Sunday, October 23, 2022

सुरेंद्र चव्हाण

माझ्या गिर्यारोहणाची सुरूवात तशी उशिराच झाली. माझ्या आवडत्या ॲथलेटिक्स या क्रीडाप्रकारात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्नात, मी क्रॉस कंट्रीला सुरुवातीला केली आणि त्यामुळेच माझा डोंगराशी संबंध आला. डोंगराळ भागातून पळणे एवढेच मला माहिती होते. या प्रकारात मी महाराष्ट्राचे दोन वर्षे नॅशनल क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं. विचार होता की या क्रीडा प्रकारात नैपूण्य मिळवायचं. राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय स्तरावर काम करायचं. पण नियतीला ते मान्य नव्हतं. सराव करताना मी डोंगर उतारावर पडलो आणि माझ्या गुडघ्याच्या लिगामेंटला इजा पोचली. डॉक्टरांची मदत घेऊन हळूहळू बरे करण्याचे माझे प्रयत्न चालू होते.

त्याच काळात मी ॲथलेटिक्स सरावासाठी जिथे जायचो, त्या पुण्यातल्या फर्गुसन कॉलेजच्या मैदानात आजूबाजूची पालक मंडळी त्यांच्या दहा बारा वर्षाच्या मुलांना घेऊन यायची आणि त्यांना तेथे खेळण्यासाठी सोडून द्यायची.

माझा धावण्याचा सराव पूर्णपणे थांबल्यामुळे माझ्याकडे वेळ खूप होता. काही मित्र मिळून आम्ही त्या मुलांना एकत्र करून शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रेनिंग द्यायचं, असा विचार सुरू केला.

फिटनेस लेवलवर या लहान मुलांना वेगवेगळे खेळ शिकवायला सुरुवात केली. माझा एक मित्र जो ॲथलेटिक्स करायचा, त्याचे काही मित्र ट्रेकिंग आणि पर्वतारोहण करायचे. त्याच्या मित्राने सांगितले की आपण या मुलांना प्रस्तरारोहण शिकवूया. कॉलेजच्या जवळच टेकडी आहे त्याच्या वरती जुन्या दगडी खाणी आहेत त्या खाणी मध्ये प्रस्तरारोहण त्यांना सहजपणे शिकवता येईल. मी म्हटलं वेगळे काही शिकायला मिळणार असेल तर आपण करूया.

या मुलांना प्रस्तरारोहण शिकवत असताना, मी त्यांच्या बरोबर जायचो.  तेथे मला गिर्यारोहणाची पहिली ओळख झाली.

हळूहळू त्या मुलांबरोबर मी सराव करायला लागलो. आम्हाला शिकवणारे मित्र समवयस्त होते. आणि कदाचित खेळाची आवड सुरुवातीपासूनच असल्यामुळे असेल किंवा कोणत्या कारणामुळे माहित नाही. पण या क्रीडा प्रकारामध्ये माझी छान प्रगती होऊ लागली आणि मी त्यात खूप चांगली कामगिरी करायला लागलो. माझे मित्र जे या गिर्यारोहणात मुरलेले होते. तेही मला खूप चांगले प्रस्तरारोहण करतो आहेस, असे म्हणून प्रोत्साहन देऊ लागले. माझा प्रस्तरारोहण सराव वाढत गेला. या क्रिडाप्रकारा मधल्या काही गोष्टी ज्या मला आवडल्या त्यातल्या सर्वात चांगली अथवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काटेकोर नियोजन. यातील प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक टाकावे लागते. कारण प्रस्तरारोहणा मध्ये कोणत्याही प्रकारची चूक चालत नाही. त्याला माफी नसते व त्याची शिक्षा तुम्हाला लगेचच मिळते. जर तुम्हाला यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कोणतीही चुक टाळणे हा या मधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

प्रस्तरारोहणास सुरुवात करणारे, सर्वसाधारण छोट्या उंचीचे प्रस्तरारोहण करत सुरुवात करतात. माझे सहकारी उत्तम प्रस्तरारोहक होते आणि त्यांच्या मुळे मी सुरवातीपासून मोठ्या प्रस्तरारोहणाच्या मोहिमांमध्ये सहभागी होऊ लागलो.

१९८४ साली माझा सराव चालू झाला. एकदा  पुण्यातल्या एका जुन्या दगडाच्या खाणीत सराव करत असताना गिरिप्रेमी क्लबचे संस्थापक श्री आनंद पाळंदे यांनी मला पाहिलं आणि मला विचारले, 'कोणत्या संस्थेतून गिर्यारोहण करतोस. मी त्याना सांगितले,  की कुठलीच संस्था नाही, आम्ही आमचे जातो\. तेव्हा ते म्हणाले, \९८६ साली बंगलोरला ऑल इंडिया रॉक क्लायबिंग मीट आहे. तुझं चढाई कौशल्य, मला चांगलं वाटतं. तू जाशील का? तुला जायचं आहे का?'

मला एक चांगली संधी मिळाली होती. मी तिथे जाऊन तेथे प्रस्तरारोहण केल्यानंतर मला एक चांगला आत्मविश्वास मिळाला. जे निष्णांत प्रस्तरारोहक भारताच्या कानाकोपऱ्यातून आले होते, त्यांच्या बरोबर प्रस्तरारोहण करायला मिळाले.

याच काळात मी जिथे काम करतो त्या टाटा मोटर्स, (टेल्कोतील) मोरेश्वर कुलकर्णी आणि प्रसाद ढमाळ यांच्या बरोबर प्रस्तरारोहण चालू झालं. ते दोघेही उत्तम प्रतीचे गिर्यारोहक होते. मला प्रस्तरारोहणातील वेगवेगळं कौशल्य आत्मसात करायचं  होतं म्हणून, सिंहगडचा खांद कडा आहे, जीथे कोणी फारसे प्रस्तरारोहण करत नसे, तिथे नवीन दोन मार्गांनी मी चढाई केली.

खंडाळा जवळील 'ड्युक्स नोझ' ही माझी पहिली मोठी प्रस्तरारोहण मोहिम होती.

ती केल्यानंतर वेगवेगळे प्रस्तरारोहणचे आराखडे चालू झाले. त्याच्या मध्ये महाबळेश्वरचा, 'ऑर्थरसीट कडा', रतनगडचा 'खुटा', त्या नंतर 'बाण' सुळका आदी सर केले. हे सगळे करत असताना आमच्या डोक्यात आलं की जसे वसंत लिमये यांच्या नेतृत्वाखाली कोकणकडा सर झालेला होता. तसे काहीतरी वेगळे केले पाहिजे. सहकाऱ्याने सांगितले की ढाकोबाचा एक कडा आहे. तीन साडेतीन हजार फूट सरळ असेल. अल्पाईन पध्दतीने खाल पासून सुरूवात करत तो आम्ही सर केला.

याच दरम्यान माझे आणखीन काही सहकारी मागे लागले होते की, प्राथमिक गिर्यारोहण कोर्स कर. मी १९८९ मध्ये उत्तर काशीमध्ये नीम मध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यांची देखील शाबासकी मिळाली होती. 'ए' ग्रेड मध्ये बेसिक कोर्स पूर्ण केला. त्याच्याच पुढच्या वर्षी अँडव्हान्स कोर्स करायचा असं ठरवलं होतं. पण पुण्यातील 'गिरिप्रेमी' या आमच्या संस्थेने 'मंदा' ही शिखर मोहीम आयोजित केली होती, तांत्रीक दृष्च्या कठिण शिखर असल्याचं मला माहिती होतं त्याच्यामुळे अँडव्हान्स कोर्स न करता मी तेथे गेलो. ही मोहिम तशी यशस्वी होऊ शकले नाही. पण त्यात जे काही शिकलो, ते कदाचित मी अँडव्हान्स मध्ये जे शिकलो असतो त्याच्या पेक्षा कित्येक पटीने जास्त होते.

त्या दरम्यान मुंबईच्या 'पिनॅकल क्लब'ने मुलींसाठी 'बलजोरी' व सर्वांसाठी 'पनवली द्वार' ह्या पिंडारी ग्लेशियरच्या बाजूच्या पर्वतारोहण मोहिमा हाती घेतल्या होत्या, एकही अती उंचीवरचा भारवाहक न घेता. ही मोहिम आम्ही यशस्वी केली.

१९९२ साली सतोपंथ मोहिम घेतली, ती यशस्वी केली. पनवली द्वार व सतोपंथ शिखर सर करणारे आम्ही पहिले भारतीय होतो.

शिवलिंग शिखर मोहीम एव्हलॉन्च आल्याने अर्धवट सोडावी लागली.

१९९७ च्या दरम्यान मूंबईतील कुशल संघटक ऋषीकेश यादव यांनी अवघड अशा 'एव्हरेस्ट' मोहिमेत भाग घेतो का विचारले. मी हो म्हंटल्यावर चढाईची जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी ती पार पाडली. इंडियन माऊंटेनिरिंग फाउंडेशन व मिलीट्रीच्या मदतीशिवाय पण तीन वर्ष मेहनत घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने ही नागरी मोहिम यशस्वी झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात माझे पाऊल एव्हरेस्टच्या माथ्याला लागले आणि महाराष्ट्राच्या गिर्यारोहण इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला. दापोली नगरपालिकेने एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण असे एका चौकास नाव देऊन गौरविले.

यानंतरच महाराष्ट्रात उंच शिखरं चढाईची लगबग सुरू झाली, याचा मला अभिमान आहे.

मला या क्षेत्राने तसं भरभरून दिले आहे. म्हणून मी ऋणी आहे.

***

No comments:

Post a Comment