Thursday, November 17, 2022

उदय कोळवणकर


१९७५ साली १७ वर्षांचा असताना, दादर मधील रुईया व रुपारेल कॉलेजेस मध्ये पावसाळी भ्रमंतीचा उपक्रम चालू होता. सतिश जाधव याच्यामुळे त्यांच्या संपर्कात आलो व सह्याद्रितील भ्रमंतीला माझी सुरूवात झाली. नंतर मालाडच्या 'नेचर लवर्स' संस्थेबरोबर पदभ्रमण, वन्यजीव अवलोकन मोहिमा सुरू झाल्या. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमधून फिरता फिरता सूळके साद घालू लागले.

क्लायंबर क्लबने आयोजित केलेली प्रस्तरोहणाची प्रशिक्षणे घेतली.

त्यावेळी श्री हिरा पंडीत यांनी रायगडाच्या टकमक कड्यावर चढाई केली होती. त्यातून प्रेरणा घेऊन, दिलीप झुंजाररावच्या मार्गदर्शनाखाली शहापूर जवळील नवरा सुळक्यावर प्रसतरारोहण केले. १९८३ साली केलेली ही पहिली चढाई होती. नंतर नवरी’, ‘लूज बोल्डर’, अशा अनेक मोहिमा चालू असताना हिमालयाचे वेध लागले.

उत्तरकाशीच्या, नेहरू इंन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मध्ये हिमालयातील गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले.

१९८५ मध्ये प्रजापती बोधणे यांच्या नेतृत्वाखाली, ‘हॉलीडे हायकर्स या संस्थे मार्फत, माना शिखरावरील मोहिमेत भाग घेतला. त्यानंतर, गिरीविहार संस्थेमार्फत १९८७ मध्ये फाबरांग व १९८८ मध्ये कांचनजुंगा शिखरावरील मोहीमेत भाग घेतला.

फाबरांग मोहीमेत खूप छान अनुभव मिळाला. संजय बोरोले, चारूहास जोशी, अनिल कुमार यांच्याकडून खूप शिकता आले. ती मोहीम हा माझ्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे.

१९८८ साली, ‘कांचनजुंगा मोहीमेच्या तयारीत खूप शिकायला मिळाले. शिखर चढाईची संधी मिळाली. सर्वात उंच जाता आले. २७,५०० फूट उंचीपर्यंत कृत्रिम प्राणवायूशिवाय जाण्याचा नागरी गिर्यारोहकाचा विक्रम झाला. आयुष्याला वेगळे वळण मिळाले.

त्यानंतर गंगोत्री, हनुमान तिब्बा, देव तिब्बा अशा काही हिमालयीन मोहीमांचे नेतृत्व केले.

१९८८ च्या दरम्यान अतिउंचीवर लागणारी उत्कृष्ट प्रतीची साधन सामुग्री भारतात उपलब्ध नव्हती. ती परदेशातून आयात करावी लागली. बरेच पैसेही खर्चही झाले. 'यंग झिंगारो ट्रेकर्स' संस्थेने ती साधनसामुग्री व अन्नधान्य व्यवस्थित बांधून दिले. त्यामूळे संपूर्ण मोहीमेत कधीच अडचण आली नाही.

परदेशातून आयात केलेल्या या साधनांचा अमूल्य ठेवा, आम्ही अतिउंचीपासून मुंबईपर्यंत सांभाळून आणला व कांचनजुंगा माउंटेनिआरिंग फाउंडेशन मार्फत जवळ जवळ २५ वर्षे निगराणी करून सांभाळला. ही उच्च दर्जाची साधने जवळ जवळ ४०० मोहिमांना वापरता आली. या योगदानाचा अभिमान वाटतो.

उत्तरकाशी भागात झालेल्या भूकंपाच्या वेळी माननीय उषा भिडे यांच्या नेत्रुत्वाखाली प्रत्यक्ष गावागावात जाऊन मदतकार्य करता आले.

मा. शाबीरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट मोहीमेच्या सन्मानासाठी मिरवणूकीचे आयोजन केले व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या स्थापनेसाठी लोहगडावर झालेल्या सम्मेलनाच्या आयोजनात सहभाग होतो. पुढे महासंघाची घटना लिहीण्यास मदत केली.

'यंग झिंगारो' या संस्थेमुळे अंधमित्रांच्या संपर्कात आलो. सह्याद्रितील गड-किल्यांवर नेता नेता, अंधमित्रांच्या जगातील पहिल्या हिमालयीन गिर्यारोहण मोहीमेत सामील होऊन चढाईचे नेतृत्व करायला मिळाले.

मी नोकरी करत असलेल्या टाटा पॉवर कंपनी मध्येही गिर्यारोहण संबधित काही उपक्रम सुरू केले. नाट्यविभागातही सहभाग होता. त्यात राज्यपातळीवर सन्मान मिळाले.

१९९८ सालच्या पहिल्या भारतीय नागरी, यशस्वी एव्हरेस्ट मोहीमेचा उपनेता म्हणून नेता ऋषिकेश यादव याच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. 

गिर्यारोहणाच्या अनुभवाचा काहीजण व्यवसाय म्हणून वापर करू लागले आहेत. आपल्या कौशल्याचा, ज्ञानाचा, अनुभवाचा वापर अर्थाजनासाठी करणे यात काहीच गैर नाही. मलाही अशी संधी मिळाली आहे. नवोदितांच्या सुरक्षेची काळजी मात्र पुरेपूर घेतली पाहिजे. अजिबात हयगय नको. अधिक नफ्यासाठी सुरक्षा बाजूला ठेऊन चालणार नाही. गिर्यारोहणात व्यवसायाच्या खूप संधी आहेत. आमच्या कांचनजुंगा मोहीमेतील काही सदस्य, मोहीमेनंतर या व्यवसायात उतरले आहेत व यशस्वी झाले आहेत. मात्र संयम व तारतम्य हवे.

 

माझ्यासाठी व सर्व गिर्यारोहकांसाठी संयम व तारतम्य हाच तर गिर्यारोहणातून मिळालेला मंत्र आहे. एखाद्या मोहीमेची तयारी शारीरिक व मानसिक कस पहाते. अनुभव तर कामी येतोच, पण नवीन तंत्र, कल्पना यांची पण जोड लागतेच. सतत अद्यावत असावे लागते. आज तंत्र, साधन सामुग्री आधुनीक झाली आहे. पण एव्हरेस्ट सारख्या सुरवातीच्या मोहिमा, त्या काळचे तंत्रज्ञान व साधने वापरून कशा झाल्या असतील, या विचारानेच मती गुंग होते. आणि हाच विचार अडचणींवर मात करायला प्रेरित करतो.

कुठच्याही मोहीमेत शेर्पा, हमाल, स्वयंपाकी, मदतनीस ह्या सगळ्यांचे एकच कुटुंब व्हायला पाहिजे. काही मोहीमांतील चूकां मधून हे शिकलो. हे शिकणे पुढे १९९८ च्या एव्हरेस्ट मोहिमेत कामी आले.

याच मोहिमेत, प्रथम शिखर चढाई करणारा सुरेंद्र चव्हाण पाचव्या तळावर असताना हवामान बिघडले. भारतीय हवामान खात्याशी आम्ही संपर्कात होतोच. त्यांच्या कडून हवामान लवकरच निवळण्याची शक्यता आहे हे कळले. इतर अनेक देशांचे चढाईवीर घाबरून तिथूनच खाली आले. पण वैयक्तिक अनुभवानुसार, सुरेंद्रला एक दिवस तिथेच थांबण्याचा सल्ला दिला व त्यापुढील दोन दिवसात सुरेंद्र शिखरावर पोहोचला. मोहिम यशस्वी झाली. हा विजय कांचनजुंगा मोहीमेच्या अनुभवा मुळेच शक्य झाला.

निसर्गाची आवड म्हणून पायी भ्रमंती, त्यातून गडकोट अनुभवणे, पूढे प्रस्तरारोहण, दुर्गम सुळके, मोठ्या पदभ्रमण मोहिमा, हिमालयात पदभ्रमण, शिखर चढाई मोहीमा, नवोदितांना मार्गदर्शन, मुलांसाठी सर्वांगिण विकास करणारी शिबिरे, हिमालयात गिर्यारोहण मोहिमा, मृत्यू जवळून पहाणे, राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार आणि गिरीमित्र सम्मेलनात 'गिरीमित्र' पुरस्कार, हा सगळा प्रवास रोमांचकारी आणि अविस्मरणीय आहे.

मित्रमंडळी, कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. नेचर लव्हर्स, हॉलिडे हायकर्स, क्लायंबर क्लब, एक्स्पोरर्स एन्ड अँडव्हेंचर्स, गिरीविहार, के.एम.एफ., टाटा पॉवर अँडव्हेचर विंग, या सर्वांनी हे शिल्प साकार कले. मध्यंतरी काही महिने जिद्दच्या संपादनात देखील मदत करता आली.

निवृत्त होता होता नैसर्गिक शेती सुरू केली. सायकलिंगचा आनंद घेत आहे.

या प्रवासातला १९७५ सालचा पहिला ट्रेक ढाक बहिरी गुहा व १९८७ सालचे फाबरँग शिखर मोहिम अविस्मरणीय आहेत.

सर्व गिर्यारोहकांनी मिळून मिसळून पुढे जाणे व सुरक्षेची पूर्ण काळजी घेणे, हे गिर्यारोहणाच्या सुदृढ प्रगतीसाठी आवश्यक आहे. असे झाले तर, या क्षेत्रात वावरल्याचा आनंद द्विगुणीत होईल.

वयाने लवकर गिर्यारोहण सुरू केले असते तर, अजून खूप काही करता आले असते. पण असो. जे आहे, त्यातूनच पुढे जाणे हेच आपण सर्व गिर्यारोहणातून शिकतो.             * * *














































Sunday, November 6, 2022

विजय भालेराव उर्फ मामा

१९८१ मध्ये, मी नेचर लव्हर्स ह्या संस्थे बरोबर पदभ्रमणास सुरवात केली. पुढे १९८६ मध्ये रतन गड परिसरातील ‘बाण’ सुळक्यावर यशस्वी चढाई केली. १९८७ साली माहुली परिसरातील ‘करवली’ व ‘नवरा’ हे सुळके सर केले. नंतर रायगडा समोरील ‘लिंगाणा’ व ‘भवानी कडा’ सर केला. त्याच वर्षी ‘कुल्लती व्हॅली’, मनाली परिसरातील ‘ज्योरी’ शिखर सर केले. येथे ‘नेचर लव्हर्स संस्थे तर्फे मी छायाचित्रकार होतो. १९८८ला ‘पिनॅकल’ संस्थे तर्फे छायाचित्रकार म्हणून काम करताना, मनाली परिसरातील ‘नोर्बु’ व ‘धौलधार डोंगर रांगेतील’, ‘माँन’ शिखर सर केले. १९८९ मध्ये हिमाचल प्रदेश जवळील काझा परिसरातील ‘कानामो’ शिखर सर केले. नंतर उत्तर प्रदेशातील, ‘कामेट’ व ‘अभीगामेन’ तसेच ‘म्हात्री’ व गढवाल मधील ‘पनवली द्वार’ ह्या शिखराच्या मोहिमेत छायाचित्रकार म्हणून सहभाग घेतला. ‘ट्रान्स हिमाचल’ ट्रेक केला. तसेच उत्तरा खंड, उत्तर प्रदेश, सिमला, सिक्कीम, मनाली येथे नऊ हिमालयीन पदभ्रमण मोहिमेत छायाचित्रण केले. राजस्थान वाळवंटात दोन पदभ्रमण कार्यक्रम केले. ओरिसा, मिझोराम, मेघालय येथे युथ हॉस्टेल बरोबर पदभ्रमण केले. २००२ला बाळ राऊळ सहित तपोवन, शिवलिंग पायथ्या पर्यंत हिवाळी पदभ्रमण केले. ओरिसा येथे सागरी पदभ्रमण व महाराष्ट्रात आत्ता पर्यन्त बरेच पदभ्रमण केले. भैरव गडाची भिंत, मुंब्रा, मच्छिंद्र गड येथील प्रस्तर भिंत चढाई देखील केली. किल्लारी येथे १९९३ला आज दिनाक तर्फे जाऊन सहकार्य केले. तेथे नऊ दिवस होतो. कामशेत येथे पॅराग्लायडींग प्रशिक्षण घेतले. १९८७ पासून हिमालय, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम व महाराष्ट्र येथे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करीत आहे.

चेंबूर व कूर्ला येथील अभिरुची व विहंग या संस्था मध्ये कार्यरत असून सामाजिक उपक्रम तसेच एकाकिंका स्पर्धेत सहभाग आहे. १९८७ला डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या सहकार्याने चेतन दातार लिखीत व दिग्दर्शित ‘गर्द की गुलामी’  ह्या गर्द विरोधी पथनाट्यात मी कलाकार म्हणून भाग घेतला होता. या पथनाट्याचे महाराष्ट्रात १४० प्रयोग झाले. किंग जॉर्ज दादर येथील शाळेत मराठी साहित्य संमेलन होते. तेथे चार ते पाच प्रयोग आम्ही केले. लायन्स क्लब, रोटरी क्लब अशा बऱ्याच सामाजिक संस्थांनी प्रयोग ठेवले होते. त्यावेळी डॉ. श्रीराम लागू व सुनील दत्त यांच्या तर्फे सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला होता.

११ वर्ष व्याख्यान मालेचे आयोजन करताना, त्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक लेखकांचे व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन केले. १९८९ ला सह्याद्री वाहिनीवर, ‘एक आकाश संपले’, ह्या मालिकेत अभिनय केला.


२०१६ ला ‘मलय अँडव्हेंचर’ तर्फे मनाली जवळ ‘क्षितीधर’ व ‘हनुमान तिब्बा’ ह्या मोहिमेत छायाचित्रकार म्हणून सहभाग नोंदवला.

२०२२ला कोकणकडा मोहिमेत छायाचित्रकार म्हणून सहभाग घेतला.

Sunday, October 30, 2022

 विनायक मुळीक उर्फ सरदार

वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांचे मार्गदर्शन व मित्रांच्या संगतीत मला गिर्यारोहणाचे बाळकडू मिळाले आणि इतिहासाची आवड निर्माण होऊन मी गिर्याराहणाकडे आकर्षिला गेलो. गडभ्रमंतीची सवय राजू जाधव यांनी तर निसर्ग अवलोकनाचे मार्गदर्शन कै. महेंद्र गमरे यांच कडून मिळाले. प्रस्तरारोहणात माझे गुरू होते, अनिल कुमार, चारूहास जोशी, कै. संजय बोरोले व निता भोईर. त्यामुळे कर्नाळा किल्ल्याचा सुळका मी पहिल्यांदा सर करू शकलो.

दुर्गम हायकर्स, वांद्रे यांच्या समवेत गिर्यारोहणाची सुरूवात करत पुढे गिरीविहार, हॉलिडे हायकर्स, नेचर लव्हर्स आदि संस्थांच्या साथीने वाटचाल केली.

राजगड ते तोरणा ही माझी तशी पहिली पदभ्रमंती. माझ्या आवडत्या बाण सुळक्याची चढाई तसेच माना, कामेट, अबीगामिन या पर्वतारोहण मोहिमा मला कठिण वाटल्या. माहुलीचे सर्व सुळके, मदन १, मदन २, शकुन आदि ५० सुळक्यांवर मी चढाई केली आहे. थेलू कोटेश्वर, भागीरथी १ व २ यांच्या पायथ्या पर्यंत पर्वतारोहण मोहिमा देखील केल्या आहेत.

निसर्ग वाचवा झाडे लावा, ह्या नेचर लव्हर्स या संस्थेच्या मोहिमेत व रायगड रोप-वे विरोधातील आंदोलनात माझा सहभाग होता.

ज्यांना व्यवसाय म्हणून यात उतरायचे आहे. त्यांनी सर्व प्रकारचे प्रशिक्षिण चांगल्या रितीने घेतलेले पाहिजे. ते अनुभवी असले पाहिजेत. कठिण प्रसंगी मदतीसाठी पोलीस स्टेशन, हॉस्पिटल व रेस्क्यु टीम आदींचे संपर्क क्रमांक त्यांच्या जवळ असले पाहिजेत.

गिर्यारोहण करताना झालेल्या चुका परत होऊ न देणे, सवंगड्यांची सुरक्षा व जेथे जाणार आहोत, त्याची घरच्यांना व मित्रांना माहिती असणे महत्वाचे आहे. हा महत्वाचा मंत्र मला यातून मिळाला आहे.

कोणतीही मोहिम राबवताना, त्याची आवड व सुदृढ शरिरयष्टी असणे महत्वाचे असते. सहभागी मित्रां मधील संवाद व एकमेकांवरचा विश्वास हा देखील तितकाच महत्वाचा वाटतो. यासाठी एकत्रीत कार्यक्रम राबवले पाहिजेत. तांत्रीक प्रशिक्षणाच्या जोडीला अनुभवाची जोड असेल तर सोन्याहुन पिवळे. स्वतः बरोबर संपूर्ण तुकडीची काळजी वाहिली पाहिजे. सुरक्षा उपकरणे ही अद्ययावत व नीट असली पाहिजेत. मोहिमेस आवश्यक असलेल्या साधन सामुग्रीची माहिती असली पाहिजे. हे सर्व करताना अंगात जोश येण्यासाठी, हर हर महादेव, भारत माता की जय’, आदी घोषणा दिल्या पाहिजेत.

शिखराला गवसणी घालताना अपूरी माहिती, मनात जिद्द नसेल, तसेच उंच हवामानाला व वजनी सामान वाहून नेण्यास शरिराने साथ न दिल्यास ती कमजोरी ठरू शकते. शक्यतो चुका होऊ न देणे व झाल्यास त्याची पुनरावृत्ती होऊ न देणे, ही काळजी घेणे जरूरीचे असते.

बाण चढाई मोहिमेच्या वेळेस एका कठिण प्रसंगास तोंड द्यावे लागले होते. अनिल चव्हाण याचा छोटासा अपघात झाला. त्याला तेथून गावापर्यंत वाहून आणणे व परळच्या हॉस्पिटल मध्ये भरती करणे हे दिव्य पार पाडले होते.

भुज येथील भुकंप ग्रस्तांना व रस्त्यावरील काही अपघातात, मी जमेल तशी मदत केली आहे. जनसामान्यांन मध्ये गडकिल्ल्यां बद्दल आस्था निर्माण व्हावी म्हणून वांद्रे येथे फोटो प्रदर्शन भरविले आहे. लोहगडच्या विंचूकाटा खाली पडलेली तोफ वर उचलून आणली. तेथील दोन भुयारांचा शोध घेतला. रायगड वर देखील दोन तोफा वर उचलून ठेवल्या. रायगड प्रदक्षिणा तिन्ही बाजू वरून मारली. टकमक टोकावर चढाई केली. जंजिरा, लांजा, इसवली गावातील भुयारांचा शोध लावला. ओझर येथील वाघबीळ या सर्वात मोठ्या जवळ जवळ ८५० फूट लांब भूयाराचा मागोवा घेतला. लेह लडाख ते कुर्पूक असा बाईकने प्रवास केला. इतरही काही ठिकाणी बाईकने भ्रमंती केली आहे.

सर्व साधारण गिर्यारोहकांसाठी मालाडच्या नेचर लव्हर्स संस्थेच्या वतीने गेली ३५ वर्ष राजगड प्रदक्षिणा, तोरणा प्रदक्षिणा आदि मोठ्या उपक्रमांसाठी इतर मित्रांसोबत सुरक्षित मार्ग शोधन करून दिशा दर्शनाचे काम केले आहे. राजगड तर जवळ जवळ शंभर एक वेळा मी चढलो उतरलो असेन.

गिरीविहारचे अनिल कुमार व संजय बोरोले हे माझे आवडते गिर्यारोहक होते. राजगड तसेच अलंग, मलंग, कुलंगचा परिसर मला फार भावतो. माझ्या सोबत डॉक्टर संजीव नाईक, राजीव जाधव यांची दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत स्मरणीय ठरली आहे.

पुरस्कार तसे बरेच मिळाले आहेत. पण माझगाव डॉक मधून मिळालेला उत्कृष्ठ गिर्यारोहक व कामगार पुरस्कार मला जास्त भावतो.

* * *

Sunday, October 23, 2022

सुरेंद्र चव्हाण

माझ्या गिर्यारोहणाची सुरूवात तशी उशिराच झाली. माझ्या आवडत्या ॲथलेटिक्स या क्रीडाप्रकारात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्नात, मी क्रॉस कंट्रीला सुरुवातीला केली आणि त्यामुळेच माझा डोंगराशी संबंध आला. डोंगराळ भागातून पळणे एवढेच मला माहिती होते. या प्रकारात मी महाराष्ट्राचे दोन वर्षे नॅशनल क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं. विचार होता की या क्रीडा प्रकारात नैपूण्य मिळवायचं. राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय स्तरावर काम करायचं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. सराव करताना मी डोंगर उतारावर पडलो आणि माझ्या गुडघ्याच्या लिगामेंटला इजा पोचली. डॉक्टरांची मदत घेऊन हळूहळू बरे करण्याचे माझे प्रयत्न चालू होते.

त्याच काळात मी ॲथलेटिक्स सरावासाठी जिथे जायचो, त्या पुण्यातल्या फर्गुसन कॉलेजच्या मैदानात आजूबाजूची पालक मंडळी त्यांच्या दहा बारा वर्षाच्या मुलांना घेऊन यायची आणि त्यांना तेथे खेळण्यासाठी सोडून द्यायची.

माझा धावण्याचा सराव पूर्णपणे थांबल्यामुळे माझ्याकडे वेळ खूप होता. काही मित्र मिळून आम्ही त्या मुलांना एकत्र करून शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रेनिंग द्यायचं, असा विचार सुरू केला.

फिटनेस लेवलवर या लहान मुलांना वेगवेगळे खेळ शिकवायला सुरुवात केली. माझा एक मित्र जो ॲथलेटिक्स करायचा, त्याचे काही मित्र ट्रेकिंग आणि पर्वतारोहण करायचे. त्याच्या मित्राने सांगितले की आपण या मुलांना प्रस्तरारोहण शिकवूया. कॉलेजच्या जवळच टेकडी आहे त्याच्या वरती जुन्या दगडी खाणी आहेत त्या खाणी मध्ये प्रस्तरारोहण त्यांना सहजपणे शिकवता येईल. मी म्हटलं वेगळे काही शिकायला मिळणार असेल तर आपण करूया.

या मुलांना प्रस्तरारोहण शिकवत असताना, मी त्यांच्या बरोबर जायचो.  तेथे मला गिर्यारोहणाची पहिली ओळख झाली.

हळूहळू त्या मुलांबरोबर मी सराव करायला लागलो. आम्हाला शिकवणारे मित्र समवयस्त होते. आणि कदाचित खेळाची आवड सुरुवातीपासूनच असल्यामुळे असेल किंवा कोणत्या कारणामुळे माहित नाही. पण या क्रीडा प्रकारामध्ये माझी छान प्रगती होऊ लागली आणि मी त्यात खूप चांगली कामगिरी करायला लागलो. माझे मित्र जे या गिर्यारोहणात मुरलेले होते. तेही मला खूप चांगले प्रस्तरारोहण करतो आहेस, असे म्हणून प्रोत्साहन देऊ लागले. माझा प्रस्तरारोहण सराव वाढत गेला. या क्रिडाप्रकारा मधल्या काही गोष्टी ज्या मला आवडल्या त्यातल्या सर्वात चांगली अथवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काटेकोर नियोजन. यातील प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक टाकावे लागते. कारण प्रस्तरारोहणा मध्ये कोणत्याही प्रकारची चूक चालत नाही. त्याला माफी नसते व त्याची शिक्षा तुम्हाला लगेचच मिळते. जर तुम्हाला यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कोणतीही चुक टाळणे हा या मधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

प्रस्तरारोहणास सुरुवात करणारे, सर्वसाधारण छोट्या उंचीचे प्रस्तरारोहण करत सुरुवात करतात. माझे सहकारी उत्तम प्रस्तरारोहक होते आणि त्यांच्या मुळे मी सुरवातीपासून मोठ्या प्रस्तरारोहणाच्या मोहिमांमध्ये सहभागी होऊ लागलो.

१९८४ साली माझा सराव चालू झाला. एकदा  पुण्यातल्या एका जुन्या दगडाच्या खाणीत सराव करत असताना गिरिप्रेमी क्लबचे संस्थापक श्री आनंद पाळंदे यांनी मला पाहिलं आणि मला विचारले, 'कोणत्या संस्थेतून गिर्यारोहण करतोस. मी त्याना सांगितले,  की कुठलीच संस्था नाही, आम्ही आमचे जातो\. तेव्हा ते म्हणाले, \९८६ साली बंगलोरला ऑल इंडिया रॉक क्लायबिंग मीट आहे. तुझं चढाई कौशल्य, मला चांगलं वाटतं. तू जाशील का? तुला जायचं आहे का?'

मला एक चांगली संधी मिळाली होती. मी तिथे जाऊन तेथे प्रस्तरारोहण केल्यानंतर मला एक चांगला आत्मविश्वास मिळाला. जे निष्णांत प्रस्तरारोहक भारताच्या कानाकोपऱ्यातून आले होते, त्यांच्या बरोबर प्रस्तरारोहण करायला मिळाले.

याच काळात मी जिथे काम करतो त्या टाटा मोटर्स, (टेल्कोतील) मोरेश्वर कुलकर्णी आणि प्रसाद ढमाळ यांच्या बरोबर प्रस्तरारोहण चालू झालं. ते दोघेही उत्तम प्रतीचे गिर्यारोहक होते. मला प्रस्तरारोहणातील वेगवेगळं कौशल्य आत्मसात करायचं  होतं म्हणून, सिंहगडचा खांद कडा आहे, जीथे कोणी फारसे प्रस्तरारोहण करत नसे, तिथे नवीन दोन मार्गांनी मी चढाई केली.

खंडाळा जवळील 'ड्युक्स नोझ' ही माझी पहिली मोठी प्रस्तरारोहण मोहिम होती.

ती केल्यानंतर वेगवेगळे प्रस्तरारोहणचे आराखडे चालू झाले. त्याच्या मध्ये महाबळेश्वरचा, 'ऑर्थरसीट कडा', रतनगडचा 'खुटा', त्या नंतर 'बाण' सुळका आदी सर केले. हे सगळे करत असताना आमच्या डोक्यात आलं की जसे वसंत लिमये यांच्या नेतृत्वाखाली कोकणकडा सर झालेला होता. तसे काहीतरी वेगळे केले पाहिजे. सहकाऱ्याने सांगितले की ढाकोबाचा एक कडा आहे. तीन साडेतीन हजार फूट सरळ असेल. अल्पाईन पध्दतीने खाल पासून सुरूवात करत तो आम्ही सर केला.

याच दरम्यान माझे आणखीन काही सहकारी मागे लागले होते की, प्राथमिक गिर्यारोहण कोर्स कर. मी १९८९ मध्ये उत्तर काशीमध्ये नीम मध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यांची देखील शाबासकी मिळाली होती. 'ए' ग्रेड मध्ये बेसिक कोर्स पूर्ण केला. त्याच्याच पुढच्या वर्षी अँडव्हान्स कोर्स करायचा असं ठरवलं होतं. पण पुण्यातील 'गिरिप्रेमी' या आमच्या संस्थेने 'मंदा' ही शिखर मोहीम आयोजित केली होती, तांत्रीक दृष्च्या कठिण शिखर असल्याचं मला माहिती होतं त्याच्यामुळे अँडव्हान्स कोर्स न करता मी तेथे गेलो. ही मोहिम तशी यशस्वी होऊ शकले नाही. पण त्यात जे काही शिकलो, ते कदाचित मी अँडव्हान्स मध्ये जे शिकलो असतो त्याच्या पेक्षा कित्येक पटीने जास्त होते.

त्या दरम्यान मुंबईच्या 'पिनॅकल क्लब'ने मुलींसाठी 'बलजोरी' व सर्वांसाठी 'पनवली द्वार' ह्या पिंडारी ग्लेशियरच्या बाजूच्या पर्वतारोहण मोहिमा हाती घेतल्या होत्या, एकही अती उंचीवरचा भारवाहक न घेता. ही मोहिम आम्ही यशस्वी केली.

१९९२ साली सतोपंथ मोहिम घेतली, ती यशस्वी केली. पनवली द्वार व सतोपंथ शिखर सर करणारे आम्ही पहिले भारतीय होतो.

शिवलिंग शिखर मोहीम एव्हलॉन्च आल्याने अर्धवट सोडावी लागली.

१९९७ च्या दरम्यान मूंबईतील कुशल संघटक ऋषीकेश यादव यांनी अवघड अशा 'एव्हरेस्ट' मोहिमेत भाग घेतो का विचारले. मी हो म्हंटल्यावर चढाईची जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी ती पार पाडली. इंडियन माऊंटेनिरिंग फाउंडेशन व मिलीट्रीच्या मदतीशिवाय पण तीन वर्ष मेहनत घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने ही नागरी मोहिम यशस्वी झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात माझे पाऊल एव्हरेस्टच्या माथ्याला लागले आणि महाराष्ट्राच्या गिर्यारोहण इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला. दापोली नगरपालिकेने एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण असे एका चौकास नाव देऊन गौरविले.

यानंतरच महाराष्ट्रात उंच शिखरं चढाईची लगबग सुरू झाली, याचा मला अभिमान आहे.

मला या क्षेत्राने तसं भरभरून दिले आहे. म्हणून मी ऋणी आहे.

***