Sunday, October 30, 2022

 विनायक मुळीक उर्फ सरदार

वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांचे मार्गदर्शन व मित्रांच्या संगतीत मला गिर्यारोहणाचे बाळकडू मिळाले आणि इतिहासाची आवड निर्माण होऊन मी गिर्याराहणाकडे आकर्षिला गेलो. गडभ्रमंतीची सवय राजू जाधव यांनी तर निसर्ग अवलोकनाचे मार्गदर्शन कै. महेंद्र गमरे यांच कडून मिळाले. प्रस्तरारोहणात माझे गुरू होते, अनिल कुमार, चारूहास जोशी, कै. संजय बोरोले व निता भोईर. त्यामुळे कर्नाळा किल्ल्याचा सुळका मी पहिल्यांदा सर करू शकलो.

दुर्गम हायकर्स, वांद्रे यांच्या समवेत गिर्यारोहणाची सुरूवात करत पुढे गिरीविहार, हॉलिडे हायकर्स, नेचर लव्हर्स आदि संस्थांच्या साथीने वाटचाल केली.

राजगड ते तोरणा ही माझी तशी पहिली पदभ्रमंती. माझ्या आवडत्या बाण सुळक्याची चढाई तसेच माना, कामेट, अबीगामिन या पर्वतारोहण मोहिमा मला कठिण वाटल्या. माहुलीचे सर्व सुळके, मदन १, मदन २, शकुन आदि ५० सुळक्यांवर मी चढाई केली आहे. थेलू कोटेश्वर, भागीरथी १ व २ यांच्या पायथ्या पर्यंत पर्वतारोहण मोहिमा देखील केल्या आहेत.

निसर्ग वाचवा झाडे लावा, ह्या नेचर लव्हर्स या संस्थेच्या मोहिमेत व रायगड रोप-वे विरोधातील आंदोलनात माझा सहभाग होता.

ज्यांना व्यवसाय म्हणून यात उतरायचे आहे. त्यांनी सर्व प्रकारचे प्रशिक्षिण चांगल्या रितीने घेतलेले पाहिजे. ते अनुभवी असले पाहिजेत. कठिण प्रसंगी मदतीसाठी पोलीस स्टेशन, हॉस्पिटल व रेस्क्यु टीम आदींचे संपर्क क्रमांक त्यांच्या जवळ असले पाहिजेत.

गिर्यारोहण करताना झालेल्या चुका परत होऊ न देणे, सवंगड्यांची सुरक्षा व जेथे जाणार आहोत, त्याची घरच्यांना व मित्रांना माहिती असणे महत्वाचे आहे. हा महत्वाचा मंत्र मला यातून मिळाला आहे.

कोणतीही मोहिम राबवताना, त्याची आवड व सुदृढ शरिरयष्टी असणे महत्वाचे असते. सहभागी मित्रां मधील संवाद व एकमेकांवरचा विश्वास हा देखील तितकाच महत्वाचा वाटतो. यासाठी एकत्रीत कार्यक्रम राबवले पाहिजेत. तांत्रीक प्रशिक्षणाच्या जोडीला अनुभवाची जोड असेल तर सोन्याहुन पिवळे. स्वतः बरोबर संपूर्ण तुकडीची काळजी वाहिली पाहिजे. सुरक्षा उपकरणे ही अद्ययावत व नीट असली पाहिजेत. मोहिमेस आवश्यक असलेल्या साधन सामुग्रीची माहिती असली पाहिजे. हे सर्व करताना अंगात जोश येण्यासाठी, हर हर महादेव, भारत माता की जय’, आदी घोषणा दिल्या पाहिजेत.

शिखराला गवसणी घालताना अपूरी माहिती, मनात जिद्द नसेल, तसेच उंच हवामानाला व वजनी सामान वाहून नेण्यास शरिराने साथ न दिल्यास ती कमजोरी ठरू शकते. शक्यतो चुका होऊ न देणे व झाल्यास त्याची पुनरावृत्ती होऊ न देणे, ही काळजी घेणे जरूरीचे असते.

बाण चढाई मोहिमेच्या वेळेस एका कठिण प्रसंगास तोंड द्यावे लागले होते. अनिल चव्हाण याचा छोटासा अपघात झाला. त्याला तेथून गावापर्यंत वाहून आणणे व परळच्या हॉस्पिटल मध्ये भरती करणे हे दिव्य पार पाडले होते.

भुज येथील भुकंप ग्रस्तांना व रस्त्यावरील काही अपघातात, मी जमेल तशी मदत केली आहे. जनसामान्यांन मध्ये गडकिल्ल्यां बद्दल आस्था निर्माण व्हावी म्हणून वांद्रे येथे फोटो प्रदर्शन भरविले आहे. लोहगडच्या विंचूकाटा खाली पडलेली तोफ वर उचलून आणली. तेथील दोन भुयारांचा शोध घेतला. रायगड वर देखील दोन तोफा वर उचलून ठेवल्या. रायगड प्रदक्षिणा तिन्ही बाजू वरून मारली. टकमक टोकावर चढाई केली. जंजिरा, लांजा, इसवली गावातील भुयारांचा शोध लावला. ओझर येथील वाघबीळ या सर्वात मोठ्या जवळ जवळ ८५० फूट लांब भूयाराचा मागोवा घेतला. लेह लडाख ते कुर्पूक असा बाईकने प्रवास केला. इतरही काही ठिकाणी बाईकने भ्रमंती केली आहे.

सर्व साधारण गिर्यारोहकांसाठी मालाडच्या नेचर लव्हर्स संस्थेच्या वतीने गेली ३५ वर्ष राजगड प्रदक्षिणा, तोरणा प्रदक्षिणा आदि मोठ्या उपक्रमांसाठी इतर मित्रांसोबत सुरक्षित मार्ग शोधन करून दिशा दर्शनाचे काम केले आहे. राजगड तर जवळ जवळ शंभर एक वेळा मी चढलो उतरलो असेन.

गिरीविहारचे अनिल कुमार व संजय बोरोले हे माझे आवडते गिर्यारोहक होते. राजगड तसेच अलंग, मलंग, कुलंगचा परिसर मला फार भावतो. माझ्या सोबत डॉक्टर संजीव नाईक, राजीव जाधव यांची दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत स्मरणीय ठरली आहे.

पुरस्कार तसे बरेच मिळाले आहेत. पण माझगाव डॉक मधून मिळालेला उत्कृष्ठ गिर्यारोहक व कामगार पुरस्कार मला जास्त भावतो.

* * *

No comments:

Post a Comment