लहानपणापासूनच धीटपणा त्यांच्या अंगी बाणवला आहे त्यामुळे
गिर्यारोहण क्षेत्रात शिरल्यानंतर त्या गोष्टीचा त्यांना फार फायदा झाला. कारण
गिर्यारोहण क्षेत्रात अंगी साहस असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, म्हणूनच त्यांनी या क्षेत्रात साहसी प्रात्यक्षिके खूप केली आहेत; असे करताना त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रात
व्यावसायिकता कधीच आणली नाही. तसेच लहानपणापासून गरिबी अत्यंत जवळून पाहिल्यामुळे
त्यांचे मन फार हळवे आहे. स्वभाव हसरा, खेळकर असल्याने लहानामोठ्यांत ते सहज रमून जातात. कोणालाही मदत करायला
आपपरभाव न बाळगता नेहमीच ते तत्पर असतात. या गुणांमुळे त्यांचा मित्र परिवार खूप
दांडगा आहे. जोडलेली नाती कशी जोपासावी हे त्यांच्याकडूनच शिकावे. गिर्यारोहण
क्षेत्रात आपल्याबरोबरच इतर सहकाऱ्यांनासुद्धा आनंद कसा मिळेल याची ते नेहमीच
दक्षता घेत असत. त्यामुळे त्यांच्या हाताखाली शास्त्रोक्त मार्गदर्शनाने तयार झालेला
शिष्यगणही खूप मोठा आहे. त्यांची विचारसरणी नेहमीच उच्च राहिली आहे पण राहणी मात्र
खूप साधी आहे. सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमात हिरीरीने पुढाकार घ्यायला त्यांना
फार आवडते. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगावा हा त्यांचा मंत्र आहे.
भटकंती मोटार सायकलवरून असो की कारने असो किंवा पायी असो, त्यांचा आवडता छंद त्यांनी तो आयुष्याच्या पंचाहत्तरीत
सुद्धा जपला आहे. त्यांना निसर्गाची खूप आवड आहे. रत्नाकर म्हणजे सागर, नावाच्या अर्थाप्रमाणेच त्यांच्या अंगी अनेक
कलागुण दडलेले आहेत. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे
रत्नाकर कपिलेश्वर यांनी १९७८ साली वयाच्या 3२ व्या वर्षी गिर्यारोहणाची सुरुवात केली. निसर्गाच्या सान्निध्यात राहून लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकता येतील त्या ते शिकत गेले. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे स्फूर्तिस्थान असल्यामुळे, त्यांचे किल्ले जवळून पाहण्याची त्यांची प्रबळ इच्छा सह्याद्रीकडे आकर्षित होण्याचे मुख्य कारण आहे. त्या काळी काही मोजक्याच संस्था गिर्यारोहण क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यात हॉलिडे हायकर्स ही एक नामवंत संस्था. या संस्थेबरोबर राजमाची ही त्यांची पहिली सह्याद्री मोहीम. याच संस्थेने आखलेल्या लिंगाणा सुळका वजा किल्ला चढाईत त्यांनी प्रथम सहभाग घेतला. नंतर लिंगाणा, भवानी कडा, हिरकणी बुरूज चढाई या तिहेरी मोहिमेत त्यांनी भाग घेतला. नंतरच्या काळात जवळ जवळ संपूर्ण सह्याद्री त्यांनी पालथा घातला. लिंगाणा तर पाच वेळा सर केला; अजूनही आजच्या वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ६व्यांदा लिंगाणा सर करण्याची त्यांच्या मनाची तयारी आहे. हिरा पंडित व दिलीप झुंजारराव हे त्यांचे आवडते गिर्यारोहक तर चंदेरी, म्हैसमळ व रायगड हे आवडते गड आहेत. शिवथर घळीचा परिसर त्यांना फार आवडतो.
विलेपार्ले मधील हॉलिडे हायकर्स, युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या दादर व अंबरनाथ शाखा, धूमकेतू ट्रेकर्स व महाराष्ट्र ट्रेकर्स
इत्यादी संस्थांमधून त्यांच्या गिर्यारोहणाचा प्रवास झाला. दादर युथ हॉस्टेल, समर्थ युनिटची त्यांनी स्थापना केली. तसेच अंबरनाथ युथ
होस्टेलला पडत्या काळात चांगलाच मदतीचा हात देऊन सावरले. युथ होस्टेलच्या
माध्यमातून त्यांनी हिमालयात बरीच भटकंती केली. जगातील अत्युच्य शिखर माउंट
एव्हरेस्ट जवळून पाहण्याच्या प्रबळ इच्छेमुळे त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प
मोहिमेचे स्वतः आयोजन करून ती यशस्वी केली. त्यामुळे एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम
ही त्यांची हिमालयातील सर्वात आवडती मोहीम झाली. त्याच बरोबर परदेशी
पाहुण्यांना घेऊन गंगोत्री तपोवनची मोहीम देखील त्यांनी यशस्वी केली.
गिर्यारोहणाकडून त्यांना मिळालेला मंत्र म्हणजे, ‘जीवनात जे काही कराल, ते योग्य ती सुरक्षेची काळजी घेऊनच करा.’ ‘गिर्यारोहण हा एक अतिशय चांगला छंद आहे. पण सुरक्षेची योग्य ती काळजी ही घ्यायलाच पाहिजे. कारण जे साहस तुम्ही करणार आहात त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही जिवंत तर असले पाहिजे.’ ते पुढे म्हणतात एकेकाळी गिर्यारोहण हे संस्थांमार्फतच केले जायचे. परंतु एखादी मोहीम झाली की फाजील आत्मविश्वासाने मोहीम काढणे, अर्धवट ज्ञानाने शिबिरांचे आयोजन करणे सुरु झाले व अपघातांचे प्रमाण वाढले. गिर्यारोहणातील या व्यावसायिक पणामुळे गिर्यारोहण क्षेत्र बदनाम झाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गिर्यारोहणाचे योग्य त्या संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन व सुरक्षिततेच्या बाबतीत योग्य ती काळजी घेऊन एखादा अनुभवी गिर्यारोहक इतरांसाठी साहसी पर्यटन करू शकतो किंवा शिबिरांचे आयोजन करू शकतो. अशा रितीने व्यावसायिक गिर्यारोहण हे अर्थार्जनासाठीही उपयोगी ठरू शकते.
एखाद्या मोहिमेच्या तयारीच्या संबंधात ते पुढे म्हणतात, 'सश्याच्या शिकारीला जाताना वाघाच्या शिकारीची तयारी करा’ असे पूर्वी म्हणत, कारण जर तुम्ही एखाद्या मोहिमेवर जाणार असाल तर त्यात कोणत्या अडचणींना तुम्हाला तोंड द्यावे लागेल हे आधी सांगू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण मोहीम मनाने करून त्यात कोणत्या अडचणी येऊ शकतील याचा अभ्यास करून त्यातून मार्ग कसा काढावा व त्यासाठी काय तयारी करावी, कोणत्या वस्तूंची गरज लागेल हे सर्व विचार करून मोहिमेची तयारी करावी.
त्यांच्या म्हणण्यानुसार गिर्यारोहण करताना तांत्रिक कौशल्य तर हवेच कारण गिर्यारोहणात आपण वापरणार असलेल्या सर्व साधनांचा वापर कसा करावा, कोणत्या वेळी कोणती साधने वापरावीत, तसेच त्यांची क्षमता काय आहे याचे पुरेपूर ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण काहीवेळा गिर्यारोहणात येणाऱ्या अडचणी या अनपेक्षितपणे तुमच्या समोर उभ्या राहतात. त्यावेळी तुम्हाला ताबडतोब प्रसंगावधान राखून निर्णय घ्यावयाचा असतो. कारण यात क्षणाचाही विलंब जीवघेणा ठरू शकतो. तसेच तुमची शारीरिक तंदुरुस्तीपण जबरदस्त हवी. कारण त्या मोहिमेत तुम्हाला अनपेक्षितपणे किती वेळ लागेल हे तुम्ही निश्चित ठरवू शकत नाही. कारण वातावरणातील बदल, येणाऱ्या अडचणी, या सर्वांवर मात करायची असते. त्यामुळे शारिरिक तंदुरुस्तीबरोबर मनोबल व एकाग्रताही चांगली असावी लागते. तसेच शिखरांवर चढाई करताना आपल्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांबद्दलचा आत्मविश्वास, एकमेकांशी असलेला समन्वय हा अतिशय महत्वाचा ठरतो. तसेच मोहिमेसाठी मिळालेल्या शुभेच्छांची आठवण पण प्रेरणादायी ठरू शकते. पण तुमच्यात जर एखादा न्यूनगंड असेल, साशंकता असेल तर मोहिमेत सहभागी होऊ नये, या मताचे ते आहेत. तशी त्यांनी स्वतः देखील काळजी घेतलेली आहे.
त्यांच्या अनुभवानुसार गिर्यारोहण करताना वर सांगितल्याप्रमाणे सुरक्षेची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. कारण त्यांच्या गिर्यारोहणाच्या आयुष्यात मित्रांच्या झालेल्या क्षुल्लक चुकांमुळे, तीन अपघाती मृत्यू झाले आहेत आणि त्यांच्या स्मृती शिळा त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने बसविल्या आहेत. त्यामुळे गिर्यारोहणातील एक चूक ही तुमच्या आयुष्यातील शेवटची चूक ठरू शकते. म्हणून त्यांच्या शिबिरांमध्ये मुलांना शिकवताना, मुले काय चुका करतील हे ते पहिल्यांदा समजावून सांगत असतात. गिर्यारोहणात सुरक्षा ही अत्यंत महत्वाची असते.
१९७० साला पर्यंत महाराष्ट्रात, ‘साहसी गिर्यारोहण’ हे प्राथमिक अवस्थेत होते. त्यावेळी गिर्यारोहणाची साधनेसुद्धा उपलब्ध नव्हती. अश्यावेळी गिर्यारोहण व भ्रमंती करत असताना त्यांना तावलीला जाण्याचा योग आला. तेथे बाजूला असलेला सुळका व त्यामधील दरी पाहून सहज त्यांच्या मनात आले जर आपण दरीत न उतरता वरच्यावर दोरीला लटकून पलीकडच्या सुळक्यावर जाऊ शकलो तर? दोराच्या सहाय्याने व्हॅली क्रॉसिंग करू शकलो तर? हा साहसी विचार मनात यायचे कारण, अश्या प्रकारे गिर्यारोहण क्षेत्रात व्हॅली क्रॉसिंग हा साहसी प्रकार अजूनतरी कोणी केलेला त्यांच्या ऐकिवात नव्हता किंवा वाचनात पण आलेला नव्हता. मग विचार चक्र सुरु झाले. कशा प्रकारे आपण हे करू शकतो याचा अभ्यास त्यांनी केला. तेव्हा लक्षात आले की दोरावरून सुरळीत जाण्यासाठी आपण जर एक पुली बनवली आणि तिच्या सहाय्याने जर दोरावरून गेलो तर सोपे जाईल. त्यावेळी त्यांचे इंजिनीअरिं वर्कशॉप होते. लगेच डिझाईन करून त्यांनी पुली बनवायला घेतली. पुली तयार झाली. पण वजन होते जवळजवळ २ किलो. स्टीलचा जाड पत्रा वापरून व्हॅली क्रॉसिंगची लोखंडी पुली तयार झाली होती. त्यानंतर हॉलिडे हायकर्सकडून एक तावली मोहीम आखून तेथे गिर्यारोहण क्षेत्रातील पहिलेवहिले चित्तथरारक व्हॅली क्रॉसिंग पार पाडले, साल होते १९७९. अशारितीने गिर्यारोहण क्षेत्रात पुलीच्या सहाय्याने व्हॅली क्रॉसिंग हा साहसी प्रकार त्यानंतर सुरु झाला.
नवयुवकांची तसेच शालेय मुलामुलींची शिबिरे घेऊन त्यांना योग्य ते प्रशिक्षण
देऊन गिर्यारोहणाबद्दलची आवड त्यांनी निर्माण केली आहे. जनमानसातील
गिर्यारोहणाबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी व आवड निर्माण करण्यासाठी मुंबईत तसेच
मुंबई बाहेर अनेक शाळांमध्ये व सोसायट्यांमध्ये साहसी गिर्यारोहणाची प्रात्यक्षिके
सादर केली आहेत. या मध्ये शालेय मुलामुलीं कडून १३ मजली उंच इमारतीवरून साहसी
प्रात्यक्षिके व व्हॅली क्रॉसिंगच्या रोपवरील 'योगासने’ करून घेतली आहेत.
अशाप्रकारे शिबिरांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळ जवळ २० हजारांवर मुलामुलींना
त्यांनी प्रशिक्षित केले आहे. गिर्यारोहणाच्या प्रसारासाठी त्यांनी मुलांसाठी सुरत,
नासिक व नांदगाव येथेही गिर्यारोहण शिबिरांचे
आयोजन केले आहे.
व्हॅली क्रॉसिंग प्रकारात त्यांचा चांगलाच हातखंडा आहे. असेच एकदा धूमकेतूचे
सभासद त्यांच्या शिबिराच्या ठिकाणी आले होते. त्यांनी व्हॅली क्रॉसिंगचा रोप
पाहिला, तेंव्हा कपिलेश्वरांनी
त्यांना रोपवरच्या साहसाच्या गोष्टी सांगितल्या. तेंव्हा बोलता बोलता सहज लग्नाचा
विषय आला. त्यावर ते म्हणाले, ‘हो आपण
लग्नसुद्धा रोपवर लावू शकतो आणि त्यासाठी त्यांच्या नजरेत एक ठिकाण सुद्धा आहे’. धूमकेतू संस्थेतील आशीर्वाद आणि भारती यांचे लग्न ठरले
होते. ते म्हणाले, बघ आशीर्वाद तुझी
तयारी असेल तर आपण व्हॅली क्रॉसिंगच्या रोपवर तुमचे लग्न लावू शकतो. त्यावर
आशीर्वाद आणि भारती या लग्नासाठी लगेच तयार झाले. व्हॅली क्रॉसिंगच्या रोप वरील
लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला ६ फेब्रुवारी २००५. त्यानंतर खरोखरच्या लग्नाची
जय्यत तयारी करण्यात आली. आदल्या दिवशी ड्युक्स नोज येथे जाऊन रोप बांधून सर्व
तयारी करण्यात आली. नवऱ्यासाठी एक रोप, नवरीसाठी एक रोप, भटजीसाठी एक रोप,
करवल्यासाठी एक रोप व सर्वात वर सगळ्यांना बिले
देण्यासाठी एक रोप अशी जय्यत तयारी करण्यात आली. हे सर्व पाहून बरोबर आलेल्या
भटजीची तर बोबडीच वळली कारण त्याला हे सर्व नवीन होते म्हणून त्याची भीती
जाण्यासाठी त्याला अर्धा तास दरीत लटकवून ठेवण्यात आले. लग्नाचा मुहूर्त जवळ
आल्यावर ठरल्याप्रमाणे भटजीला दोरावरून लटकवून दरीत पाठविण्यात आले. त्यानंतर नवरा
मुलगा आशीर्वाद एका दोरावरून आला. समोरच्या बाजूने नवरी मुलगी भारती दुसऱ्या रोपवरून
दरीत आली. तिच्या मागोमाग करवला अंतरपाट व हार घेऊन आला. अंतरपाट दोघांच्यामध्ये
धरल्यानंतर भटजींनी मेगाफोनवरून मंगलाष्टके म्हणण्यास सुरुवात केली आणि मुहूर्ताला
शुभमंगल सावधान असे म्हणताच, अंतरपाट दूर होऊन
नवरानवरीने एकमेकांना हार घातले, त्याचवेळी
आकाशातून चक्क पुष्पवृष्टी झाली. तो क्षण खरोखरच हजारो लोकांच्या साक्षीने झालेला
गिर्यारोहण क्षेत्रातील एक अविस्मरणीय आणि साहसी लग्नाचा पहिलावहिला कार्यक्रम
ठरला आणि याचा मान धूमकेतू ट्रेकर्सना मिळाला.
त्यांच्या गिर्यारोहण कारकिर्दीत काही कठीण व अविस्मरणीय
प्रसंग आलेले आहेत. त्यावेळी प्रसंगावधान राखून व योग्य तो निर्णय घेऊन त्यांनी
त्यावर मात केलेली आहे. एकदा ते जानेवारी २०११ मध्ये महाराष्ट्र ट्रेकर्सच्या
मुलांना घेऊन ड्युक्स नोज रॅपलिंग साठी गेले होते. त्यांचा कॅम्प संपवून परत
निघायच्या वेळी पुण्याच्या एका गटामधील गिर्यारोहकाचा अपघात झाला. योग्य ती
सुरक्षा न घेतल्यामुळे तो दरीत पडला होता. त्यामुळे ते सर्वजण घाबरून गेले होते.
त्यांनी त्यांच्याकडे मदत मागितली. ते पुढे म्हणतात, ‘’आम्ही ताबडतोब आमचे साहित्य घेऊन तिकडे धावलो.
प्रथम एकूण परिस्थितीचा अंदाज घेतला की, कश्या प्रकारे दरीतून त्याला वर काढू शकतो. कारण ज्याचा अपघाती मृत्यू झाला
होता तो अंगाने बराच जाड होता. त्यामुळे ते वजनदार शरीर दरीतून वर काढणे अवघड काम
होते. काय करावे लागेल याचा अंदाज घेऊन ते ताबडतोब कामाला लागले. दरीच्या दोन्ही
बाजूना व्हॅली क्रॉसिंगचा रोप लावला. सेंटर रॅपलिंग पद्धतीने ती बॉडी दरीतून अलगद
वर उचलायची असे ठरविले. सहकाऱ्यांना पटापट योग्य त्या सूचना देऊन दोराचे प्लॅनिंग
केले. दोघांना ते शरीर चादरीत गुंडाळण्यासाठी दरीत उतरविले. सेंटर रॅपलिंग
पद्धतीने मृत व्यक्तिला वर काढून त्या गटाकडे सोपवले.
त्यांच्या मते त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे गिर्यारोहण क्षेत्रातील बिले या तंत्राचा उपयोग करून त्यांनी राबविलेली “सुरक्षा कवच” ही संकल्पना. दहीहंडीच्या खेळात, मानवी मनोरे रचताना थर कोसळून होणाऱ्या अपघातात बालगोविंदा जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, असे अपघात कमी करून त्यांना पूर्णपणे संरक्षण देण्याची संकल्पना त्यांनी २०११ साली अंमलात आणली आणि या संकल्पनेचे गोविंदांना ‘सुरक्षा कवच’ असे नामकरण केले. त्यानंतर सर्व गिर्यारोहकांना जाहीर आवाहन करून आपापल्या विभागात अश्या प्रकारे दहीहंडी पथकांना ‘सुरक्षा कवच’ पुरविण्याची विनंती केली. गिर्यारोहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळून आज संपूर्ण महाराष्ट्रात ही संकल्पना राबविली जात आहे. या संकल्पनेचा प्रयोग सर्वात प्रथम त्यांनी २००७ साली त्यांची मुलगी नीलांबरीच्या मदतीने लोअर परळ येथे ‘बंडया मारूती दहीहंडी पथका’बरोबर राबविला होता. तसेच नीलांबरीकडून रायलिंग - लिंगाणा व्हॅली क्रॉसिंगच्यावेळी २५०० फूट खोल दरीमध्ये रोपवर लटकून योगासनेपण करून घेतली होती.
दहीहंडीतील सुरक्षाकवचा बद्दल त्यांचा बऱ्याच ठिकाणी मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच अडचणीच्या काळात अंबरनाथ युथ होस्टेलला नव्याने उभारी दिल्याबद्दल त्यांच्याकडूनही मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलेला आहे. कित्येक शाळांमधून व सोसायट्यांमधून साहसी गिर्यारोहणाच्या प्रात्यक्षिकांबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
जागतिक तपमानवाढीचा शिखरांवर होणाऱ्या परिणामांबाबत ते म्हणतात, “पृथ्वीवरील तापमानवाढ म्हणजे भूपृष्ठावर होणारी तापमानातील वाढ होय. ही वाढ औद्योगिक उत्सर्जन आणि इंधन ज्वलन यासारख्या असंख्य मानवी क्रिया मुळे होते. त्याच प्रमाणे प्रदूषण हा ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यामागील महत्त्वाचा घटक आहे. जंगलात अचानक लागणारी आग हा त्याचाच परिणाम आहे आणि त्यामुळे प्राणी व त्यांच्या काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत. ज्या प्रदेशात पाऊस भरपूर होता, तिथे कमी पाऊस पडतो त्यामुळे अत्यंत दुष्काळाच्या घटना घडल्या आहेत. सर्वत्र बेसुमार जंगलतोड चालू आहे. खरंतर झाडे नैसर्गिक एअर फिल्टर आहेत आणि हवा स्वच्छ करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. झाडांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याची आणि ऑक्सिजन उत्सर्जन करण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते. म्हणून जंगलतोड थांबवून जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली पाहिजे". त्यासाठी ते स्वतः ट्रेकिंगला जातेवेळी वाळवलेल्या बिया बरोबर घेऊन जातात व ज्या ठिकाणी पाणथळ जमीन असेल तेथे टाकतात. तसेच जंगलात भटकंती करत असताना वाटेत पडलेले प्लास्टिक गोळा करून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावतात. ते पनवेलजवळ एका आदिवासी आश्रमाशी संलग्न असून तेथील आजूबाजूच्या प्रदेशात त्यांनी बरीच वृक्ष लागवड केली आहे.
या क्षेत्रात येणाऱ्या नवीन गिर्यारोहकांना संदेश देताना ते म्हणतात, "सुरक्षेचे व गिर्यारोहण तंत्राचे योग्य ते प्रशिक्षण घेऊन, निसर्गाच्या सान्निध्यात काय करावे व काय करू नये याची माहिती करून घेऊन, आपल्या गड किल्ल्यांचे सौदर्य कसे जपता येईल याचा अभ्यास करून, तसेच निसर्गात जाताना निसर्गाची हानी न करता संपर्कात येणाऱ्या स्थानिक लोकांशी कसे वागावे, त्यांची संस्कृती कशी जपावी याची जाणीव ठेऊन गिर्यारोहण केल्यास त्याचा खऱ्या अर्थाने निर्भेळ आनंद लुटता येईल.”.
Incredible personality and incredible work👏🏿👏🏿👏🏿👏🏿👏🏿👏🏿👏🏿
ReplyDeleteसुनील मित्रा रत्नाकर सर यांची खूप सुंदर माहिती तू दिलीस। आजच्या नव्या पिढीला त्यांच्या या महान कार्याची ओळख झाली।तुला खूप खूप धन्यवाद।
ReplyDeleteसुनील,अप्रतिम लेखन आणि एका सर्वोत्तम गिर्यारोहकाचा परिचय
ReplyDeleteसुंदर लेखनशैली आणी गिर्यारोहणा चा सर्वोत्तम अनुभव , खुप छान शब्दात मांडला आहे
ReplyDeleteVery inspiring..Salute to you👌👌💐💐💐👏👏👏👍
ReplyDeleteGreat...keep it uo
ReplyDeleteWah!! Hats off to u Kaka👏💐💐
ReplyDeleteSunil sir its really awesome,
ReplyDelete