेश आम्ही वाटेतल्या गावागावातून पत्रक वगैरे वाटून दिला. माझ्या बरोबर आणखी दोघेजण होते. आम्हाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की खूप समाधान वाटलं.

   पुढे आमचा सायकल प्रवास भारतात अरूणाचल प्रदेश, लडाख, कोणार्क तसेच भारत-पाकिस्तान मैत्रीसाठी वाघा सीमेपर्यंत झालाच, पण त्याचवरोबर श्रीलंका, युरोप येथेही आम्ही सायकल भ्रमण केले. भारत-पाकिस्तान मैत्री साठी केलेली 2500kms ची सायकल मोहीम ही अतिशय अविस्मरणीय ठरली आहे, असे त्यांना वाटते.

ते पुढे म्हणतात, एवढ्यावरच न थांबता आम्ही इर्शाळगड, सुधागड, प्रबळ येथील भुयार संशोधनात देखील सहभाग घेतला होता. जे रुचतं, जे जमतं तेच मी करतो. खूप वर्षांपूर्वी  प्रबळगडाच्या परिसरात एक तरूण हरवला, मी एकट्याने दोन दिवस शोध घेण्याचा प्रयत्न केला. कठिण काम होतं. पण नंतर यशवंती हायकर्सची मदत घेतली.

ते महिलांच्या प्रस्तरारोहण मोहिमेच्या संकल्पनेचेही आधारस्तंभ होते. त्यांच्या पुढाकार, मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे महिलांच्या चमूने ५ सुळक्यांवर चढाई केली.

गिर्यारोहण-निसर्ग या क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानापेक्षा या क्षेत्रांनी त्यांना काय दिलं? या विषयी बोलणं ते अधिक पसंत करतात. ते म्हणाले, “या क्षेत्रात उतरल्यामुळे मला सामान्यांची परिस्थिती समजली. निसर्गाचे, पर्यावरणाचे प्रश्न समजले. मनातल्या भुता-खेतासारख्या अनेक अंधश्रद्धा दूर झाल्या. कमीत कमी गरजांत कसं भागवायचं ते समजलं. अनावश्यक संचय कसा टाळायचा? का टाळायचा? ते कळलं. काटकपणा आला, चिवटपणा आला. निसर्गाने, या भटकंतीने मला खूप काही दिलं. ‘Against All Odd’ या शब्द प्रयोगाने मला कायम प्रेरीत केले. म्हणूनच  म्हणतो, हा समाधानाचा हुंकारच महत्त्वाचा. त्यासाठी गिरीमित्र संमेलनासारख्या उपक्रमाद्वारे आपण एकत्रित येवून, आपण कार्यरत राहूया, नाही का?

धनंजय मदन हे कै. अरूण सावंत ह्यांना गुरूस्थानी मानत होते. गिर्यारोहणाच्या कारकिर्तीत पद्माकर गायकवाड, ऋषिकेश यादव, उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन त्यांना मोलाचे वाटते, तर रिनॉल्ड मेसनर हा त्यांचा आवडता गिर्यारोहक, असे ते म्हणतात. अशा या गुणी गिर्यारोहकाला २००५ साली गिरीमित्र गिरीभ्रमण हा पुरस्कात प्राप्त झाला आहे. आता त्यांचे वय ६१ आहे.

31 comments:

  1. आप्पा बद्दल लिहिलेली अप्रतिम माहिती. सरळ, साधा, आपला वाटणारा मित्र, गुरू धनंजय मदन. तुला मनःपुर्वक अभिवादन

    ReplyDelete
  2. सुनील मित्रा प्रथम तुझे अभिनंदन। धनंजय मदन उर्फ अप्पा यांच्या एकूणच कारकीर्दचा खूप सुंदर आढावा आपण घेतलात। धनंजय मित्रा तुझे अभिनंदन व तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा।

    ReplyDelete
  3. सुनिल खुप सुंदर शब्दांकन आप्पाच्या कार्याचे यथार्त वर्णन

    ReplyDelete
  4. आप्पा बद्दल बोलावे तेवढे कमीच ��

    ReplyDelete
  5. आप्पांचं कार्य आणि नाव याविषयी थोडीफार माहिती होती. मात्र या लेखाद्वारे आप्पांच्या एकूणच कारकिर्दीवर एक छान दृष्टीक्षेप टाकला गेला आहे. आप्पांच्या प्रत्यक्ष भेटीचा नुकताच जुळून योग फार सुंदर होता. निसर्ग संवर्धन, पर्यावरण आणि गिर्यारोहण क्षेत्रातील एक दिग्गज या लेखातून नक्कीच उमजतो. मनःपूर्वक आभार सुनील..! आप्पांना नमस्कार..! 🙏🙏

    ReplyDelete
  6. आप्पांचं कार्य आणि नाव याविषयी थोडीफार माहिती होती. मात्र या लेखाद्वारे आप्पांच्या एकूणच कारकिर्दीवर एक छान दृष्टीक्षेप टाकला गेला आहे. आप्पांच्या प्रत्यक्ष भेटीचा नुकताच जुळून योग फार सुंदर होता. निसर्ग संवर्धन, पर्यावरण आणि गिर्यारोहण क्षेत्रातील एक दिग्गज या लेखातून नक्कीच उमजतो. मनःपूर्वक आभार सुनील..! आप्पांना नमस्कार..! 🙏🙏

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. अप्पा तुमच्या कार्याला सलाम. तुमचे सह्याद्री वरचे प्रेम, गडकिल्ल्यावरची निष्ठा आणि इतरांना सतत मार्गदर्शन करून ,वेळ प्रसंगी त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कृती खूपच मोलाची आहे.
    अप्पा इतके मोठे असून ही किती साधे, सरळ आणि सहज भावनेने सगळ्यांना हवे हवेसे वाटतात ह्यातच सर्व काही आले.
    पुन्हा एकदा त्यांना उदंड शुभेच्छा !

    ReplyDelete
  9. मूर्ति लहान कीर्ति महान मदनच्या संस्काराखाली दुसरी टीम ही पुर्ण कार्यशमतेने तयार झाली कुठे कचरा नाही ठिगळ टवाळी नाही गावकऱ्यांशी आपुलकीचे नाते किती सांगावे ते कमीच तेच संस्कार आपल्या मुलीवरसुद्धा तिचाही सायकल प्रवास कन्याकुमारी ते लढाख
    धन्य धन्य मदनजी हमे आपपर गर्व हे आप हमारे जिवंश कातस्थ मित्र है

    ReplyDelete
  10. आप्पा तुला सलाम
    तुसी ग्रेट हो

    ReplyDelete
  11. अजित कांबोज

    ReplyDelete
  12. काय बोलावं या आणसाबद्दल ? नव्हे नव्हे या अवलियाला शब्दात मांडायला गेलं तर शब्द फिके पडतील, आज गिर्यारोहण आणि त्या संदर्भात जे काही थोडं फार केलं आणि भविष्यात करू त्याच पहिलं श्रेय हे कायम या तरुण माणसाला म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या आप्पांनाच असेल. आप्पा तुम्हाला तुम्हाला सलाम 🙏

    ReplyDelete
  13. अप्पा
    मित्रा खूप खूप अभिमान वाटतो तुझा.
    खूप मोठी उंची गाठली तरी आप्पाचे पाय नेहमीच जमिनीवर असतात, आणीहे मी स्वतः पूर्वायुष्यात खूपदा अनुभवले आहे.
    मित्रा तुझ्या अतुलनीय कार्याला माझा सलाम..��

    ReplyDelete
  14. अप्पा
    मित्रा खूप खूप अभिमान वाटतो तुझा.
    खूप मोठी उंची गाठली तरी आप्पाचे पाय नेहमीच जमिनीवर असतात, आणीहे मी स्वतः पूर्वायुष्यात खूपदा अनुभवले आहे.
    मित्रा तुझ्या अतुलनीय कार्याला माझा सलाम..🙏

    ReplyDelete
  15. तुझ्यासारखे गुरू आणि मित्रा आम्हाला या जीवनात लाभले हेच आमचे भाग्य. तुझ्याकडून आम्हाला नेहमीच खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुझ्या या कार्याला सलाम 🙏

    ReplyDelete
  16. अप्पांच्या आपुलकीचा अनुभव मी गेली पंचवीस वर्षे घेत आहे, त्याचे हे यथार्थ व्यक्ती चित्रण वाचताना पुन्हा एकदा अप्पाला भेटल्याचा आनंद झाला.

    ReplyDelete
  17. 👍👍👍
    He always build authentic bridge to each and every opposite person of any age.
    And allways GIVE INSPIRATION to all.

    ReplyDelete
  18. Aapa the great One Man Army 👍👌🎉

    ReplyDelete
  19. Appa The Great
    निसर्ग,झाडे,पशू, पक्षी,डोंगर,किल्ले,डोंगरातील माणसे या सर्वांवर अतोनात प्रेम करणाऱ्या अप्पांचे सुयोग्य व्यक्तिचित्रण.निसर्गावर प्रेम करायला, साहसी मोहिमा,सायकलिंग करायला शिकविणे हा यांचा छंद. अप्पा अजुन नविन पिढ्या घडवायला,निसर्गसंस्कार करण्यासाठी खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  20. अप्पा मानलं तुम्हाला, कुमार कडुन या सर्व गोष्टी ऐकल्या होत्या,आज वाचल्यावर उजळणी झाली. थोडक्यात पण पुर्ण माहिती संकलन केले आहे. पुढील उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा.

    ReplyDelete
  21. Grate work शतशः प्रणाम

    ReplyDelete
  22. आप्पांबद्दल अगदी योग्य शब्दात वर्णन केले आहे.
    आप्पांच्या कारकिर्दीस लाख लाख सलाम. अशीच पुढील काळातही मनसोक्त भटकंती, सायकलिंग, सामाजिक कामे चालू राहण्यासाठी - आप्पांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा

    ReplyDelete
  23. स्वतःचे साधेपण जपत ही माणूस खूप मोठा होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण धनंजय तू आहेस... तुझ्या बद्दल निसर्गमित्र म्हणून अभिमान आहे आणि तो राहील यात शंकाच नाही... तुझ्या ह्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा....

    ReplyDelete
  24. नुकतीच ट्रेक करायला सुरुवात केली होती आणि असाच आप्पा च्या घरी एकदा गेलो असताना त्याने ट्रॅक्टर सह्याद्री चे पुस्तक हातात ठेवले आणि मग काय आमची भ्रमंती सुरू झाली त्यानंतर भगीरथी मोहिमेला आम्ही एकत्र होतो.ग्रेट गुरू मित्र...निसर्ग मित्र..

    ReplyDelete
  25. सुनील सुरेख शब्दांकन

    ReplyDelete
  26. मदन मनपूर्वक शुभेच्छा, तूझ्या कार्याला सलाम, नेहमी हसऱ्या चेहऱ्याचा, तुला उदंड आयुष्य लाभो 👌👌🙏

    ReplyDelete
  27. अशा अवलियाच्या संपर्कात उशिरा का होईना पण सानिध्यात आलो याचा अभिमान आहे.

    स्फुर्तीदायक व्यक्तीमत्व.

    ReplyDelete
  28. अतिशय साधा सरळ माणूस.पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...

    ReplyDelete
  29. अप्पा आणि मी महाविद्यालयीन मित्र.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे ब्रीद वाक्य अप्पाला नक्कीच लागू होतं. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी अप्पाला खूप खूप शुभेच्छा. तू आमच्या मित्रांचा अभिमान आहेस. असाच मोठा हो.

    ReplyDelete
  30. सुंदर प्रतिक्रिया

    ReplyDelete