Thursday, June 3, 2021

Sunil Raj

सुनील सुमंत राज तथा राका

ऐतिहासिक काळात चालणे हे गरजेचे होते. तेव्हा कसल्याही वाहनांची सहज उपलब्धता नव्हती. तेव्हा महिनोन-महिने, मैलोन-मैल माणसे पाठीवर अथवा डोक्यावर गाठोडे घेऊन पायी प्रवास करायचे. पण प्रगत युगात अट्टाहासाने चालत जाण्याचा छंद जपणारे विरळाच. सुनील राज हे असेच एक व्यक्तिमत्व.

तशी सुनील राज यांना लहान पणा पासूनच काकां बरोबर फिरताना चालण्याची आवड निर्माण झाली. ते परळ ते दादर अथवा विल्सन कॉलेज, गिरगाव चौपाटी पर्यंत चालत जायचे.

पुढे १९७८ सालानंतर साधारण वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे खरे पदभ्रमण सुरू झाले. मुंबईतील परळ गावातीलच काही मित्रां बरोबर ते बोरीवली नॅशनल पार्क, कधी वाशी तर कधी पनवेल पर्येत रात्री चालत जायचे. नेहमीच्या चाकोरी पेक्षा काहीतरी वेगळे करण्यात, उघड्या माळावर पहाटेच्या झुंजुमुंजू वातावरणात जे फटफटतं ते पाहाण्यात. निसर्ग अवलोकन करण्यात त्यांना आनंद वाटू लागला.

मग त्यांनी, शिर्डी पर्यंत चालत जाण्याचा संकल्प केला. ३० डिसेंबर १९७८ रोजी त्यांनी प्रवासास सुरूवात केली आणि चार दिवसात २६६ किमीचे अंतर राजन बागवे, नितीन परळकर, वसंत घाग, विठ्ठल विचारे व प्रदीप पाटील यांच्या सोबत पार पाडले.

पुढे ४ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९८१ या कालावधीत, मुंबई ते गोवा हे ५९५ किमीचे अंतर त्यांनी दशरथ पोवार आणि संभाजी अंकलेकर यांच्या सोबत पायी पार पाडले.

त्यानंतर काही मित्रां बरोबर त्यांनी गिर्यारोहणास सुरूवात केली. त्यातून इतिहासात, ऐतिहासिक वास्तूत त्यांना रूची निर्माँण झाली. काही ठिकाणी असणाऱ्या कठिण प्रस्तर वाटा, डोकावणारे सुळके, हे चढणे त्यांना आव्हानात्मक वाटू लागले. म्हणून त्यांनी पुण्याच्या, भारत आउटवर्ल्ड बाऊंड फाऊंडेशन या संस्थेचा प्रस्तरारोहणाचा प्रशिक्षण कार्यक्रम सिंहगड येथे पूर्ण केला.

ह्या सगळ्या भटकंतीत येणारे अनुभव, अडचणीं त्यावर होणाऱ्या तासनतास गप्पा ऐकून, ह्याची कुठे तरी नोंद व्हावी असे त्यांना वाटू लागले. प्रथितयश नियतकालके याची म्हणावी तशी दखल घेत नव्हते. म्हणून गिर्यारोहकांचे, साहसप्रेमींचे स्वतःचे मुखपत्र असावे असा विचार त्यांच्या मनात आला. आणि समविचारी मित्रांना सोबत घेऊन १९८३ मध्ये साहस त्रैमासिकाचा श्रीगणेशा झाला. पण नोंदणी करताना जिद्द हे नाव मिळाले. नेट मिडीया आल्यावर, प्रिंट मिडीयाचे महत्व कमी होऊ लागले, म्हणून २०१८ मधे नाईलाजाने शेवटचे प्रकाशन केले.

१९८३ मध्ये, वाय झेड ट्रेकर्सशी त्यांची मैत्री झाली. मग सगळे मिळून जिद्दसाठी लेख गोळा करणे. सभासद तयार करणे, आदी कामे करू लागले. आर्थिक डोलारा सांभाळता यावा म्हणून अलिबाग येथे छपाईला सुरूवात झाली.

नोकरी, जिद्दचे प्रकाशन आणि गिर्यारोहण याची कसरत सुरू होती.

१९८६ मध्ये, अंदमान-निकोबार बेटांची सफर केली. बोटीने वेगवेगळ्या बेटांना भेटी देत, त्यांनी सर्वांना जाण्यासाठी अडचणीचे असलेले, भारताचे शेवटचे टोक म्हणून ओळख असलेले निकोबार बेटावरील इंदिरा पॉईट गाठले.

लिंगाणा या अवघड सुळकावजा किल्ल्यावर सहसा कोणी जात नसे. म्हणून हसत खेळत लिंगाणा सर करूया अशी साहस मध्ये जाहिरात देऊन, २६ जानेवारी १९८४ रोजी अनुभवी गिर्यारोहकांच्या मदतीने वाय झेड ट्रेकर्सच्या वतीने १०५ जणांना घेऊन त्यानी लिंगाणा प्रथमच सर केला.

गिर्यारोहण कारकिर्दीत त्यांनी बऱ्याच प्रस्तरारोहण मोहिमा केल्या. त्यात सर्वात कठीण मोहीम म्हणजे, वानरलिंगी उर्फ खडा पारशी. २० फेब्रुवारी १९८६ रोजी त्यांनी व ऋषीकेश यादव यांनी मिळून चढाईस सुरूवात केली. त्याच दिवशी संध्याकाळी शिखर सर करून, सुळक्याच्या मधल्या भागावर साधारण ८ इंच जागेत बसून रात्र काढली. तो रात्रीचा क्षण त्यांच्यासाठी थरारक होता. दुसऱ्या दिवशी इतरांना वर घेऊन, परत खाली उतरण्यास सुरूवात केली. मग दोर आवरत उतरताना संध्याकाळ झाली.

त्यानंतर प्रत्येक २६ जानेवारीला ते वेगवेगळ्या सुळक्यावर चढाई करू लागले. गणेश-कार्तिक सुळके, पहिने, वानरलिंगी व लिंगाणा दोन वेळा, नवरा(माहुली), कळकराय, हडबीची शेंडी, लुईझा (माथेरान), तेलबैला असे एकएक सुळके त्यांनी सर केले.

गिर्यारोहणाचे म्हणाल तर, कर्नाळा, इरशाळगड, प्रबळगड, रायगड, राजगड, तोरणा, राजमाची, लोहगड, विसापूर, भिमाशंकर, सिंहगड, वासोटा, माहुली, पेठ, हातगड, धोडप, माथेरान, जीवधन, चावंड, शिवनेरी, दुर्ग, ढाकोबा, गोरखग़ड, हरिश्चंद्रगड, प्रतापगड, सज्जनगड, तांदूळवाडी,  सुधागड, सरसगड, सागरगड, रेवदंडा, कोरलई, कुलाबा, खांदेरी, उंदेरी, जंजिरा, पद्मदुर्ग, देवगड, विजयदुर्ग, सिंधूदुर्ग, तेरेखोल आदी बऱ्याच ठिकाणी त्यांनी गडभ्रमंती केली आहे. यातील प्रतापगडावर तर पोलादपूर वरून सुरूवात करून जंगल, दऱ्यातून वाट काढत चढाई केली.

१९७९ मध्ये राम नलावडे सोबत रेवस ते मुरूड असे किनाऱ्यावरून पदभ्रमण केले. त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी पोहत खाड्या पार कराव्या लागल्या होत्या. नंतर मनोरी ते उत्तन अशी समुद्र किनाऱ्यालगत भ्रमंती केली.

अनेक वर्षे खांदेरी व उंदेरी या जलदुर्गांवर जातांना परवानगी व बोट अश्या अडचणींना सामना करायला लागायचा. मग नवगाव व थळ येथील नाखवांशी व दीपगृहे विभागाशी संवाद साधून हजारो गिर्यारोहकांना जलदुर्ग दर्शन घडविले.

निसर्ग भटकंती आणि नवनवीन ठिकाणे पाहाण्याची आवड असल्याने हिमालयात देखील त्यांनी मुसंडी मारली. चंद्रखानी पास, चार धाम, देवतिब्बा बेस, पिंडारी ग्लेशियर, संदक फू, नेपाळ मधील अन्नपूर्णा बेसकॅप आदि ठिकाणी त्यांनी पदभ्रमण केले. तर लडाखी १८,००० फूट व शितीधर १७,२०० ही शिखरे वाय झेड ट्रेकर्स सोबत, दोनदा सर केली. दुसऱ्या वेळेस १९९२ मध्ये अंध व मुकबधीर गिर्यारोहकांना सोबत केली.

१९८८च्या गिरीविहारच्या कांचनजुंगा शिखर मोहिमेत पोर्टर मार्फत त्यांचे सामान १८,००० फूटांवरील बेसकॅंपवर १४ दिवसांचे पदभ्रमण करत पोहोचविले. 

२०१८च्या जानेवारीत त्यांच्या हृदयाची एन्जोप्लास्टी झाली. पण एप्रिल पासून त्यांनी परत गिर्यारोहणास सुरूवात केली व मे महिन्यात दार्जिलिंग जवळील संदक फू शिखर गाठले.

एखाद्या मोहिमेची तयारी करण्याबाबत ते म्हणतात, ‘‘मोहिम करण्याचे निश्चित झाल्यावर, प्रथम ठिकाणाचे भौगोलीक स्थान, मोहिमेचा दर्जा, वातावरणाची अनुकुलता इत्यादी पाहून, मोहिमेतील मुख्य प्रशिक्षित आरोहकासह, मदतनीस व वैद्यकिय सहाय्यक निश्चित करावेत. रोज व्यायाम करावा. मनोबल वाढवावे, आवश्यक त्या परवानग्या मिळवाव्यात. वाहतूक व्यवस्था करावी. लागणाऱ्या साधनांची जमवा जमव करावी, प्रत्येक दिवसाच्या खाण्या-पिण्याची, मुक्कामाची व्यवस्था ठरवावी. कठिण प्रसंग आल्यास त्याला सामोरे कसे जायचे याचा आढावा घ्यावा. मोहिमेतील प्रत्येकाची मानसिकता व्यवस्थित आहे का याचा वारंवार अंदाज घ्यावा.’’

ते पुढे म्हणतात, ‘’गिर्यारोहण करताना तांत्रिक कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती सोबतच अनुभव महत्वाचा असतो. अनुभवामुळे आकस्मित येणाऱ्या प्रसंगाला तोड देणे शक्य होते. त्यामुळे एकदा एका सुळक्यावरून उतरताना, घाबरलेल्या सहभागीला व्यवस्थित दोराचा आधार देऊन त्याच्या पायाखालची माती साफ करत, पायऱ्या करत, त्याला खाली आणले होते’’.

ध्येय साध्य करण्याच्या प्रेरणेने दमक्षाक होऊनही त्यावर मात करत ते गिर्यारोहण करतात.

गोनिदांच्या 'जैत रे जैत' या कादंबरीचे कथानक पौर्णिमेच्या पार्श्वभुमीवर कर्नाळा किल्ल्याच्या परिसरावर गुंफले गेले आहे. श्रोत्यांना त्या प्रसंगाची अनुभुती व्हावी म्हणून पौर्णिमेचा मुहुर्त साधून कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी त्याचे अभिवाचन तीन वेळा त्यांनी ठेवले.

मंगळागौरीच्या निमित्ताने महिलांनी घराबाहेर पडून निसर्गात रमावे, तेथील पाने-फुले गोळा करून पूजा करावी, झोपाळ्यावर झुलावे व धबधब्याखाली नखशिखांत भिजावे, म्हणून श्रावणात 'निसर्ग मंगळागौरीचा' उपक्रम कर्नाळाच्या पायथ्याशी राबवला.

दोन वर्ष खारघर येथे 'अश्वारोहण प्रशिक्षणाचे' आयोजन, माथेरान व प्रबळगड-कलावंतीण येथे दुर्गमित्रच्या सहकार्याने 'झिप लाईन' या साहसी उपक्रमाचे आयोजन, युथहॉस्टेल, खारघरच्या वतीने माथेरान व खारघर हिल येथे पदभ्रमणाचे आयोजन, कर्जत व राजमाची येथे कँम्पिंगचे आयोजन, असे अनेक उपक्रम त्यांनी केले आहेत.

जागतिक तापमानवाढीचा शिखरांवर होणाऱ्या परिणामाचा विचार करून, या सर्व भ्रमंतीत अथवा वाटचालीत कोणत्याही ठिकाणी लाकडे जाळण्यास त्यांनी कायमच विरोध केला.

गिर्यारोहण जसजसे विस्तारत गेले तसे त्यात थोडे व्यावसायिकतेचे वारे वाहू लागले. सुरूवातीस यास विरोध दर्शविला पण पुढे गिर्यारोहणाला ते पूरक वाटू लागले. त्यामुळे या क्षेत्रात तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. नवीन कॅंपसाईट तयार झाल्या. रिसॉर्टवर साहसी खेळांचे सेट अप लागल्याने सर्वसाधारण जनतेला देखील साहस अनुभवण्याची संधी मिळाली. ट्रेक अथवा गडाचा इतिहास सांगणारे मार्गदर्शक, दोराच्या साहाय्याने करावयाच्या साहसी उपक्रमाचे आयोजक, इतिहास संकलक, लेखक, निसर्ग अभ्यासक तयार झाले. या सर्वांना मानधनाच्या स्वरूपात आर्थिक मदत होऊ लागली.

ते म्हणतात, गिर्यारोहाणाकडून मिळालेला मंत्र म्हणजे, ‘’एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.’’

'चालण्याची आवड, निसर्गात गेल्यावर मिळणारी उर्जा आणि इतिहासाचे संस्मरण' ही गिर्यारोहणाकडे वळण्याची कारणे, त्यांनी सांगितली.

गड किल्ल्यांच्या भटकंतीत बुरूजांवर, तटबंदीवर उगवलेली झाडे, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेली पाण्याची टाकं व इतर ऐतिहासिक वास्तू पाहून यांच्या संवर्धनासाठी गिर्यारोहकांनी एकत्रीत येवून प्रयत्न करायला हवेत या भावनेने, जानेवारी १९८६ मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन दुर्गमित्र या संस्थेची स्थापना केली. व मग पेठ, तिकोना व माहुली या गडांवर गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदान शिबीरे राबविली.

पुढे, गिर्यारोहकांनी एकत्र यावे, मोहिमांमध्ये एकमेकांना मदत करावी, एकत्रीत मोहिमा काढाव्या, अनुभवांचे आदान प्रदान व्हावे, गिर्यारोहण शिस्तबध्द व्हावे, यासाठी ९ जुलै १९९० साली अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची मुहुर्तमेढ रोवली.

स्पर्धा घेतली की स्फुरण येते व सहभाग वाढतो, म्हणून जिद्दच्या वाटचालीस २५ वर्ष झाल्याचे औचित्य साधून, नेरे, पनवेल पासून प्रबळगड-इरशाळगड करत गडाच्या पायथा पर्यंत 'एका दमात चालण्याची स्पर्धा,' 'निसर्गमित्र,' पनवेल यांच्या सहकार्याने घेतली.

त्यांनी कर्नाळा अभयारण्य, पनवेल येथे ६ जानेवारी २०१२ रोजी 'दुसऱ्या दुर्गसाहित्य संमेलनाचे' आयोजन केले. २०१४ला सी के टी कॉलेज, पनवेल येथे कोंकण इतिहास परिषदेच्या आयोजनात सहभागी झाले व त्यावेळी रायगड जिल्ह्यातील इतिहासाच्या पाऊलखुणा या पुस्तकाचे संपादन केले.

यंग झिंगारो ट्रेकर्स, दुर्गमित्र, निसर्ग मित्र, युथ हॉस्टेल आदी संस्थांशी ते सलग्न आहेत.

माहुली, राजगड, माथेरान व मनाली येथील परिसर त्यांचा आवडीचा आहे. अंध व मुक बधीर यांची, लडाखी व शितीधर हिमालयीन मोहिम ही लक्षणीय व संस्मरणीय आहे, असे ते म्हणतात.

गिर्यारोहण क्षेत्राच्या सुदृढ वाढीसाठी अनुभवांचे, ज्ञानाचे व साधनांचे आदान प्रदान झाले पाहिजे, असे त्यांना वाटते.

'मराठी पत्रकार परिषद' व 'श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ,' पनवेल, रायगड यांच्या विद्यमाने आयोजित रायगड, जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेत' 'जिद्द' दिवाळी अंकास २००५ मध्ये दुसरा क्रमांक, २००७ मध्ये प्रथम क्रमांक, २०१० मध्ये तृतीय क्रमांक व २०१४ मध्ये तृतीय क्रमांक मिळाला. साहित्य दरवळ मंच राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २००५ मध्ये सन्मान चिन्ह तर महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड आयोजित गिरीमित्र संमेलन २००६ च्या वतीने गिरीमित्र गिरिभ्रमण सन्मान पुरस्कार त्यांना मिळाला आहे. जनसेवा समिती, विलेपार्ले, मुंबई यांनी सन्मान पत्र देऊन गौरविले आहे. त्याचबरोबर निसर्ग मित्र (पनवेल), साद माउंटेनियर, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, शैलभ्रमर आदी संस्थांनी सन्मान चिन्हे देऊन त्यांना गौरविले आहे.

यंग झिंगारो ट्रेकर्स निर्मित, सांगाती सह्याद्रीचा या पुस्तकाच्या निर्मितीत देखील त्यांचा सहभाग होता.

साठाव्या वर्षात पदार्पण केलेल्या या गिर्यारोहकाची या क्षेत्रासाठी काहितरी करण्याची धडपड अजूनही सुरूच आहे.

* * *

24 comments:

  1. सुनील, तुझ्या पावलावर पाऊल ठेवोन, अनेक जण गिर्यारोहणाची वाट चालत आहेत. मीही त्यातील एक!

    ReplyDelete
  2. Very much inspirational.👌👍Salute to you Sir✌

    ReplyDelete
  3. अतिशय प्रेमळ, शांत स्वभाव, बोलण्यामध्ये विनम्रता पण तेवढाच जिद्दी माणूस. जिद्दी माणूसच जिद्द अंक सातत्याने काढू शकतो हे सुनीलने दाखवून दिले आहे. जिद्द मुळे गिर्यारोहणाचा प्रचार आणि प्रसार होण्यास मोलाचे हातभार लागलेला आहे. सुनील तुझे या महान कार्याला माझा दंडवत. पुढील सर्व कार्यासाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा.💐💐💐

    ReplyDelete
  4. गुरुवर्य आप्पा परब यांच्या मुळे सुनील ची 30 वर्षांपूर्वी ओळख झाली तेव्हापासून आतापर्यंत सुनिल मधील
    गिर्यारोहणाचा प्रचार आणि प्रसार करण्याची तळमळ पाहिली, नेहमी मैत्रीचा आणि मदतीचा हात पुढे करणारा मित्र म्हणजे सुनील राज, नावाप्रमाणे जिद्दीने एवढी वर्ष मासिक चालवणं ही खूप मोठी गोष्ट आहे.

    "लडाख प्रवास अजून सुरू आहे" हे मी लिहिलेले पुस्तकं, ज्याच्या आतापर्यंत चाल आवृत्त्या आल्या. पण माझ्यातल्या लेखकाला जागं करण्याच खूप मोठं काम सुनील ने केलं आहे.
    मुंबई लेह मुंबई या माझ्या थरारक मोहिमेचा व्रुत्तांत म्हणून मी लिहिलेली 14 पाने एकही शब्द एडिट न करता सुनीलने आपल्या जिद्द मासिकात छापून आणली आणि तिथूनच माझ्यातील लेखकाचा जन्म झाला, त्यामुळे हे सारं श्रेय सुनील ला जात. त्यासाठी मनापासून आभार
    सुनील तुझ्या या जिद्दीला माझा सलाम 🙏🙏🙏
    खुप खुप शुभेच्छा.💐💐💐

    ReplyDelete
  5. आपल्याजवळ असणारा संयम आपणास भ्रमंती करण्यास परावृत्त करीत आहे आपली भ्रमणयात्रा उत्तरोत्तर आशीच वाढत राहुन परदेशात भ्रमंती होवो ...गोड गोड शुभेच्छा ...

    ReplyDelete
  6. Speechless 🙏🙏 keep it up,God bless you

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. जिद्द या शब्दाला सार्थ कामगिरी करणाऱ्या जिद्दी सुनील ला सलाम.

    ReplyDelete
  9. सुनील तुझी जिद्द आणि giryarohan ची आवड याला सलाम

    ReplyDelete
  10. जिद्द म्हणजे सुनील राज आणि सुनील राज म्हणजे जिद्द, यापुढे मराठी शब्दकोशात हे दोन शब्द समानार्थी म्हणून वापरले जावेत.
    राजेश गाडगीळ

    ReplyDelete
  11. शांत, संयमी, विनम्र, प्रेमळ, मेहनती, जिद्दी आणि तत्सम सर्व विशेषणांचं मनुष्यरुप म्हणजे सुनील राज..
    गुरुवर्य अप्पा परब यांच्यामुळे कधी ओळख झाली, कधी जिद्द वाचू लागलो, हळूहळू त्यामधे कधी लिहूही लागलो ते कळलंच नाही.

    खूप छान आठवणी आहेत त्या सार्‍या.
    जिद्दचे सारे अंक आजही एखाद्या खजिन्यासारखेच जपून ठेवले आहेत मी.

    वैभव प्रभुदेसाई

    ReplyDelete
  12. गिर्यारोहण क्षेत्रातील लोकांना प्रसिध्दी देण्यासाठी व त्यांच्या तील लेखक तयार करण्याचे मोलाचं काम प्रसंगी झळ बसली तरीही करणारे श्री.सुनिल राज यांना त्रिवार मानाचा मुजरा...

    ReplyDelete
  13. "जिद्द " चे जिद्दी गिर्यारोहक श्री. सुनिल राज याचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ! 💐🙏👍
    महिबूब मुजावर

    ReplyDelete
  14. सुनिल राज, आपण जिद्द या शब्दाला एका नव्या ऊंचीवर नेऊन ठेवले आहेत. आपल्या या प्रयत्नांना, आम्हा सगळ्या चा सलाम-अजित कुशे.

    ReplyDelete
  15. आमच्या मामा कडे जिद्द चा अंक पहिला आणि भटकंतीला सुरुवात झाली...आत्ता पर्यंत जे हिंडलो भटकलो त्याला कारणीभूत जिद्द आणि सुनील राज...त्याच्या बरोबर खांदेरी जलदुर्गची भटकंती केली...पुढे त्यावर दर्याभवानी हे नाटक केलं...सुनील आणि जिद्द ला सलाम नमस्ते....
    संदीप विचारे...������������

    ReplyDelete
  16. Very Inspiring.Brought back old memories. Kudos Raka. Keep up the good work.

    ReplyDelete
  17. Very much inspiring.. Keep it up 👍

    ReplyDelete
  18. सुनील तुझे मनःपूर्वक अभिनंदन����
    जिद्द हे मासिक अतिशय कठीण परिस्थितीत ही सातत्यपूर्णपणे चालू ठेवण्याच्या महान कार्यास तोड नाही.����
    मला 1985 च्या सुमारास बॉयलर सूट घालून ट्रेक करणारा सुनील आठवला��

    ReplyDelete
  19. सुनील तुझे मनःपूर्वक अभिनंदन����
    जिद्द हे मासिक अतिशय कठीण परिस्थितीत ही सातत्यपूर्णपणे चालू ठेवण्याच्या महान कार्यास तोड नाही.����
    मला 1983 च्या सुमारास बॉयलर सूट घालून ट्रेक करणारा सुनील आठवला��

    किरण देशमुख

    ReplyDelete
  20. सुनिल राज सर आणि माझी ओळख नव्हती. परंतु शिवदुर्ग मित्र लोणावळा घ्या माध्यमातून आम्ही उंबरखिंड येथे भव्य विजय स्तंभ उभा केला . त्याची मुंबई व महाराष्ट्रात पहिली नोंद जिद्द ने घेतली व त्यासंबंधी लेख मासिकांमध्ये प्रसिद्ध केला.
    धन्यवाद सुनिल राज सर

    सुनिल गायकवाड , शिवदुर्ग मित्र लोणावळा 9822500884

    ReplyDelete
  21. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  22. 🙏

    Vishwesh Mahajan - Nisarg Mitra,Panvel

    ReplyDelete
  23. आनंद पाळंदे....
    गिरिमित्रांना सहज, सुलभ प्रसिद्धी देण्यासाठी उत्सुक असा गिरिमित्र सुनील राज. जिद्द सारखे मासिक सातत्याने छापणे सोपी गोष्ट नव्हती.

    ReplyDelete